Tuesday, November 26, 2024
Homeअग्रलेखविवेके जाणिजे जैसा....

विवेके जाणिजे जैसा….

महाराष्ट्राला लाभलेल्या सर्व संतांनी आणि राष्ट्रपुरुषांनी जनतेला मानवतेचा, मानवकल्याणाचा आाणि परस्पर सहकार्याचा वैचारिक वारसा दिला. मानवता धर्म अंगीकारणे ठरवले तर सहज शक्य आहे हे संत आणि महापुरुषांनी स्व आचरणातमधुन लोकांना पटवून दिले. संत ज्ञानेश्वरांनी ‘दुरितांचे तिमिर जावो’ असा तर संत  तुकडोजी महाराजांनी ‘सर्व विश्वचि व्हावे सुखी। ही धर्माची दृष्टी नेटकी। ती आणावी सर्व गावलोकी। तरीच लाभ’ असा उपदेश केला होता. राष्ट्रपुरुषांनी शिक्षणप्रसाराचे आणि त्यामाध्यमातून वैचारिक बदलाचे व्रत आयुष्यभर अंगीकारले.

काही व्यक्ती, व्यक्तीसमूह आणि अनेक सामाजिक संस्था तोच वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. दिवाळीची पणती वंचितांच्या घरीही पेटावी यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी प्रयत्न केले. काही संस्थांनी दुर्गम भागातील लोकांबरोबरच दिवाळी साजरी केली. प्रदुषण कमी करण्यासाठी दिवाळीत फटाके वाजवू नयेत असे आवाहन अनेक संस्था सातत्याने करतात.

- Advertisement -

तामिळनाडूमधील वेतांगुडीपट्टी आणि पेरिया कोल्लूकुडीपट्टी या गावातील ग्रामस्थ गेली अनेक दशके फटाकेमुक्त उत्सव साजरे करत आहेत. वेतांगुडी गावाजवळ एक पक्षी अभयारण्य आहे. या अभयारण्यातील पक्ष्यांना फटाक्यांमुळे इजा पोहोचू नये यासाठी गावकर्‍यांनी फटाकेबंदीचा निर्णय स्वयंस्फुर्तीने घेतला आहे आणि तो कसोशीने अंमलात देखील आणला आहे. अभयारण्यातील पक्ष्यांवर गावकरी नितांत प्रेम करतात असे यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. केवळ पक्षांचेच नव्हे तर लोकांचेही जगणे सुसह्य व्हावे यासाठी अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत.

गिव्ह फाऊंडेशन ही संस्था दुर्गम आणि अती दुर्गम गावातील लोकांचे जगणे सुखाचे व्हावे यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करते. नाशिक जिल्ह्यात हिवाळी गाव आहे. या गावातील प्रत्येक घरावर मुलींच्या नावाची पाटी लावलेली आहे. त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. विधवा महिलांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी राज्यातील अनेक गावे पुढाकार घेत आहेत. या बदलाची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने केली होती. विधवा प्रथा बंद करणारी ती राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली होती.

विधवा महिलांचा सन्मान वाढवणारे निर्णय राज्यातील अनेक गावे स्वयंस्फुर्तीने घेत आहेत. पुणे जिल्ह्यात आंबी नावाचे एक गाव आहे. गावातील एका परिवाराने नवीन घर बांधले. गावातील विधवांच्या हस्ते नवीन घराची पुजा केली. गृहप्रवेशही त्यांनाचा करायला लावला. पतीचे निधन झालेल्या महिलांचा उल्लेख विधवा असा न करता ‘सक्षम’ असा उल्लेख करण्याचा ठराव शेटेफळे गावाने एकमताने संमत केला. शेटेफळे हे सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यातील एक गाव.

याच गावाने एका सार्वजनिक कार्यक्रमात महिलांची खणानारळाने ओटी देखील भरली. हळूहळू समाजाचे विचार बदलत आहेत. सामाजिक वातावरण सलोख्याचे राहावे यासाठी आता लोकच पुढाकार घेत आहेत. सकारात्मक बदल हळूहळूच होत असतात. ‘विवेके जाणिजे जैसा वाढविता ची वाढतो’ असे संत रामदास स्वामींनी म्हटले आहे. तद्वतच काही संस्था, व्यक्ती आणि ग्रामपंचायतींनी सुरु केलेला विवेकाचा जागर यापुढेही असाच सुरु राहिल अशी आशा वाटते. 

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या