नोव्हेंबर महिन्यात होणारी अमेरिकन निवडणूक खर्या अर्थाने ऐतिहासिक असेल. कारण यावेळी अमेरिकन भारतीयांच्या मतांची किंमत, रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांसाठी फार मोलाची आहे. अमेरिकेतील सर्वेक्षणानुसार बायडेनची आघाडी असली तरी 26 ऑगस्टला अमेरिकन स्टॉक मार्केटमधे ट्रम्प बायडेनला एकास तीन भाव होता. अमेरिकन भारतीय हे भारतीय हितसंबंधांचा विचार करून मतदान करतात की तेथील भौतिक परिस्थितीला अनुसरून, हे नोव्हेंबर महिन्यांमध्ये उघड होईल. ट्रम्पच्या अँटी व्हिसा पॉलिसीमुळे अमेरिकन भारतीय बायडेंनकडे झुकतील की बायडेनच्या सीएए, एनआरसी, कलम 370 विरोधामुळे ते ट्रम्पकडे जातील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे…
– कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)
आजतागायत अमेरिकेतील भारतीय डेमोक्रॅटिक पक्षाचे परंपरागत समर्थक होते. मात्र 03 नोव्हेंबर 2020 रोजी होणार्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुक रणधुमाळीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या भारत विरोधी धोरणामुळे अमे रिकन भारतीयांचा कल हळूहळू रिपब्लिकन पक्षाकडे झुकत चाललेला प्रत्ययाला येतो.
डेमोक्रॅटिक पार्टी अमेरिकन भारतीयांच विदा निर्मित पृथ:करण, आभासी सभा संबोधन, आभासी गटांमधील वार्तालाप आणि परस्पर प्रचारकरते आहे. बायडेननी भारताला आपल्याकडे खेचण्यासाठी इतरही काही पाऊल उचलली आहेत.
दुसरीकडे अमेरिकन भारतीय डेमोक्रॅटिक पक्षाकडे झुकू नयेत या उद्देशाने रिपब्लिकन पक्ष; त्यांना एशियन अमेरिकन अँड पॅसिफिक आयलँडर कम्युनिटीचा हिस्सा न मानता केवळ त्यांच्यासाठी, काही मोठे राजकीय करमणुकीचे कार्यक्रम आणि जनसभा घेणार आहे.
जाणकारांच्या माहितीनुसार 2018 मध्ये 52,194 आणि 2019 मध्ये 48,894 भारतीयांना अमेरिकन नागरिकत्व प्रदान करण्यात आल्यामुळे ते आता भावी मतदार झाले आहेत. अमेरिकेतील अंदाजे 25 लाख भारतीय मतदारांपैकी 14 लाख अमेरिकन भारतीय विस्कन्सिन, पेनसिल्व्हानिया, फ्लोरिडा आणि मिशिगनमध्ये सामील असणार्या नऊ बॅटल ग्राउंड स्टेट्समधे वास्तवास आहेत. अमेरिकेतील आशियाई नागरिकांमध्ये चीन आणि फिलिपिन्सनंतर भारतीय अमेरिकनांचा क्रमांक लागतो.
विद्यमान अमेरिकन राष्ट्रपती आणि त्याच पदासाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्रपती पदाचे उमेवार माईक पेन्स, हे भारताचे मित्र आहेत; पण डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि ओबामांच्या काळातील उपराष्ट्र्पती जो बायडेन हे त्यांच्या पक्षातील पुरोगामी गटाच्या दबावामुळे भारत विरोधात कार्यरत आहेत अशी भावना अमेरिकन भारतीयांमध्ये वेगाने वृद्धिंगत होतांना दिसून पडते.
