नाशिक | प्रतिनिधी
मध्य नाशिक मतदार संघाच्या आमदार प्रा.देवयानी फरांदे यांचे पारडे जड असल्यामुळे त्यांची मते कमी करण्यासाठी विरोधक आता भर सभांमध्ये धादांत खोटी माहिती देत आहेत. ड्रग्ज प्रकरणातील कोणताही कथित आरोपी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतील व्यासपीठावर नसताना देखील विरोधक जनतेची दिशाभूल करण्यासाठी अफवा पसरवत आहेत. या अफवांमुळे विरोधकांचीच मते कमी होतील असा विश्वास स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
शिवाजी गांगुर्डे पुढे म्हणाले की, प्रा.देवयानी फरांदे यांनी ड्रग प्रकरणाच्या खोलात जाऊन त्याचे पाळीमुळे उघडी केल्यामुळे विरोधकांना घाम फुटला आहे. विरोधकांमधील काही नेते ड्रग माफिया ललित पाटील याच्याशी जोडलेले आहेत. विशेष म्हणजे हे नेते आता वसंत गीते यांच्या व्यासपीठावर राजेरोसपणे फिरताना दिसत आहेत. या नेत्यांना वाचवण्यासाठी फरांदे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. विरोधक आपल्या सभांमध्येही जनतेची दिशाभूल करण्यासाठी खोटी माहिती देत आहेत. ड्रग प्रकरणातील कथित आरोपी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत व्यासपीठावर होता अशी धादांत खोटी माहिती विविध सभांमधून दिली जात आहे.
हे ही वाचा: Nashik Political: भय, ड्रग्जमुक्त नाशिक अन् बेरोजगार युवकांच्या स्वप्नांना बळ
यात तथ्य असते तर कोणत्याही माध्यमाच्या कॅमेरामध्ये संबंधित व्यक्ती का दिसू नये? संपूर्ण जगाने नरेंद्र मोदी यांची सभा बघितली आहे. त्यात संबंधित व्यक्ती कुणालाच कशी दिसली नाही? यावरूनच विरोधकांनी आता किती पातळी सोडून आरोप करत आहेत हे लक्षात येते. वास्तविक ड्रग माफिया ललित पाटील याच्याशी कोणाचे संबंध होते हे नाशिककरांना माहित आहे. काही दिवसात याविषयी आणखी काही गौप्यस्फोट फरांदे यांच्याकडून केले जाणार आहेत. त्यामुळे पुढील कारवाई टाळण्यासाठी आता फरांदेंनाच या प्रकरणात गोवण्याचा प्रकार सुरू आहे. परंतु जनता अशा खोट्या आरोपांना भीक घालणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
त्यांनी पुढे सांगितले की, सलग दहा वर्षे नाशिक मध्य विधानसभा मतदासंघाचे प्रतिनिधित्व प्रा. देवयानी फरांदे यांनी सक्षमपणे केले. नाशिकच्या विकासात त्यांचे स्थान ‘ मध्य ‘ वर्ती आहे. या निवडणुकीत मतदार त्यांनाच भरघोस मतांनी विधानसभेत पाठवतील. प्रत्येकवेळी नवा मुखवटा धारण करून मतदारांची दिशाभूल करणाऱ्या दलबदलूंना त्यांची जागा दाखवून देतील. या मतदारसंघातील मतदार सूज्ञ, जाणकार व चाणाक्ष आहेत. त्यांची पसंती भाजपा – महायुतीलाच मिळेल, असे शिवाजी गांगुर्डे यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:Nashik Political: ॲड. राहुल ढिकले यांना मताधिक्य मिळेल
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रा. सौ. देवयानी फरांदे यांनी सर्व समाजघटकांना न्याय मिळवून दिला आहे. गेल्या दोन पंचवार्षिकात मतदारांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास त्यांनी धडाकेबाज कार्यशैलीने सार्थ ठरवला. कार्यकर्त्यांचे मोठे मोहोळ निर्माण केले आहे. मुळात त्या उच्चविद्याविभूषित आहेत. मतदारसंघाचा खडानखडा अभ्यास असून सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना आपलेसे केले आहे. एक महिला म्हणून त्या बहिण, माता, कन्या या भावनेने सर्वांशी नाते जोडतात. निर्माण केलेली नाती टिकवून ठेवण्यासाठी वेळ देतात. त्यामुळेच नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ हा आदर्श मतदारसंघ म्हणून नावारूपाला आला आहे.
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात समोरासमोर दुरंगी लढत आहे. समोरच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने कितीवेळा मुखवटे बदलले हे जनता चांगलीच जाणते. प्रत्येक निवडणुकीत दलबदलू उमेदवारी करुन मतदारांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्यांना जागृत मतदार कधीच थारा देत नाहीत.
प्रा.फरांदे भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ असून त्यांची वाटचाल विद्यार्थी दशेपासून अभाविप कार्यकर्ती म्हणून झाली आहे. सासरे नारायणराव फरांदे, पती प्रा. सुहास फरांदे यांचा सामजिक कार्याचा वारसा त्यांना लाभला आहे. महायुतीच्या अनेक योजना त्यांनी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या. लाडकी बहीण योजनेत मतदारसंघातील हजारो गरीब, गरजू बहिणींना त्यांचे हक्काचे पैसे मिळवून दिले. त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. आगामी काळातील कामांचा प्राधान्यक्रम तयार असून प्रा. फरांदे यांच्या विविध योजना तयार आहेत. विरोधकांच्या कोणत्याही फेक नॅरेटीव्हला सूज्ञ, जाणकार मतदार कधीच थारा देणार नाहीत असे शिवाजी गांगुर्डे यांनी ठणकावून सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा