Monday, June 17, 2024
HomeUncategorizedतिढा परीक्षांचा गरज मध्यम मार्गाची

तिढा परीक्षांचा गरज मध्यम मार्गाची

जेईई आणि नीट परीक्षांचा जो घोळ सध्या सुरू आहे, तो आरोग्य महत्त्वाचे की करिअर, या प्रश्नातून उद्भवला आहे. या दोन्ही गोष्टी या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, हे मान्य करून विचार सुरू केला, तरच याबाबतीत मध्यममार्ग काढता येणे शक्य होईल. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि करिअरही महत्त्वाचे आहे. त्यांचे वर्ष वाया जाता कामा नये आणि परीक्षा केंद्रावर इतर विद्यार्थ्यांकडून करोनाची बाधाही त्यांना होता कामा नये. चीनमधील बहुचर्चित गाओकाओ परीक्षांचे संचालन कसे केले गेले, हे पाहिल्यास आपल्यालाही मध्यममार्ग सुचू शकतो…

- Advertisement -

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांचा मुद्दा सध्या खूपच तापला आहे. जून 2020 मध्ये होणारी जेईई (मेन) आणि नीट (2020) परीक्षा कोविड-19 च्या प्रकोपामुळे सतत लांबणीवर पडत आहे. या दोन्ही परीक्षांच्या बाबतीत दोन मतप्रवाह दिसत असून, दोन्ही प्रबळ आहेत. या परीक्षा सप्टेंबरमध्ये आयोजित केल्या जाव्यात, असे केंद्र सरकारला वाटते. असे झाल्यास विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाचू शकेल. परंतु करोनाचे संकट टळल्यानंतरच परीक्षा घेण्यात याव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

आधी या परीक्षा एप्रिलमध्येच घेतल्या जाणार होत्या आणि नंतर मुदतवाढ देऊन त्या जुलैपर्यंत टाळण्यात आल्या होत्या. करोनाचा संसर्ग संपूर्ण देशभरात पसरल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला होता. संसर्गाची भयावह स्थिती लक्षात घेऊनच या परीक्षा पुन्हा सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या. आता यापुढे आणखी मुदतवाढ देणे म्हणजे पुढील सत्राचे शिक्षण एक वर्षे मागे पडणे, असाच अर्थ होईल.

नव्या सत्रातील प्रवेश वर्षभरासाठी पुढे ढकलले जातील. कारण दीपावलीनंतर बिहारमध्ये छठपूजेचा उत्सव सुरू होईल. यावर्षी छठपूजाही नोव्हेंबर महिन्यातच येत आहे. सचिवांच्या म्हणण्यानुसार, हे उत्सव जमेस धरल्यास परीक्षा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलाव्या लागतील आणि त्याचे निकाल नवीन वर्षात म्हणजेच 2021 मध्ये येतील. यामुळे विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्ष वाया जाईल. नवे प्रवेश 2021 मध्ये दिले जातील आणि नवे वर्गही तेव्हाच सुरू होतील.दुसरीकडे, या तर्काच्या विरोधात जे स्पष्टीकरण दिले जात आहे, तेही सबळ आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, करोनाचा संसर्ग पसरण्याचा वेग वाढला आहे. सप्टेंबरमध्ये जर परीक्षा घेतल्या तर संसर्ग फैलावण्याचा धोका वाढेल.

शिवाय, जर परीक्षा दिल्यानंतर एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात आले तर त्याच्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. जेईई आणि नीट या परीक्षांना बसणार्‍या विद्यार्थ्यांची एकूण संख्या तब्बल 25 लाख एवढी आहे. त्याचबरोबर आसाम आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये सध्या महापुराचा प्रकोप सुरू आहे. या राज्यांमधील परीक्षार्थींना परीक्षा द्यायची झाल्यास त्यांची व्यवस्था कशी करणार, हा प्रश्न आहेच. परीक्षा केंद्रांवर अशी व्यवस्था करावी लागेल, जेणेकरून एका परीक्षार्थीकडून दुसर्‍या परीक्षार्थीपर्यंत संसर्ग पोहोचण्याचा धोका टाळता यावा. परंतु त्याहूनही अवघड प्रश्न म्हणजे, परीक्षार्थी परीक्षा केंद्रे असलेल्या शहरांपर्यंत पोहोचणार कसे? पोहोचलेच तरी तिथे त्यांच्या राहण्यापासून सर्व व्यवस्था करोनाचा धोका टाळून करावी लागेल. हे शक्य होणार का, असा परीक्षार्थींचा सवाल आहे.

