सुरेखा बोऱ्हाडे
भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. या सदरातून ओळख करून घेऊया भारतवर्षातील अशाच काही देदीप्यमान शलाकांची.
संत कवयित्री म्हणून महाराष्ट्राच्या हृदयात संत जनाबाईंच्या अभंगातील ओव्या कोरल्या गेल्या आहेत. जनाबाईंच्या नावावर असलेले जवळजवळ 350 अभंग सकल संत गाथा या ग्रंथात समाविष्ट झाले आहेत. आजही ग्रामीण भागातील महिला जात्यावर दळण दळतांना जनाबाईंच्या ओव्या गुणगुणतात.
जनाबाईंचा जन्म परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील माझ्या वडिलांचे दैवत। तो हा पंढरीनाथ॥ या ओळींवरून त्यांचे वडील दमा हे देखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या.
जनाबाई पाच-सहा वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांनी जनाबाईंला संत नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे पाठवले. नामदेवांचे आई-वडील, थोरली बहीण, पत्नी, चार मुलगे, चार सुना, एक मुलगी, संत जनाबाई व संत नामदेव असे 15 माणसांचे हे कुटुंब होते. जनाबाईंच्या लाघवी आणि देवभक्त स्वभावामुळे त्या लवकरच नामदेवांच्या कुटुंबातील एक सदस्य झाल्या. ‘नामयाची दासी’ असं स्वतःला म्हणून घेत असतांना त्यांना आनंद व्हायचा.
संत नामदेवांच्या घरात वावरतांना जनाबाईंचे विश्व तरी केवढे असणार? अंगण, तुळशीवृंदावन, शेण, गौर्या वेचायाची जागा, कोठार, माजघर. या सर्व शब्दांचा उल्लेख जनाबाईंच्या ओव्यांमधून आपल्याला होतांना दिसतो. या रोज गाठ पडणार्या गोष्टींमध्येे त्यांना परमेश्वर दिसतो,भेटतो यातच ती भगवंताला शोधते. प्रत्येक गोष्टीत भगवंत दिसावा एवढे तिचे मनाचे चःक्षु विशाल झालेले आपल्याला दिसतात. हा निर्विकार भाव जनाबाईंचे व्यक्तिमत्व कितीतरी उंचीवर नेऊन ठेवतो.
पक्षी जाय दिगंतरां । बाळकांसी आणी चारा ॥1॥
घार हिंडते आकाशीं । झांप घाली पिल्लापासीं ॥2॥
माता गुंतली कामासी । चित्त तिचें बाळापाशीं॥3॥
वामर हिंडे झाडावरी । पिलीं बांधुनी उदरीं ॥4॥
तैंसी आह्मासी विठ्ठल माये । जनी वेळोवेळां पाहे ॥ 5॥
असे विठ्ठल भक्तीरसातील ओतप्रोत भिजलेले काव्य जनाबाई रचत आणि गात असत.
संत नामदेव विठ्ठल भक्त असल्यामुळे जनाबाईंनाही विठ्ठलाच्या भक्तिविषयी गोडी निर्माण झाली. कोणतेही काम करत असतांना त्या सतत परमेश्वराच्या नावात तल्लीन राहात असत. काम करतांना त्या नामात एवढ्या तल्लीन होउन जात असत की ते कार्य त्यांच्याकरता देवाचे कार्य होऊन जात असे.
संत जनाबाई यांनी अनेक अभंग, कविता आणि ओव्या गायल्या आहेत. संत नामदेवांनी जनाबाईंबद्दल लिहिलेले अभंग स्पष्टपणे जनाबाईंचे मोठेपण समोर आणतात. नामदेवांनी तिला पाहिले तेव्हापासूनच तिला आपली बहीण म्हणून स्वीकारले. विठ्ठल भक्तित त्या इतक्या तल्लीन होऊन जात असत की प्रत्यक्ष विठ्ठल त्यांना कामात सहाय्य करत असे.
झाडलोट करी जनी। केर भरी चक्रपाणी॥
पाटी घेऊनियां शिरी। नेऊनियां टाकी दुरी॥
ऐसा भक्तिसी भुलला। कामें करूं लागला॥
जनी म्हणे विठोबाला। काय उतराई होऊ तुला॥
जनाबाई म्हणतात मी झाडलोट केली तर माझा श्रीहरी केर उचलतो. दुरू जाऊन फेकून देतो. माझ्या भक्तिला माझा विठ्ठल असा भुलला की माझी सगळी कामे तो करू लागला.याची परतफेड मी कशी आणि कोणत्या प्रकारे करणार आहे? विठ्ठला मी तुझी कशी उतराई होऊ?
संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत.
‘विठू माझा लेकुरवाळा,
संगे गोपाळांचा मेळा॥’
हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच.
महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात.
विठ्ठल भक्ती करताना आणि नामदेवांच्या घरी दासी म्हणून काम करताना जनाबाईंना अनेक संकटांचा, दुःखांचा सामना करावा लागला. प्रसंगी चोरीचा आळही त्यांच्यावर आला. परंतु या सर्वातून जणू विठ्ठल आपल्याला वाचवतोय असाच भाव त्यांच्या गीतातून कायम व्यक्त होत राहिला. स्त्रियांची कुचंबणा, त्याकाळातली त्यांची स्थिती हे सर्व हे त्यांच्या अभंगातून व्यक्त झाले. त्यामुळे जनाबाईंचे अभंग स्त्रियांना आपले वाटले.
त्यांना संत संग हा नामदेवांमुळे लाभला. संत विसोबा खेचर, संत नामदेव, संत जनाबाई अशी ही गुरू परंपरा आपल्याला पहायला मिळते.
संत ज्ञानेश्वरांच्या काळातील सर्व संतांना जनाबाईंनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे.संत ज्ञानदेवाविषयी त्यांची भक्ति अनन्यसाधारण अशीच होती.घरातील प्रत्येक कामे जसे शेण काढणे, गवर्या वेचणे हे करत असतांना जनाबाईंचे नामस्मरण अव्याहत सुरू असायचे.
परलोकीचे तारू।
म्हणे माझा ज्ञानेश्वरू
असे त्या ज्ञानेश्वरांकरीता म्हणतात.
जनाबाईंचे जवळजवळ 350 अभंग सकल संत गाथा या ग्रंथात समाविष्ट आहेत. संत एकनाथ महाराज यांचे नातू महाकवी मुक्तेश्वरांना जनाबाईंच्या थाळीपाक आणि द्रौपदी स्वयंवर या अभंगांमुळे स्फूर्ति मिळाली होती. बालक्रीडा, प्रल्हादचरित्र, कृष्णजन्म, थाळीपाक या विषयांवर जनाबाईंचे अभंग आपल्याला दिसतात. हरिश्चंद्राख्यान या आख्यान रचना सुध्दा संत जनाबाईंनी केलेल्या आहेत. त्या काळात स्रीवर अनेक बंधने होती.तेव्हा एक दासी बनलेली जना अगाध विठ्ठल भक्तीमुळे आणि दैवदत्त अशा प्रतिभेमुळे श्रेष्ठ संत कवयित्री म्हणून संतामध्येच नाही तर जनसामान्यांमध्ये मान्यता प्राप्त करते.
संत जनाबाईंना आत्मज्ञानाचा साक्षात्कार होण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या होत्या.ऐहिक आणि लौकिक भावना विसरून त्या विठ्ठला चरणी लीन झाल्या.ज्येष्ठ अभ्यासक रा.चिं ढेरे यांनी जनाबाईंचे काव्य वाचल्यानंतर एके ठिकाणी असे म्हटले आहे की, जनाबाईंच्या काव्यामधून त्यागी वृत्ती, सहनशिलता, वात्सल्य, त्यागी वृत्ती, कोमल ऋजुता, समर्पणाची वृत्ती, स्त्रीच्या भावना उत्कटपणे दिसून येतात.
एक ना, अवघे सार। वरकड अवघड ते असार।
नाम फुकट चोखट। नाम घेता न ये वीट॥
संत जनाबाईंच्या अभंगातील भाषा ही सर्वसामान्यांना अगदी सहज समजेल, उमजेल अशीच आहे. त्यांच्या रचना हृदयाचा ठाव घेतात. नामदेव गाथेत सुध्दा जनाबाईंचे बरेच अभंग आपल्याला आढळतात. पंढरपूर तीर्थक्षेत्री वयाच्या नव्वदाव्या वर्षी विठ्ठलाच्या महाद्वारी जनाबाई शके 1272 रोजी आषाढ कृष्ण त्रयोदशीला पांडुरंगाच्या चरणी लीन झाल्या!