जम्मू । वृत्तसंस्था Jammu & Kashmir
पूंछ भागातील नियंत्रण रेषेजवळ बलनोई परिसरात आज संध्याकाळी भारतीय लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 5 जवान शहीद झाले. इतर अनेक जवान जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस आणि लष्करी पथकांनी मदतकार्य सुरू केले आहे. जखमी जवानांना उपचारासाठी रूग्णालयात हलवण्यात आले आहे.
नीलम मुख्यालयापासून बलनोई घोरा पोस्टकडे जवानांना घेऊन जाणारे 11 एमएलआयचे वाहन सुमारे 350 फूट खोल दरीत कोसळले. रस्ता चुकल्याने वाहन दरीत कोसळल्याचे लष्करी अधिकार्यांनी सांगितले. अपघातग्रस्त वाहनात 8 ते 9 जवान होते, अशी माहिती मिळत आहे. मृत जवानांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. गेल्या महिन्यात 4 नोव्हेंबरला राजौरी जिल्ह्यात कालाकोट येथील बडोग गावाजवळ लष्करी वाहन घसरून दरीत पडल्याने एका जवानाचा मृत्यू झाला होता.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा