वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरें ।
पक्षी ही सुस्वरे आळवित ।
संत तुकारामांच्या अनेक अभंगांपैकी या एका अभंगातील पंक्ती. याचा भावार्थ म्हणजे..वृक्ष-वेली, प्राणी आम्हाला खूप प्रिय आहेत. पक्ष्यांचेही सुमधुर स्वर कानी पडतात. या अभंगातील पंक्ती आपल्याला वृक्ष, वेली, पक्षी, प्राणी यांच्या अगदी जवळ नेतात. या अर्थाने आपल्याला प्रिय असणार्या या वृक्ष वेलींची व पक्षी-प्राण्यांची जपणूक आपल्यालाच करायची आहे.
परंतु, शहरीकरणाच्या व औद्योगिक विकासाच्या नावाखाली सातत्याने तसेच निर्दयीपणे होणार्या जंगलतोडीच्या वाढत्या समस्येबरोबरच ह्या वृक्षवेली पक्षी-प्राण्यांचेही आयुष्य धोक्यात येत आहे, हे सर्वांनाच ज्ञात आहे. भारतीय वनसर्वेक्षणानुसार गेल्या 30 वर्षांत भारतातील दोन तृतीयांश जंगलाचा भाग जो हरियाणा राज्याच्या आकारमान इतका आहे, त्यावर वेगवेगळे हेतू साध्य करण्यासाठी अतिक्रमण व औद्योगिक प्रकल्पांनी ताबा मिळवलेला आहे.
भारतीय वनविभागाच्या म्हणण्यानुसार पडलेल्या प्रत्येक झाडामुळे निर्माण होणारा तोटा भरून काढायचा असेल तर किमान 10 झाडांची रोपे लावणे गरजेचे आहे. परंतु, ही प्रथा क्वचितच पाळली जाते. आपल्या सर्वांना हे माहीत आहे की, ‘वने’ आपल्याला पर्यावरणीय संतुलन राखण्यास आणि कार्बनचा ठसा कमी करण्यास मदत करतात. तथापि, कितीतरी हेक्टर्स जंगले प्रत्येक मिलीसेकंदाला तोडली किंवा जाळली जातात…अकल्पनीय आहे….नाही का..? झाडे व जंगल नसलेल्या जगातही आपण अस्तित्वात राहू शकतो का? असा प्रश्न जर आपण स्वतःला केला तर उत्तर मिळेल …….नाही.!
वृक्षांचे महत्त्व लक्षात घेता वृक्षलागवडीची खर्या अर्थाने ओळख ही 1 जुलै 1947 मध्ये झाली. वृक्षारोपणाची पहिली मोहीम ही अब्दुल कलाम आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे पार पडली. यानंतर वनसंवर्धन व जंगलतोडीच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी 1 जुलै 1950 मध्ये भारताचे केंद्रीय कृषी व अन्नमंत्री डॉ. के.एम मुंशी यांनी संपूर्ण भारतात ‘वन महोत्सवाची’ संकल्पना उदयास आणली.
डॉ. मुंशी यांना हा कार्यक्रम केवळ वृक्षारोपण मोहीम म्हणून नव्हे तर उत्सव म्हणून समजावा, अशी इच्छा होती. भारतात पावसाळ्याच्या सुरुवातीस साधारणतः जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा उत्सव आयोजित करण्याचा कार्यक्रम योजिला जातो. या वनमहोत्सवाच्या काळात झाडे लावण्यामुळे पर्यायी इंधन प्रदान करणे, अन्नधान्याच्या संसाधनांचे उत्पादन वाढवणे, शेतीक्षेत्राभोवती निवारा पट्टे तयार करणे, उत्पादकता वाढविणे, गुरांना अन्न पुरवणे, सावली व सजावट सुशोभन करणे, मातीची व जमिनीची धूप थांबविणे असे विविध उद्दिष्टे साध्य करण्यास मदत होते. शिवाय ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षलागवड हा एक उत्तम मार्ग आहे.
वनमहोत्सव हा अतिशय महत्त्वाचा विषय व उपक्रमही आहे आणि म्हणूनच या विषयावर आधारित प्रश्न बहुधा विविध सरकारी स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाण्याची शक्यता असते. वनमहोत्सवाचे महत्त्व लक्षात घेता, या विषयाची ओळख शालेय विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून हा विषय शालेय अभ्यासक्रमात नमूद करण्यात आला. जेणेकरून या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांमध्ये वृक्षलागवडीचे तसेच वनसंवर्धनाचे बिजे रोवली जातील व येणार्या भावी पिढीचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल.
हवामान बदलाची सर्वात मोठी समस्या ही या वृक्षतोडीने निर्माण होऊ शकते. जर वेळीच योग्य त्या उपाययोजना राबवल्या नाही तर..! म्हणून बराच उशीर होण्यापूर्वी या समस्येवर लक्ष केंद्रित करणे अत्यावश्यक आहे. अशाप्रकारे ‘वनमहोत्सवसारखे सण’ ही काळाची गरज आहे. वनमहोत्सव वृक्षांची घटती संख्या कमी करण्यास तसेच पर्यावरणात योग्य तो समतोल घडवून आणण्यास मदत करेल.
साधारणतः वन महोत्सवांतर्गत स्थानिक परिस्थिती लक्षात घेता मूळ झाडांची लागवड केली जाते. कारण या मूळ झाडांमध्ये त्या स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता चांगल्या प्रकारे असते. शिवाय या मूळ वृक्षांचा जगण्याचा दर खूपच जास्त असतो.
याव्यतिरिक्त मूळ, झाडे, पक्षी, कीटक आणि प्राणी यांना समर्थन देतात, आणि म्हणूनच राज्य सरकार आणि नागरी संस्था तसेच संघटना या आठवडाभराच्या उत्सवात वृक्षारोपण करण्यासाठी शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था संस्था, कल्याणकारी संस्था यांना विविध प्रकारची रोपे विनामूल्य पुरवीत त्यांना प्रेरित करत या वनमहोत्सवास चालना देतात. या उत्सवांतर्गत दरवर्षी लाखो रोपट्यांची लागवड केली जाते. परंतु नितांत गरज असते, ती काळजीपूर्वक त्यांच्या संगोपनाची.
‘वनमहोत्सव’ म्हणजे जीवनाचा एक सण आहे, असे मला वाटते. म्हणूनच भारताचा एक सुजाण नागरिक या नात्याने प्रत्येकाने वृक्षारोपण व संवर्धन करून हा उत्सव साजरा करण्याचा संकल्प करावा.वृक्ष लागवडीचे लक्ष्य साध्य करायचे असेल तर लाखोंने नव्हे तर कोटींनी वृक्षारोपण करावीत आणि इतक्या मोठ्या संख्येने वृक्षारोपण करणे म्हणजे मोठ्या जबाबदारीचे काम आहे. हे काम एक व्यक्ती करू शकत नाही, त्यासाठी लोकसहभागातून हे ध्येय साध्य करता येईल. शिवाय ही एक सामूहिक जबाबदारी आहे.
कोटीने वृक्षारोपण करण्याच्या या मिशनकडे एक इव्हेंट म्हणून बघता यावर्षी 1 ते 7 जुलै हा वृक्षारोपण सप्ताह म्हणून साजरा करायचा तर पुढील येत्या वर्षात तो पंधरवडा म्हणून साजरा करत आपल्या वसुंधरेला हिरवा शालू पांघरून गतवैभव प्राप्त करून देण्याची आपली वैयक्तिक जबाबदारी प्रत्येकाने पार पाडावी.