आरोपी मूळ नेवासा तालुक्यातील तळेवाडीचा
नाशिक – पैसे कमावण्यासाठी एका भामट्याने बनावट नावाने जीवनसाथी डॉट कॉम आणि मॅट्रिमनी डॉट कॉम या संकेतस्थळांच्या माध्यमातून घटस्फोटित, विधवा आणि विवाहेच्छूक अशा तब्बल 52 महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा गंडा घालणार्या ठकास गुरुवारी (दि.5) रात्री अटक करण्यात आली. नाशिकमध्ये महिलेला भेटण्यास आलेल्या या भामट्याला खुद्द पीडित महिला, छत्रपती सेना आणि नाशिक पोलिसांनी सापळा रचून अटक केली. संपत चांगदेव दरवडे ऊर्फ मनोज पाटील ऊर्फ मयूर पाटील (34, मूळ रा. तळेवाडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर, सध्या रा. मुहम्मदवाडी, हडपसर, पुणे) असे अटक झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संपत दरवडे याचा 2014 मध्ये आरती बरोबर विवाह झाला होता. मात्र विवाहानंतर सात महिन्यांत त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यावेळी त्याच्यावर 13 लाखांचे कर्ज होते. यादरम्यान 2015 मध्ये नागपूर येथे राहणारी व पुण्यात काम करणार्या घटस्फोटित महिलेशी त्याची ओळख झाली त्यातून त्यांची जवळीक निर्माण झाली व तिच्यासोबत लग्न केल्यास त्याला आर्थिक मदत देऊन आर्थिक अडचण दूर करण्याचे आश्वासन तिने दिले. त्याला पन्नास हजार रुपयाची मदत केली.
याच प्रकारातून त्याने पैसे कमवण्याची नामी युक्ती शोधून काढली. घटस्फोटीत महिला, विधवा महिला व विवाहित महिलांना हेरून त्यांची जवळीक साधून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून आर्थिक लाभ मिळवण्याचा त्याने सपाटाच लावला होता. घटस्फोटित महिला, विधवा आणि विवाहेच्छूक महिलांना हेरून त्यांच्याशी जवळीक साधून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत फसवणूक केली.
तो नाशिकमध्ये घटस्फोटित महिलेला भेटण्यास येणार असल्याची माहिती पीडित महिलेकडून छत्रपती सेना आणि काही पीडित महिलांना मिळाली होती. त्यानुसार नागपूर, पुणे, सिंधुदुर्ग येथील पीडित महिला गुरुवारी (दि.5) नाशिकमध्ये दाखल झाल्या. त्यांच्यासह छत्रपती सेनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी भामट्याला पंचवटी कारंजा येथील मानस हॉटेलमधून अटक केली. त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.