परीक्षा केंद्रांच्या निवडीपासून परीक्षार्थींच्या निवासाची आणि प्रव-ासाची सोय करण्यापर्यंतच्या सर्व बाबी सरकारच्या प्राधान्यक्रमात आजमितीस आहेत का? या प्रश्नांना जोपर्यंत प्राधान्य मिळत नाही, तोपर्यंत या परीक्षा घेणे योग्य ठरणार नाही, असा विद्यार्थ्यांचा युक्तिवाद आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारला एखादा असा मध्यम मार्ग काढावा लागेल, ज्याद्वारे विद्यार्थ्यांचे वर्षही वाया जाणार नाही आणि त्यांना करोनाच्या संसर्गाचाही धोका नसेल.

परंतु हेच काम अत्यंत कठीण असून, करोनाचा संसर्ग वाढणे अथवा कमी होणे या सरकारच्या हातात असलेल्या गोष्टी नाहीत. या प्रकोपापासून बचाव करण्यासाठी सावधगिरीने पावले उचलणे एवढेच केवळ सरकारच्या हातात आहे. अर्थात, करोनामुळे जीवन थांबू शकत नाही, असे सांगून सर्वोच्च न्यायालयानेही परीक्षा घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. परंतु साकल्याने पाहिल्यास जीवनापेक्षा महत्त्वाचे काहीच नाही, हे मान्य करावे लागते.‘जान है तो जहान है,’ असे म्हटले गेले आहे. परंतु जिवाच्या अस्तित्वासाठी जगाचे अस्तित्वही गरजेचे आहे. त्यामुळे या दोन्ही विचारांदरम्यान संतुलन निर्माण करणे आवश्यक असून, नव्या पिढीच्या मनातून करोनाची भीती दूर होईल अशा प्रकारे हे संतुलन घडवून आणले पाहिजे. तसे पाहायला गेल्यास जगाचे व्यवहार करोनाच्या प्रसारकाळातही सुरूच आहेत; परंतु जीवनाची सर्व क्षेत्रे पूर्वीसारखी झळाळी धारण करतील एवढा या व्यवहारांचा वेग वाढलेला नाही. परीक्षा होणे अत्यंत गरजेचे आहे, याबाबत दुमत असण्याचे कारणच नाही.

परंतु परीक्षा-र्थींचे रक्षणही व्हायला हवे. त्यामुळेच एख-ादा मध्यममार्ग शोधण्याची तीव्रतेने गरज निर्माण झाली आहे. यासाठी ऑनलाइन परीक्षेचा एक पर्याय आहे; परंतु देशाची विविधता पाहिल्यास हा मार्ग शक्य नाही, हे लक्षात येते. कारण देशातील 70 टक्के गरीब विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन सुविधांसाठी संगणक किंवा अन्य उपकरणे नाहीत. त्यामुळेच परीक्षा घेण्याचा एखादा वेगळाच मार्ग शोधून काढावा लागेल. असे झाल्यास विद्यार्थ्यांचे वर्षही वाया जाणार नाही आणि करोनाच्या संसर्गाची भीतीही राहणार नाही.आपण सध्या अशा टांगत्या अवस्थेत सापडलो असलो, तरी जगभरात इतरत्र अशा प्रवेश परीक्षा कशा घेतल्या जात आहेत, याचा किमान अभ्यास आपण करायला हवा. प्रचंड मोठी तांत्रिक व्यवस्था असल्यामुळे अनेक देशांना या परीक्षा घेणे कोविडकाळातही शक्य होत आहे.

चीनमधील गाओकाओ परीक्षेदरम्यान यावर्षी जी संकटे आली, ती भारतासमोर उभ्या ठाकलेल्या संकटांसारखीच होती. या संकटातून कशी सुटका करून घेतली गेली? चीनची बहुचर्चित गाओकाओ परीक्षा यावर्षी आठ आणि नऊ जुलै रोजी झाली होती. त्या परीक्षेस एक कोटी दहा लाख विद्यार्थी बसले होते. त्यावेळी चीनमधील करोनाची स्थिती आज भारताची आहे, त्यापेक्षा थोडी सौम्य होती. तरीही चीनने परीक्षेसाठी जय्यत तयारी केली. मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शक सूचना आणि नियम जारी केले. सर्वच्या सर्व एक कोटी दहा लाख विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे परीक्षेच्या आधी दोन आठवडे बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. त्यासाठी आरोग्य निरीक्षकांच्या नियुक्त्या मोठ्या संख्येने केल्या. सुमारे दहा लाख परीक्षा निरीक्षकांनी यावर्षीच्या परीक्षांचे संचालन केले. याव्यतिरिक्त चीनमध्येही भारताप्रमाणेच सर्व बाबींचा अवलंब करण्यात आला. याचाच अर्थ असा की, करिअर आणि जीवन दोहोंचे रक्षण एकाच वेळी करणे शक्य असते. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परी-क्षेपूर्वीच नजर ठेवल्यामुळे पुढील गोष्टी सोप्या होऊ शकतात, हे आपण या उदाहरणावरून लक्षात घेतले पाहिजे. यालाच मध्यममार्ग असे म्हणतात.

जयदेवी पवार

- Advertisment -

ताज्या बातम्या