Saturday, October 12, 2024
Homeमुख्य बातम्याडोळ्यांना त्रास होतोय? बाहेर जाणे टाळा

डोळ्यांना त्रास होतोय? बाहेर जाणे टाळा

नाशिक । फारूक पठाण Nashik

राज्यातील विविध शहरांसह नाशिक परिसरात सध्या डोळे येण्याची साथ (काँजक्टिव्हिटीस) पसरली आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनासह मनपा आरोग्य विभागाने नाशिककरांना लक्षणे आढळल्यास त्वरित तज्ञ डॉक्टरांशी संपर्क करुन उपचार घेण्याचे आवाहन केले आहे. शहरात मागील काही काळात लहान मुला-मुलींसह मोठ्यांना डोळ्याचा त्रास होत आहे.

- Advertisement -

हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग असून सामान्यपणे एका डोळ्याला डोळे येण्याचा संसर्ग होतो, मात्र नंतर दुसर्‍या डोळ्याला संसर्ग होतो. त्यामुळे हा संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन नेत्रविकार तज्ञांकडून करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत रुग्णांनी बाहेर जाणे टाळावे, घरी बसून आराम करावा, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. शहर परिसरात मागील दोन आठवड्यांपासून नेत्र संसर्गाने अनेक रूग्ण त्रस्त आहेत. डोळे येणे हा एक प्रकारच्या संसर्गजन्य रोग असून पावसाळ्यात हा आजार होण्याचे प्रमाण जास्त असते. इंग्रजीत याला ‘काँजक्टिव्हिटीस’ असे नाव आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

दरम्यान जिल्हा रुग्णालयात तसेच महानगरपालिकेच्या रुग्णालये व बहुसंख्य नेत्रविकार तज्ञांकडे डोळ्यांच्या तक्रारी करणार्‍या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नेत्र संसर्गाचं गांभीर्य लक्षात घेता नाशिक महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नितीन रावते यांनी नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच मनपाच्या आरोग्य, शिक्षण विभागासह शाळांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. नाशिकमधील दाट लोकवस्ती असलेल्या भागात डोळे येण्याचा जास्त धोका अधिक आहे.

डोळ्यांमध्ये त्रास अनुभवल्यास वेळेतच वैद्यकीय सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते. आपले हात डोळ्यांना लागतात आणि हेच हात दुसर्‍या व्यक्तीला लागले तर हा संसर्ग पसरतो. यासाठी सतत डोळे आणि हात स्वच्छ धुणे हा एकमेव उपाय असतो. डोळे आलेल्या व्यक्तीने हात स्वच्छ ठेवावेत. तसेच हात डोळ्यांना अजिबात लावू नयेत. चुकून लागल्यास पुन्हा पुन्हा हात साबणाने धुवत राहावेत. यामुळे हा संसर्ग आटोक्यात येऊ शकतो. योग्य ती स्वच्छतेची काळजी हाच यावरील एकमेव उपाय आहे. तसेच घरगुती उपाय न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषधोपचार करणे आवश्यक असते.

डोळ्यांचा विषाणूजन्य संसर्ग हा सौम्य प्रकारचा असला तरी याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. हा संसर्ग मुख्यत्वे अ‍ॅडिनो वायरसमुळे होतो. जिल्ह्यात डोळे येण्याची साथ सुरु झाली असून संसर्ग वाढू नये, यासाठी डोळे आलेल्या रुग्णांस क्वारंटाईन करा, रुग्णाची योग्य ती काळजी घ्या.

– डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी

लक्षणे

डोळे आले असल्यास काही लक्षणे प्रामुख्याने जाणवू लागतात.

डोळे हलके लाल होऊ लागतात.

डोळ्यातून पाणी यायला लागते.

खाज येऊ लागते.

डोळ्यात थोडी चिकटपणा येतो.

डोळ्यात वारंवार खाज येते.

अशी घ्यावी काळजी

डोळे आले असल्यास डोळ्यांना सतत हात लावू नये.

डोळ्यांना स्वच्छ पाण्याने वारंवार धूत राहावे.

डोळे पुसण्यासाठी स्वच्छ रुमालाचा उपयोग करावा आणि डोळ्यांना वारंवार स्पर्श करु नये.

कुटुंबातील अन्य सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून नेत्र संसर्ग असेपर्यंत कुटुंबापासून सुरक्षित अंतर राखून राहावे.

कोणत्याही प्रकारचा घरगुती उपाय करू नका, वैद्यकीय तज्ञांचाच सल्ला घेऊन उपचार करावा.

तज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार आणि औषधे घ्यावीत.

योग्य वेळेवर उपचार घेतल्यावर पाच ते सहा दिवसांत डोळे बरे होतात.

एकदा डोळे येऊन गेले की, परत त्या व्यक्तीला संसर्ग होण्याचा धोका असतो. तेव्हा निष्काळजीपणा करू नये.

- Advertisment -

ताज्या बातम्या