Tuesday, April 8, 2025
HomeराजकीयManikrao Kokate : पडसाद! सुंभ जळाला तरी….

Manikrao Kokate : पडसाद! सुंभ जळाला तरी….

नाशिक | शैलेंद्र तनपुरे | Nashik

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याबाबतीत दैवं देतं अन् ‘तोंड’ नेतं असे होण्याची दाट शक्यता बळावली आहे. मंत्री झाल्यावर माणिकराव अधिक परिपक्वतेने व जबाबदारीने बोलतील, ही अपेक्षा फोल ठरू लागली आहे. मुळातच फटकळ स्वभावाच्या माणिकरावांनी आपल्या वाक्चातुर्यान यापूर्वीही अनेकांना अंगावर घेतले आहेच. त्यांची जाहीर भाषणे ऐकली तर या व्यक्तिमत्त्वातील बारकावेही कळतील. शेतकऱ्यांबाबत (Farmer) त्यांनी एकदा नव्हे दोनदा आक्षेपार्ह विधाने केल्यामुळे त्यांच्या हेतूविषयीच शंका निर्माण झाली आहे.

- Advertisement -

अमरावती दौऱ्यात (Amravati Visit) तर त्यांनी हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. आम्ही तर एक रुपयात पीकविमा देतो, अशी भाषा करून बळीराजाची लायकीच काढली होती. परिणामी राज्यात संतापाचे मोहोळ उठले होते. तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी जबाबदारीने बोलण्याची तंबी त्यांना दिली होती. नंतर त्यांनी टीआरपीवरून इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांचाही रोष ओढवून घेतला होता. आता तर त्यांनी कहरच केला. जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांनी भरावे. कर्ज घ्यायचे आणि पाच ते दहा वर्षे कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. तोपर्यंत काही भरायचे नाही. कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचे तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का? तुम्हाला पाईपलाईनाला पैसे आहेत. सिंचनासाठी आहेत. शेततळ्यासाठीही आहेत. सरकार भांडवली गुंतवणूक करते. भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी म्हणतात की, पीकविम्याचे पैसे पाहिजेत, याचे पैसे पाहिजे. मग साखरपुडे करा, लग्न करा, असे माणिकराव म्हणाले.

खरेतर शेतकऱ्यांनी कधीही कर्जमाफी मागितलेली नाही. कर्जमाफीच्या घोषणा कोणी केल्या, सवलती कोण जाहीर करत होते, हे तरी माणिकरावांनी एकदा आठवायचे होते. राजकारण्यांना सत्तेसाठी ही अशी हौस करायची उबळ येते अन् नाहक शेतकरी बळीचा बकरा बनतो वास्तविक माणिकरावांची सारी कारकीर्द ग्रामीण भागात घडली आहे. महाविद्यालयीन शिक्षण नाशिकमध्ये झाले. पण जिल्हा परिषद, जिल्हा बँक, विधानसभा या निवडणुका त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवावरच लढल्या अन् जिंकल्या. याशिवाय दूध संघ, खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती अशा साऱ्या संस्थांवर सत्ता मिळवली तीदेखील शेतकरी बांधवांच्याच बळावर! असे असताना पाठोपाठ दोन वक्तव्य करून त्यांना शेतकऱ्यांविषयीची मळमळ व्यक्त कराविशी का वाटावी? ज्यांच्या जीवावर राजकीय जीवनातील सारे ऐश्वर्य भोगले, त्या शेतकऱ्यांबाबत माणिकरावांना असे बोलवलेच कसे, हा प्रश्न पडतो.

दोन्ही वक्तव्यांमधून त्यांचा शेतकरी बांधवांविषयीचा दूषित दृष्टिकोन दिसतो. अनेक तथाकथित शहरी विचारवंत शेतकऱ्यांना एवढ्या सवलती का, त्यांना आयकर लावा वगैरे मुक्ताफळे उधळतात तेव्हा त्यांची किव येत असली तरी त्यांना शेती व शेतकऱ्यांचे जीवन माहीत नसल्याने त्याकडे दुर्लक्ष तरी करता येते. परंतु माणिकराव हे जन्माने अन् कर्मानही शेतकरी आहेत. त्यांचे वडील कोपरगाव साखर कारखान्याचे कैक वर्षे संचालक राहिलेले आहेत. बंधू शेतकरी आहेत. माणिकरावांचा स्वतःचा डेअरी प्रोजेक्ट आहे. एवढेच काय पण शेतीतील अत्यल्प उत्पन्न दाखवूनच त्यांनी शासकीय सदनिका लाटल्या होत्या. त्यावरून त्यांना न्यायालयाने शिक्षाही ठोठावली आहे. त्यामुळे आमदारकीवरच पाणी सोडण्याचे संकट भिरभिरत असताना ही अशी वक्तव्ये करण्याची अवदसा माणिकरावांना का आठवावी? मंत्री (Minister) झालो म्हणजे काहीही बोलण्याचा परवाना मिळाला असा त्यांचा समज झालेला दिसतो.

या वक्तव्यावरून राज्यभर संताप व्यक्त होत असताना प्रभू श्रीरामचंद्राला साक्षी ठेवून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली हे बरे झाले! श्रीराम एकवचनी तर होतेच शिवाय प्रजाहितदक्ष होते, याचा विसर त्यांनी पडू देऊ नये. आपल्या वक्तव्याने जर शेतकऱ्यांना वाईट वाटले असेल तर… अशी मखलाशीही त्यांनी केली. म्हणजे दिलगिरीही सशर्त आहे. याला मराठीत सुंभ जळाला तरी पीळ कायम असे म्हणतात. समाज माध्यमांवर लोकांनी जी काही यथेच्छ चंपी केली आहे, त्यातून माणिकराव काही बोध घेतील असे त्यांचा स्वभाव पाहता वाटत नाही. हाताची घडी तोंडावर बोट असे त्यांच्याबाबत संभवत नाही. पुढील वक्तव्य ते कधी करतात याची मात्र नक्कीच वाट पाहता येईल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

MNS: …तर भैय्यांना मुंबईत ,महाराष्ट्रात राहू द्यायचे का यावर विचार करावा...

0
मुंबई | Mumbaiमनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे, मनसेची मान्यत्ता रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उत्तर भारतीय विकास सेनेचे...