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या ह्युस्टन आणि अहमदाबाद येथे झालेल्या जाहीर सभांमुळे मध्यमवयीन अमेरिकन भारतीय खूप प्रभावित झालेत हे देखील या शिफ्टिंग ऑफ लॉयल्टीचे मुख्य कारण आहे. जो बायडेन हे भारताने जम्मू काश्मिरमध्ये केलेल्या राजकीय सुधारणांवर जहरी टीका करणार्या ‘अजेंडा फॉर मुस्लिम अमेरिकन कम्युनिटी’ या संस्थेचे प्रणेते आहेत. त्यामुळे अमेरिकन भारतीयांमधील कट्टर डेमोक्रॅटिक समर्थक देखील संतप्त झाले आहेत. या संस्थेने केलेली टीका म्हणजे त्यांच्या पाठिंब्याने भारताच्या अंतर्गत कारभारातील हस्तक्षेप आणि सार्वभौमत्वावर केलेला आघात आहे, अशी अमेरिकन भारतीयांची धारणा झाली आहे. भारतातील अंतर्गत राजकारण आणि हिंदू मुस्लिम संबंधांमधली वाढती दरी अमेरिकेतील निवडणुकीचे निकाल ठरवणारा प्रमुख मुद्दा असणार आहे.
अमेरिकन इतिहासात पहिल्यांदाच डेमोक्रॅटिक पक्षाला अमेरिकन भारतीयांच्या मतांसाठी लढा द्यावा लागतो आहे. या बंडखोरांमध्ये वरिष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. मागील पिढीतल्या 40-70 वयोगटातील वरिष्ठ नागरिकांना उपहासाने काका काकू म्हणणारे आणि भारतातील बेरोजगारी, भ्रष्टाचार, कायद्याला पायदळी तुडवण्याची सवय, राजकारण्यांच्या अनास्थेबद्दल सरकारवर जहरी टीका करणारे अमेरिकन भारतीय तरुण कदाचित आजही डेमोक्रॅटिक पक्षासोबत असतील,पण त्यांच्या नगण्य संख्येमुळे डेमोक्रॅटीक पक्षाला स्वयं निरीक्षण करणे आवश्यक झाले आहे. म्हणूनच डेमोक्रॅट्स आता लोकांशी प्रत्यक्ष आणि जाहिरातींच्या माध्यमातून संपर्क साधण्यावर भर देताहेत.
जुलै महिन्यात जो बायडेननी सतत सहा दिवस, अमेरिकन भारतीयांवर 14 भारतीय भाषांमधल्या राजकीय प्रचाराचा वर्षाव केला. टोनी ब्लिंकेन आणि जेक सलिव्हन या वरिष्ठ सहकार्यांसोबत त्यांनी 15 ऑगस्टला अमेरिकन भारतीयांच्या सभेला संबोधित केले. ही तारीख आणि वेळ मुद्दाम निवडण्यात आली. कारण त्याच्या थोडे आधी भारताच्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला मार्गदर्शन केले होते. जो बायडेन अमेरिकन भारतीय ़फंड रेझर्स इतकेच महत्व सिलिकॉन व्हॅली/वॉल स्ट्रीटमधील अमेरिकन भारतीयांना ही देताहेत.
जुलैमध्ये डेमोक्रॅटीक नॅशनल कमिटी चेयरमन टॉम पेरेझ आणि भारतातील माजी अमेरिकन राजदूत रिचर्ड वर्मां यांनी जवळपास 1500 अमेरिकन भारतीयांच्या व्हर्च्युअल गँदरिंगशी संवाद साधत, आम्हाला बॅटल ग्राउंड स्टेट्समध्ये राहाणार्या भारतीयांची आणि त्यांच्या मतांची खास गरज आहे. तुम्ही आमच्यासाठी बहुमूल्य आहात अशी विनंती केली.
कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या पोस्ट इलेक्शन नॅशनल सर्व्हेनुसार, 2016 मध्ये 77 टक्के अमेरिकन भारतीयांनी हिलरी क्लिटंन यांना मते दिली होती. त्यापैकी 37 टक्के अमेरिकन भारतीयांनी ट्रम्प व त्यांच्या धोरणांवर अतिशय तीव्र टीका केली होती. पण ट्रम्पनी आतापर्यंत अमेरिकेच्या सर्व माजी राष्ट्र्पतींनी नाकारलेली शस्त्र-संसाधने भारताला दिली. पाकिस्तानला देण्यात येणार्या अमेरिकन मदतीत लक्षणीय कपात केली. भारतीय वायुसेनेचा वैमानिक अभिनंदन वर्थमानला सोडण्यासाठीइम्रान खानवर दबाव टाकला. त्याचबरोबर ताज्या भारत-चीन सीमावादात ते आणि अमेरिका उघडपणे भारताच्या बाजूने उभी राहिली आहे. यामुळे त्यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळातील काही वादग्रस्त परराष्ट्र आणि अंतर्गत धोरणांकडे अमेरिकन भारतीयांनी दुर्लक्ष केल्याचे दिसते.
