नागपूर | Nagpur
चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. त्यांनी रामकृष्ण मठातील गेस्ट हाऊसमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेने कलाक्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, उबाळे आर्थिक संकटात होते. त्यांनी मागील काही महिन्यांपासून आर्थिक अडचणींमुळे खचून आत्महत्येचा निर्णय घेतल्याची शक्यता आहे. त्यांच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या व्हॉट्सअॅप नोटमध्ये त्यांनी कर्जबाजारीपणाचा उल्लेख केला आहे. यात त्यांनी स्पष्टपणे लिहिले की, आर्थिक विवंचना आणि कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या करत आहे.
शुक्रवारी सकाळी आशिष उबाळे हे रामकृष्ण मठात गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी होते. त्यांनी मठात जेवण केल्यानंतर थोडा वेळ विश्रांतीसाठी खोलीत गेले. त्यानंतर ते खोलीबाहेर आले नाहीत. त्यांचा लहान भाऊ सारंग उबाळे, जो मठात सेवेकरी आहे, त्यांना भेटण्यासाठी मठात आला होता. बराच वेळ होऊनही भाऊ बाहेर न आल्याने त्याने काळजीने दरवाज्याजवळ जाऊन आवाज दिला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाला माहिती देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दरवाजा उघडला असता, आशिष उबाळे गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह हलवण्यात आला. आशिष उबाळे हे नाव मराठी चित्रपट व टेलिव्हिजन क्षेत्रात परिचित होतं. त्यांनी ‘अग्नी’, ‘श्वासावे अंतर’, ‘गजरा’, ‘चक्रव्यूह’ यांसारख्या लोकप्रिय मालिका दिग्दर्शित केल्या होत्या.
याशिवाय, ‘गार्गी’ या मराठी चित्रपटाचे त्यांनी लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. प्रेमासाठी वाट्टेल ते आणि बाबुरावला पकडा हे दोन मराठी चित्रपटसुद्धा त्यांच्या दिग्दर्शनाखाली निर्माण झाले. 2009 साली ‘गार्गी’ हा चित्रपट नागपूर येथे झालेल्या कार्ल्सबर्ग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला होता. त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना एक नाविन्यपूर्ण दिग्दर्शक म्हणून ओळख मिळाली होती.
आशिष उबाळे यांच्या अचानक जाण्याने मराठी चित्रसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. एक अनुभवी आणि उमदा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड गेला, अशी भावना कलाकार व सिनेप्रेमी व्यक्त करत आहेत. त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली होती आणि दर्जेदार कथानकांची निर्मिती केली होती.