Friday, May 3, 2024
Homeसंपादकीयकरोना विषाणू कधी संपणार ?

करोना विषाणू कधी संपणार ?

करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटात आपला देश 30 जूनपर्यंत लॉकडाऊन आहे. कामकाज बंद ठेवणं, संपूर्ण शहरे बंदिस्त ठेवणं दीर्घकाळ परवडणारं नाही, हे स्पष्टच आहे. यामुळे प्रचंड मोठं आर्थिक,सामाजिक व शैक्षणिक नुकसान होत आहे व आरोग्य संस्थांवरील ताण वाढून विपरीत परिणाम होत आहे. अशा वेळी, कोरोना विषाणूची साथ कधी आटोक्यात येणार? असे प्रश्न सर्वांसमोर उभे आहेत.

जगात कोरोना विषाणूचा संसर्ग 99 लाखा पेक्षा जास्त व कोव्हीड-19 ने मृत झालेल्यांची संख्या 5 लाखापर्यंत पोहचली.जागतिक स्तरावर कोरोनाग्रस्तांची संख्या दररोज वाढते आहे. 15 मार्च रोजी रुग्ण संख्या एका दिवसाला 13200 वरून 26 जून पर्यंत ही संख्या 1 लाख 95 हजार झाली. तर भारतात 6 एप्रिल पर्यंत हा दर एका दिवसाला 608 वरून 26 जूनला 17300 वर पोहचला. या आकडेवारीनुसार दर दिवशीं कोव्हीड-19 ची रुग्ण संख्या किती झपाट्याने वाढते आहे याचे आकलन झालेच असेल. आजच्या स्थितीत भारतात लागण झालेल्यांची संख्या 5 लाख पोहोचलीये व महाराष्ट्र 1लाख 50हजार संख्येसह देशात आघाडीवर आहे.

- Advertisement -

आठवड्यापूर्वी सिंगापूरच्या संशोधकांनी कोरोना विषाणू कधी नष्ट होईल या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला होता. सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी ऍन्ड डिझाइनच्या संशोधकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने जगभरातील कोरोना प्रकरणांचं विश्लेषण केल्यानंतर, 131 देशांमध्ये कोणत्या देशात कोरोना कधी संपू शकतो, याबाबत सांगितलं होते.

जगभरातील कोरोना रुग्णांची माहिती ऑवर वर्ल्ड इनया वेबसाईटवरुन घेण्यात आली होती. गणितीय मॉडेलिंगच्या माध्यमातून यूनिव्हर्सिटीने असा अंदाज वर्तवला आहे की, जगभरातून कोरोना व्हायरस 21 मेपर्यंत 97 टक्क्यांपर्यंत संपेल. तर 8 डिसेंबर 2020 पर्यंत 100 टक्के संपणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. जागतिक स्तरावर दरदिवशी कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या पाहिली तर यांचा 21 मे पर्यंतचा पहिला अंदाज फोल ठरला. जागतिक आरोग्य संघटनेकडून कदाचित हा विषाणू कधीच संपणार नाही, असा धोक्याचा इशारा 13 जूनच्या पत्रकार परिषदेत दिला आहे.

अशात जागतिक आरोग्य संघटनेच्या कर्करोग कार्यक्रमाचे माजी संचालक प्रोफेसर करोल सिकोरा यांनी कोरोना विषाणूची लस शोधण्यापूर्वीच कोरोना संपून जाईल, असा दावा केलाय. तर थकज च्या इमर्जन्सी विभागाचे संचालक डॉ. माईक रेयान यांच्या मते कोरोना विषाणूवर लस विकसित झाली तरीदेखील विषाणूला आळा घालण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील. साथीचे आजार पसरवणार्‍या इतर अनेक विषाणूंप्रमाणे हादेखील एक विषाणू असेल आणि तो आपल्या समाजातून कधीच संपणार नाही.

एड्स रोगास कारणीभूत ठरणार्‍या एचआयव्ही विषाणूही हद्दपार झालेला नाही. मात्र, त्याचा विरोधात लढण्यासाठी उपचार पद्धती विकसीत झाल्याने लोकांमध्ये याबाबत भीती कमी झालीये. जगभरातील अग्रगण्य प्रयोगशाळा, विद्यापीठ व औषध निर्माण संस्थेत 100 हून जास्त लसींवर संशोधन सुरू आहे. आपल्याला माहिती आहे की गोवरसारखे अनेक आजार आहेत ज्यावर लस उपलब्ध आहेत. मात्र, तरीही या आजारांचं समूळ उच्चाटन झालेलं नाही. तर या विषाणूवर प्रयत्नपूर्वक नियंत्रण मिळवणं अजूनही शक्य असल्याचा आशावाद जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. घेब्रेयेसूस यांनी व्यक्त केला आहे.

लॉकडाऊन उठवणं योग्य ठरेल असे वाटत नाही कारण कोरोना संसर्गाचा उद्रेक होण्याचा धोका आहे. जनजीवन सामान्य होण्यासाठी अजून बराच वेळ लागणार आहे व कोरोना विषाणू संपूर्ण नायनाट करणे जवळच्या काळात शक्य नाही म्हणून कोव्हीड-19 ला तोंड देण्यासाठी खबरदारीने पावलं उचलावी लागतील. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कामकाज सुरू करावं लागणार असून, हे एक प्रचंड मोठं वैज्ञानिक आणि सामाजिक आव्हान असणार आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपल्या वागण्यामध्ये वा सवयींमध्ये कायमचे बदल घडवुन आणले तरच संक्रमणाचं प्रमाण कमी होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या