डोनाल्ड ट्रम्पनी भारताच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करण्यावर टीका करण्यास नकार दिल्यामुळे अमेरिकेतील तमाम भारतीयांच्या मनात त्यांना मानाचे स्थान मिळाले आहे. 2016 मध्ये राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतांना ट्रम्पनी न्यू जर्सीतील रिपब्लिकन हिंदू कोआलिशन या संस्थेच्या कार्यक्रमात हजेरी लावून हिंदुत्वाच्या संकल्पनेला उघड पाठिंबा दिला होता. तसेच एका लेखाद्वारे मुस्लिम जिहाद्यांना नामशेष करण्याची धमकी दिली होती. त्यामुळेच नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांच्या अहमदाबाद भेटीवेळी अबकी बार ट्रम्प सरकार चा जयकारा पुकारला.
अलीकडेच ट्रम्प यांनी हिंदुज फॉर ट्रम्प या संघटनेच्या आभासी सभेला संबोधित केले. जवळपास 30,000 लोकांनी त्याच लाईव्ह भाषण आणि 70,000 लोकांनी त्यांच रेकॉर्डेड भाषण ऐकले. लाईव्ह भाषण ऐकणार्या अमेरिकन भारतीयांनुसार,आम्ही मुस्लिम अथवा बायडेन विरोधी नाही. पण बायडेननी हिंदू अमेरिकन लोकांशी कधी संवादच साधला नाही. त्यांच्यासाठी पाकिस्तानी, फिलिपिनो, लंकन, व्हिएटनामी,मलेशियन, भारतीय हे सर्व लोक ब्लडी साऊथ एशियन्स आहेत. बायडेन आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या शब्दकोषात अमेरिकन इंडियन हा शब्दच नाही. यानंतर जरी त्यांनी आम्हाला चुचकारण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना यश मिळणार नाही.
मजेची बाब म्हणजे, ट्रम्पनी एचवनबी व्हिसा, ग्रीन कार्ड आणि भारतीय विद्यार्थ्यांवर घातलेल्या बंदीबद्दल अमेरिकन भारतीयांच्या मनात सध्यातरी कुठल्याही प्रकारची कटुता दिसून येत नाही. कोरोनाचा प्रभाव संपला की विमानसेवा परत सुरू होऊन स्थिती मूळ पदावर येईल. कॉलेजेस बंद असतांना व्हिसा देऊन काय उपयोग झाला असता असा प्रश्न ट्रम्प समर्थक अमेरिकन भारतीय विचारतात. कोविद 19 कोरोनाच्या जगाला ग्रासलेल्या साथीमुळे आंतर्देशीय उड्डाण आणि प्रवासावर पडलेल्या स्वाभाविक बंधनांच्या पार्श्वभूमीवर, ट्रम्पनी ही तात्पुरती राजकीय खेळी अमेरिकन लोकांना खुश करण्यासाठी खेळली आहे असा निष्कर्ष काढल्यास तो चूक नसेल.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या रिचर्ड वर्मांनी ट्रम्प यांच्या या धोरणांवर टीका करताना, 2006चा भारत अमेरिका नागरी आण्विक करार, सिनेट फॉरीन रिलेशन्स कमिटीचे तत्कालीन चेयरमन जो बायडेनच्या सक्रिय समर्थनाशिवाय फलद्रुप झाला नसता हे ठासून सांगितल. त्याचप्रमाणे बराक ओबामा हे भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच स्थायी सदस्यत्व देण्याचा आग्रह धरणारे पहिले अमेरिकन राष्ट्रपती होते; त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षानी भारताला मेजर डिफेन्स पार्टनर ऑफ अमेरिका हा दर्जा बहाल करून,अत्याधुनिक हत्यारे आणि संसाधनांचे तंत्रज्ञान दिले हे सुद्धा अमेरिकन भारतीयांना सांगण्यात येत आहे.
