Thursday, September 19, 2024
Homeनगरपंढरपूर वारीसाठी जिल्ह्यातून रोज 240 अतिरिक्त एसटी बसेस

पंढरपूर वारीसाठी जिल्ह्यातून रोज 240 अतिरिक्त एसटी बसेस

आजपासून 21 जुलैपर्यंत मुदत || सर्वाधिक गाड्या तारकपूर बसस्थानकातून सुटणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेच्या भाविकांसाठी नगर एसटी महामंडळाने आज शुक्रवारपासून ते 21 जुलै या कालावधीत रोज 240 जादा एसटी बस सोडण्याचे नियोजन केले आहे. प्रामुख्याने सर्वाधिक नगरच्या तारकपूर आगारातून या बस गाड्या सोडल्या जातील. वारकर्‍यांच्या स्वागतासाठी बस स्थानकावर स्वागत फलक उभारण्याची सूचना विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिली आहे.

आषाढी यात्रेची सुरुवात आज सप्तमीपासून होत आहे. यात्रेत प्रामुख्याने रिंगण (दि. 14), आषाढी एकादशीचा मुख्य दिवस (दि. 17) व पौर्णिमा (दि. 21) हे भाविकांच्या गर्दीचे दिवस असतात. या पार्श्वभूमीवर सर्व आगार व्यवस्थापकांना व्यक्तिशः लक्ष देऊन कार्यवाही करण्याच्या सूचना विभाग नियंत्रक सपकाळे यांनी दिल्या आहेत. पंढरपूरसाठी एकही बस नगर शहरातील माळीवाडा बसस्थानकातून सुटणार नाही. सर्व नियमित व जादा एसटी गाड्या तारकपूर बसस्थानक येथूनच सोडल्या जाणार आहेत. पंढरपूरमध्ये बस विठ्ठल कारखाना बसस्थानक येथे थांबतील.

नगर विभागातील तारकपूर, नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव, अकोले, संगमनेर, पारनेर, या आगाराच्या बस तारकपूर बसस्थानक येथून भाविकांची वाहतूक करतील तर शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, जामखेड आगाराच्या बस त्यांच्या आगारातून माहीजळगाव-करमाळा मार्गे पंढरपूर येथे भाविकांची वाहतूक करतील. बसस्थानकावर भाविकांच्या स्वागताचे फलक उभारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या सर्व नियोजनाचे प्रमुख म्हणून विभागीय वाहतूक अधिकारी के. ए. धनराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तारकपूर आगारातून 40, शेवगावमधून 20, जामखेड 16, श्रीरामपूर 20, कोपरगाव 30, पारनेर 15, संगमनेर 25, श्रीगोंदा 30, नेवासा 14, पाथर्डी 20, अकोले 10 अशा एकूण 240 अतिरिक्त बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तर गावातूनच बसची व्यवस्था
एखाद्या गावातून 40 वा त्यापेक्षा जादा भाविक ग्रुपने पंढरीच्या वारी करण्यास इच्छुक असल्यास महामंडळाची बस थेट गावात येण्यास तयार आहे. त्यामुळे संबंधित गावातील भाविकांनी लवकरात लवकर जवळच्या आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन एसटीच्यावतीने करण्यात आले आहे.

असे आहेत तिकीट दर
आषाढी वारीसाठी तिकीट दर पुढीलप्रमाणे (प्रथम प्रौढासाठी, नंतर लहान मुलांसाठी) नगर ते पंढरपूर 290 रुपये व 125, संगमनेर 425 व 225, श्रीरामपूर 400 व 200, कोपरगाव 445 व 225, पारनेर 350 व 175 नेवासा 385 व 190, अकोले 480 व 240, शिर्डी 425 व 215, माहीजळगाव 200 व 100, शेवगाव 365 व 185, जामखेड 225 व 110 पाथर्डी 330 व 165, कर्जत 190 व 95 असे तिकीट दर आकारले जाणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या