नाशिक | प्रतिनिधी
नियमीत अनुदानित खतांचा (Subsidized Fertilizers) नाशिक जिल्हयात (Nashik District) पुरवठा होत नसल्याची बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आल्याने पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी खताचा तुटवडा जाणवुन देऊ नका. त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. येत्या आठ दिवसाच्या आत ही कोंडी सोडविण्याची सूचना केली आहे.
जिल्ह्यात खत टंचाई जाणवत असल्याची बाब निदर्शनास आल्याने भुसे यांनी कृषि विभाग व सर्व खत कंपनी प्रतिनिधी यांची नाशिक जिल्हयात अनुदानित खते पुरवठ्याबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांना गंभीर बाबी निदर्शनास आल्याने त्यांनी तातडीने सर्व कंपनीना पत्र व्यवहार करत दिलेले टार्गेट नुसार खत पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सद्यस्थितीत नाशिक जिल्हयात पेरणीच्या अनुषंगाने, युरीया खताच्या मागणीत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. या बाबत कृषि विभागाने सबंधित कंपनी प्रतिनिधी यांचेकडे वारंवार पाठपुरावा करुन देखील नाशिक जिल्हयात खत उपलब्ध होत नसल्याचे मंत्री भुसे यांच्या निदर्शनास आलेे, तसेच जिल्हाधिकारी यांनी देखील याबाबत कंपनीस लेखी पत्र दिल्याची बाब आढावा बैठकीत निदर्शनास आली आहे.
जिल्ह्यात मंजुर आवंटनानुसार अनुदानित खतांचा पुरवठा जिल्हात न केल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेवून या बाबत संबंधित खत कंपनीचे राज्यस्तरीय अधिकारी यांना भ्रमणध्वनी द्वारे नियमीत खत पुरवठ्याबाबत भुसे यांनी सुचना दिल्या आहेत, त्यानुसार नाशिक जिल्ह्यात तात्काळ मंजुर आवंटनाप्रमाणे मागील पुरवठ्यातील तुटीसह शिल्लक खत पुरवठा करावा, तसेच युरीया खताचा प्राधान्याने तात्काळ पुरवठा करण्या बाबत आदेश संबंधित पुरवठादार कंपनीना दिले आहेत. तसेच कृषी आयुक्त पुणे यांना देखील समन्वय साधून खत टंचाईची समस्या आठवड्या भरात सोडविण्याचे निर्देश दिले.