धुळे – Dhule – प्रतिनिधी :
शहरातील देवपूर परिसरात महामार्गावर एकाला मारहाण करून लुटणार्या दोघांना देवपूर पोलिसांनी चोवीस तासांच्या आतच अटक केली आहे. दोघांनी गुन्ह्याची कबूल देखील दिली असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील रोकडेसह मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे.
देवपूरातील बिलाडी रोडवरील एकता नगरातील रहिवासी व भिक्षुकीचा व्यवसाय करणारे संतोष कालीदास काळे (वय 42) हे दि. 31 रोजी सायंकाळी साडेसात ते पावणे आठ वाजेच्या सुमारास रसराज हॉटेलकडून बिलाडी फाट्याकडे पायी जात होते. त्यादरम्यान पाऊस सुरू झाल्याने ते योग-7 डीजे दुकानाच्या आडोश्याला थांबले.
तेव्हा एका दुचाकीवर आलेल्या दोन तरूण त्यांच्याकडे पैशांची मागणी करु लागले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी त्यांना दगड व हाताबुक्यांनी बेदम मारहाण करून दुखापती केले. त्यांच्याकडील रोख आठ हजार 100 रूपये व 4 हजार रूपये किंमतीचा मोबाईल असा एकुण 12 हजार 100 रूपयांचा मुद्येमाल जबरीने हिसकावून घेतला. याप्रकरणी देवपूर पोलिसात दोन अज्ञात तरूणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर देवपूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने शहरातील गुन्हेगारांकडे कसून चौकशी केली. त्यादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन संशयीतांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल, पाकीट व 8 हजार रूपये असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार हे करत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधिक्षक राजु भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सानप,पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार व तपास पथकातील पोकॉ मुकेश वाघ, पोकॉ किरणकुमार सावळे, पोकाँ सागर सुर्यवंशी, पोकॉ सुनिल गवळे यांनी केली आहे.