Friday, May 24, 2024
Homeमुख्य बातम्यापावसाची ओढ; जिल्ह्यातील धरणांंमध्ये केवळ 'इतकाच' पाणीसाठा

पावसाची ओढ; जिल्ह्यातील धरणांंमध्ये केवळ ‘इतकाच’ पाणीसाठा

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात दोन -तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातील पाणीसाठ्याची वाढ थंडावली आहे.नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा अद्याप ३३ टक्क्यांवरच पोहचला असून पावसाने अधिक विश्रांती घेतल्यास साठा आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी १० जुलै रोजी धरणातील साठा ४५ टक्के इतका होता, तर यंदा याच दिवशी पाण्याची पातळी बारा टक्क्यांनी कमी झाल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील धरणांमधील परिस्थिती देखील फारशी वेगळी नाही.जिल्ह्यात मोठे प्रकल्प सात तर मध्यम प्रकल्प १७ असे एकूण २४ प्रकल्प आहेत.या सर्व प्रकल्प मिळून १८,६७७ दशलक्ष घनफुट म्हणजेच २८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.आजअखेर मागील वर्षी ३७ टक्क्यांवर असलेला जलसाठा यावर्षी २८ टक्के इतकाच असून तो नऊ टक्क्यांनी कमी झाला आहे.

जून महिना कोरडा गेल्याने जुलै महिन्यात पावसाची प्रतीक्षा होती.त्यानुसार जुलैच्या पहिल्या आठवड्यात गंगापूरसह जिल्ह्यातील काही धरण क्षेत्रात थोडाफार पाऊस झाल्याने धरणातील पाणी पातळीत वाढ झाल्याने नाशिक शहरावरील पाणी कपातीचे संकट टळले आहे. मागील आठवड्याच्या जलसाठ्यात थोडीशी वाढ झाली.मात्र,मागील आठ दिवसांपासून पावसाने पुन्हा तोंड फिरविल्याने मागील आठवड्यात मिळालेला दिलासा या आठवड्यात चिंतेत बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे . गंगापूर धरणात सध्या ३३ टक्के इतका जलसाठा असला तरी समूहाचा साठा २४ टक्के इतकाच आहे. मागील वर्षी आज अखेर समूहाचा साठा ३८ टक्के इतका होता.

पावसाची विश्रांती चिंता वाढवणारी

मागील महिन्यात धरणातील पाणी साठ्याची पातळी पाहता शहरात पाणी कपात केली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु,जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाने गंगापूर धरणाची पाणी पातळी ३३ टक्क्यावर पोहोचल्याने पाण्याची चिंता मिटली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणी कपातीची वेळ येणार नसल्याचे सांगण्यात आले.नाशिककरांवर अद्यापही पाणी कपातीची संकट नसले तरी पावसाची विश्रांती चिंता वाढवणारी ठरू शकते.मागील वर्षी गंगापूर धरण समूहाचा साठा ३८ टक्के इतका होता तर यंदा समूहाचा साठा २४ टक्के इतका आहे.

नांदूरमध्यमेश्वर ७३ टक्क्यांवर

जिल्ह्यात सर्वाधिक जलसाठा सद्यस्थितीत नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पात आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाची पातळी ७३ टक्के इतकी झाली आहे. जिल्ह्यात सर्वात आधी भरणारे आणि सर्वाधिक विसर्ग असलेले हे धरण असून या धरणातून सर्वाधिक पाणी जायकवाडीला पोहोचते तर गंगापूर धरणातील पाणी पातळी कमी होत असताना दारणा धरणात मात्र ४७ टक्के जलसाठा झाला आहे.

दरवर्षी ओव्हरफ्लो होणाऱ्या दारणा धरणातील पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. गतवर्षीच्या तुलनेत साठा कमी असला तरी धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने मागील वर्षीच्या साठ्याची बरोबरी येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत जलसाठा

गंगापूर ३३ टक्के, कश्यपी १७ टक्के, गौतमी गोदावरी १३ टक्के, पालखेड ३३ टक्के ,करंजवण १७ टक्के, ओझरखेड 25 टक्के, दारणा ४७ टक्के, भावली ५१ टक्के, चनकापूर 39 टक्के, हरणबारी ४४ तर गिरणा धरणात 20 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या