श्रीराम जोशी| 9822511133
पंधरा वर्षांपूर्वीचा तो दिवस मला आजही आठवतो….2009मधील विधान परिषदेच्या नगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील उमेदवारी माघारीचा तो शेवटचा दिवस होता… काँग्रेसकडून जयंत ससाणे, शिवसेनेकडून डॉ. राजेंद्र पिपाडा व अपक्ष अरुणकाका जगताप उमेदवार होते… कोण रिंगणात राहते व कोणात लढत होते याची उत्सुकता होती….दुपारी अडीचची वेळ होती… जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पोर्चमध्ये एक चारचाकी आली व सरळ जिल्हाधिकार्यांच्या नगर निवास या निवासस्थानाच्या लोखंडी दरवाजाजवळ जाऊन थांबली…दादा कळमकर व अरुणकाका जगताप असे दोघेच त्या गाडीत होते…इकडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पोर्चमध्ये श्रीरामपूरचे माजी आमदार जयंत ससाणे अस्वस्थ होते…येरझर्या घालत गाडीकडे पाहात होते…पत्रकार म्हणून मी एकटाच तेथे होतो….या सगळ्या घडामोडींचे मलाही कुतूहल होतेच…
पावणे तीन वाजले आणि गाडीचा दरवाजा उघडला गेला….दादा कळमकर मोबाईल फोनवर बोलत बाहेर आले….कोणाशी तरी त्यांचा संवाद सुरू होता…3-4 मिनिटे ते बोलले व पुन्हा गाडीत बसले….क्षणार्धात गाडी सुरू झाली व पोर्चमध्ये वळसा घालून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडू लागली….ते पाहिल्यावर जयंत ससाणे अस्वस्थ झाले….त्या गाडीजवळ ते गेले…गाडीच्या काचा खाली झाल्या….जयंतराव म्हणत होते….काका, असे करू नका. माघार घ्या. माझे राजकीय करियर संपून जाईल. सारे अवघड होऊन जाईल….तुमच्यावर माझी सारी भिस्त आहे…त्यांचे बोलणे सुरू होते…त्यांनी हात जोडलेले होते…गाडीतून काहीही प्रतिसाद आला नाही….त्यांचे बोलणे झाले आणि गाडीच्या काचा वर होऊन गाडी दुसर्या क्षणी पोर्चबाहेर पडली…इकडे ससाणेंनी डोक्याला हात लावला व तेही त्यांच्या समर्थकांसमवेत लगेच बाहेर पडले. मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण मलाही हात जोडले व नंतर बोलतो म्हणून ते निघून गेले. त्या घटनेनंतर माघारीची मुदत संपल्याने रिंगणात किती राहिले व मतदान प्रक्रियेविषयी जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेऊन मी त्यावेळी काम करीत असलेल्या सकाळ कार्यालयात आलो व निवडणुकीची बातमी केली तसेच विशेष बातमी पान 1 साठी दिली….माघार घेता घेता काका माघारी वळले….त्यात हा सगळा घटनाक्रम दिला.
दुसर्या दिवशी सकाळच्या पहिल्या पानावर ही बातमी ठळक स्वरुपात छापून आली आणि सकाळीच मला अरुणकाकांचा फोन आला….श्रीरामजी, खूप मस्त बातमी दिली तुम्ही… मी त्यांना धन्यवाद म्हटले व आपण आता आमदार झालाच आहात, त्यामुळे सर्वात आधी आमदारकीच्या तुम्हाला शुभेच्छा देतो…अभिनंदन करतो…असे त्यांना म्हटले…त्यावर ते म्हणाले, अहो श्रीरामजी, थांबा जरा. अजून मतदान व्हायला वेळ आहे. मी म्हटले, नाही हो काका….दादा व भय्या तुमच्यासमवेत असल्यावर तुम्ही आजच आमदार झालात…त्यावर ते मोठ्याने हसले….तुमचा अभ्यास चांगला आहे, तसे जर झाले तर तुमच्या तोंडात पहिली मी साखर भरवेन….मी धन्यवाद म्हणून व पुन्हा त्यांचे अभिनंदन करून संभाषण संपवले….
त्यानंतर, निवडणूक सुरू झाली. त्याच्या बातम्याही त्या-त्यावेळी दिल्या. कोणत्या राजकीय घडामोडी घडत आहेत, कोण कोणाबरोबर आहे, कोणाचे पारडे जड आहे….अशा बातम्या सुरूच होत्या. त्यानंतर प्रत्यक्ष मतदान झाले. मतमोजणीच्यावेळीही मी होतो. डॉ. पिपाडांना 85, ससाणेंना 180 व अरुणकाकांना 220 मते मिळाली. अरुणकाका 40 मतांनी निवडून आले व आमदार झाले. मतमोजणीच्या ठिकाणीच त्यांनी मला मिठी मारली. तो आनंदक्षण आम्ही दोघांनीही अनुभवला. आजूबाजूचे अनेकजण व माझे पत्रकार मित्र तो क्षण पाहातच राहिले. माघार घेता घेता आमदार झालेले अरुणकाका त्यामुळेच जास्त लक्षात राहिले. त्यानंतर 2016मध्ये ते पुन्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघातून ते आमदार झाले. नगरपालिका, महापालिका, क्रिकेट असोसिएशन, आयुर्वेद महाविद्यालय आदी माध्यमांतून अरुणकाकांशी मैत्रीचे संबंध आधीपासून होतेच. मात्र, ते पहिल्यांदा आमदार झाले व त्यासंबंधित बातम्यांशी माझा व्यक्तिगत संबंध राहिला…या आठवणी आज मनात दाटून आल्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धाजली….