असे असल तरी 2019-20मधे डेमोक्रॅटिक पक्षाच्या धुरंधर धुरिणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या सरकारचे सीएए आणि एनआरसी हे प्रकल्प, काश्मिर धोरण, हिंदुत्ववादी तत्वज्ञान, गो आस्था, रामजन्मभूमी मंदिराची पायाभरणी या मुद्द्यांवर धारेवर धरले. भारतामधील तथाकथित मानवाधिकार हननाच्या घटनांवर बायडेन आणि डेमोक्रॅट्स जहरी टीका करत असले तरी परंपरेला जागून 25 लाखांपैकी बहुसंख्य अमेरिकन भारतीय त्यांनाच मत देतील, असा त्यांना विश्वास वाटतो. किंबहुना याची डेमोक्रॅट्सना खात्री आहे. निवडणुकीदरम्यान अमेरिकन भारतीयांना आपल्याकडे खेचण्यासाठी, जो बायडेननी 2019 मध्ये आपल्या घरी दिवाळी साजरी केली आणि 2020 मध्ये गणेश चतुर्थीच्या शुभकामना दिल्या. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची निवड उपराष्ट्रपती पदासाठी करून त्यांनी अमेरिकन भारतीयांच्या काळजात हात घातला आहे. जो बायडेन आजवर राष्ट्रपती पदासाठी लढा देणारे सर्वात वयस्कर (77 वर्ष) उमेदवार आहेत. त्यामुळ यावेळी ते निवडून आले तरी 2024ची निवडणूक लढणार नाहीत, अशी सर्वसामान्यांची धारणा आहे.
त्यामुळे 2024 च्या निवडणुकीसाठी कमला हॅरिसच राष्ट्रपतीपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार असतील. अमेरिकन भारतीय माणसाला पहिल्यांदा राष्ट्रपतिपद मिळणे हे बायडेनना निवडून देण्यासाठी अमेरिकन भारतीयांसमोर लटकणारे सर्वात लोभस गाजर आहे असे म्हटल्यास ते ऑफ द मार्क नसेल. 2016 मध्ये केवळ 20 टक्के अमेरिकन भारतीयांनी रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्पना मत दिले होते. मात्र यावेळी ट्रम्प मोदी मैत्रीमुळे हा टक्का खूप मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
एकंदरीत पाहता आगामी अमेरिकन निवडणूक खर्या अर्थाने ऐतिहासिक असेल. कारण यावेळी अमेरिकन भारतीयांच्या मतांची किंमत, रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांसाठी फार मोलाची आहे. अमेरिकेतील सर्वेक्षणानुसार बायडेनची आघाडी असली तरी 26 ऑगस्टला अमेरिकन स्टॉक मार्केटमधे ट्रम्प बायडेनला एकास तीन भाव होता. मागच्या निवडणुकीच्या वेळी ट्रंप यांच्या जिहाद विरोधी वक्तव्यामुळे प्रभावित होऊन प्रस्तुत लेखकाने त्यांच्या विजयाच आणि विजयी झालेत तर ते भारतातील जिहादी लढ्यासाठी फायदेशीर असेल अस भविष्य वर्तवले होत. मागील चार वर्षात ते या कसोटीवर खरे उतरल्याचे प्रत्ययाला येत. अमेरिकन भारतीय हे भारतीय हितसंबंधांचा विचार करून मतदान करतात की तेथील भौतिक परिस्थितीला अनुसरून, हे नोव्हेंबर महिन्यांमध्ये उघड होईल. ट्रम्पच्या अँटी व्हिसा पॉलिसीमुळे अमेरिकन भारतीय बायडेंनकडे झुकतील की बायडेनच्या सीएए/एनआरसी विरोधामुळे ते ट्रम्पकडे जातील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.