नवी दिल्ली | New Delhi
युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेले युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. याचाच भाग म्हणून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी काल (शुक्रवारी) व्हाईट हाऊसला भेट दिली होती. या भेटीदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झेलेन्स्की यांची जोरदार बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
या बैठकीदरम्यान बोलताना ट्रम्प युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना (President) म्हणाले की, “तुमचा देश मोठ्या संकटात आहे. तुम्ही जिंकणार नाही आहात. आमच्यामुळे तुम्हाला सुरक्षितपणे बाहेर पडण्याची खूप चांगली संधी आहे. तुम्ही एकटे नाही आहात. आमच्या मूर्ख राष्ट्राध्यक्षामार्फत आम्ही तुम्हाला ३५० अब्ज डॉलर्स दिले आहे. आम्ही तुम्हाला लष्करी उपकरणे दिली आहेत. जर तुमच्याकडे आमची लष्करी उपकरणे नसती तर हे युद्ध दोन आठवड्यात संपले असते”, असे त्यांनी म्हटले.
तर झेलेन्स्की म्हणाले की, “जोपर्यंत त्यांना हल्ल्याविरुद्ध सुरक्षा हमी मिळत नाही तोपर्यंत त्यांचा देश रशियासोबत शांतता चर्चेत सहभागी होणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेटीदरम्यान झालेला वाद दोन्ही देशांसाठी चांगली गोष्ट नाही. ट्रम्प यांनी हे समजून घेण्याची गरज आहे की, युक्रेन (Ukraine) रशियाबद्दलचा आपला दृष्टिकोन एका क्षणात बदलू शकत नाही”, असे त्यांनी सांगितले.
यावर ट्रम्प म्हणाले की, “आम्हाला हे युद्ध लवकरात लवकर संपवायचे आहे. आशा आहे की आम्हाला अधिक सैन्य पाठवावे लागणार नाही. मी खनिज सौद्याचे कौतुक करतो कारण आम्हाला त्याची गरज होती. मी रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी समन्वय साधला नसता तर कोणताही करार होऊ शकला नसता”, असे त्यांनी म्हटले.
अमेरिका युक्रेनची आर्थिक मदत थांबवणार?
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, एलोन मस्क आणि त्यांचे सरकारी कार्यक्षमता विभाग युक्रेनला देण्यात येणाऱ्या मोठ्या आर्थिक आणि सुरक्षा मदतीतील आधीच चौकशी करत होते, परंतु आता चौकशी वेगाने होणार आहे. तसेच ट्रम्प युक्रेनला देण्यात येणारी सर्व लष्करी मदत थांबवण्याचा विचार करत असल्याची माहिती देखील या अधिकाऱ्याने दिली आहे.