अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
आर्मीमध्ये नोकरीला असून आर्मीतील अधिकार्यांशी ओळख असल्याचे भासून नाशिक जिल्ह्यातील तरुणांकडून चार लाख 90 हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिघांविरूध्द सोमवारी (26 ऑगस्ट) येथील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक झालेले भगवान काशिनाथ घुगे (वय 29 रा. पास्ते, ता. सिन्नर, जि. नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. बापू छबू आव्हाड (रा. आंबेगाव, पाचोरा, ता. येवला, जि. नाशिक), सत्यजीत भरत कांबळे (रा. श्रीगोंदा) व राहुल सुमंत गुरव (रा. चौसाळा, जि. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सदरची घटना 6 फेब्रुुवारी 2022 ते 28 मे 2022 दरम्यान येथील जामखेड रस्त्यावरील मुठ्ठी चौक, आर्मी कॅम्प परिसरात घडली आहे. अर्ज चौकशीतून निष्पन्न झाल्यानंतर 26 ऑगस्ट 2024 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. संशयित तीन आरोपींची फिर्यादी व त्यांच्या मित्रांसोबत ओळख झाली. संशयित आरोपींनी फिर्यादीला आम्ही आर्मीमध्ये नोकरीला आहे असे भासविले. त्यांनी आर्मीचा गणवेश परिधान केलेला असल्याने फिर्यादी व त्यांच्या मित्रांचा विश्वास बसला. आर्मी मधील अधिकार्यांशी ओळख असल्याने नोकरी लावून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. फिर्यादी व त्यांच्या मित्राकडून आरटीजीएस, फोन पे व रोख स्वरूपात चार लाख 90 हजार रुपये घेतले. नोकरी न देता पैसेही परत दिले नाही. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्ष्यात आल्यानंतर फिर्यादी यांनी सुरूवातीला पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्ज केला होता. पोलिसांनी त्या अर्जाची चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके अधिक तपास करत आहेत.