श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
कर्ज वसुलीबाबत कठोर भूमिका घेतल्याने अशोक बँकेबाबत काहींनी आरबीआयकडे तक्रारी केल्या. काहींनी जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या. त्यामुळे 28 तारखेच्या सायंकाळपासून आरबीआयने बँकेवर निर्बंध लावले आहेत. मात्र बँकेचा परवाना कायम आहे. या निर्बंधांमुळे त्यामुळे बँकेचे व्यवहार सध्या बंद राहणार असले तरी पाच लाख रुपये ठेवी असणार्यांना तीन महिन्यात व त्या पुढच्या रकमा असणार्यांना सहा महिन्यात सर्व पैसे परत मिळतील. ठेवीदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन बँकेचे सर्वेसर्वा माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी केले.
अशोक बँकेमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याने बँकेवर आरबीआयने बंधन लावले आहे. ही वार्तासर्वत्र पसरल्यानंतर बँकेमध्ये ठेवीदारांची मोठी गर्दी उसळली. या पार्श्वभूमीवर मुरकुटे यांनी त्यांच्या ‘जिद्द’ या निवास्थानी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. गेल्या काही दिवसापासून बँकेबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवल्याने ठेवीदारांमध्ये गैरसमज निर्माण झाला. निश्चितपणे ठेवीदारांचे कष्टाचे पैसे आहेत आणि ते त्यांना परत देणे ही आमची जबाबदारी आहे. अफवांमुळे करंट, सेव्हिंग आणि पिग्मी अकाउंटचे पैसे काढायला गर्दी उसळली. त्यामुळे बँकेची तरलता डिस्टर्ब झाली. काहींनी आरबीआयकडे तक्रारी केल्या. त्यामुळे बँकेवर निर्बंध लावण्यात आले आहेत. बँकेमध्ये 384 कोटी रुपयांच्या ठेवी असून कर्ज वितरण मात्र 423 कोटींचे झाले आहे. त्यामुळे सिडी रेशोमध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे.
कर्जदारांनी वेळेवर पैसे न भरल्याने थकबाकी वाढली. त्याचा परिणाम दैनंदिन व्यवहारावर झाला आहे. अफवा पसरल्याने लोक एकदम पैसे घ्यायला आले. त्याचाही परिणाम झाला. आरबीआयने सहा महिन्यांचे बंधन घातले आहे. ही एक सामान्य बाब आहे. जिल्ह्यातील इतर बँकांवर देखील यापूर्वी अशी बंधने लावण्यात आली होती, मात्र ती सुरळीत झाली. अशोक बँक सुद्धा सहा महिन्यांमध्ये पूर्व पदावर येईल, असा विश्वास त्यांनी व्यष्त केला. पाच लाख रुपयापर्यंतचे ठेवींना विमा संरक्षण असल्याने नव्वद दिवसाच्या आत व्याजा सकट ते पैसे परत दिले जाणार आहेत तसेच पाच लाखापेक्षा जास्त रकमेच्या ठेवी या सहा महिन्यात परत देणार आहोत. वसुली नियमित चालू राहणार असून वसूल झालेली रक्कम बँकेत जमा होणार आहे. ती ठेवीदारांना देण्यात येणार आहे. बँकेवर निर्बंध लागलेले असले तरी बँकेचा परवाना रद्द झालेला नाही. सहकार खात्याचे नियमानुसार दोन ठिकाणी चेअरमन राहता येत नसल्याने मला बँकेचे चेअरमनपद सोडावे लागले आणि येथेच गफलत झाली.
बँकेच्या अधिकार्यांनी मनमानी पद्धतीने कामकाज केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली, असेही श्री. मुरकुटे यांनी सांगितले.नगर आणि पुणे येथील कर्जदार सभासदांची संख्या मोठी असून नगरमध्ये दीडशे कोटीचे तर पुण्यामध्ये तीस कोटी रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे. वसुलीसाठी बँकेने संबंधित सभासदांना नोटीस पाठवल्या असून वसुलीची प्रक्रिया पद्धत चुकीची असल्याने वेळखाऊ असल्याने त्याला वेळ लागत आहे. कर्जदारांना जप्तीच्या नोटीस दिल्याने ते नाराज झाले. काही लोकांनी गावात नकारात्मक चर्चा केली. आर्थिकदृष्ट्या मी खूप काळजीपूर्वक कारभार करीत असतो. परंतु कर्जवाटप ज्यादा झाल्याने व वसूल कमी झाल्याने बँक थोडी अडचणीत आहे. मात्र सहा महिन्यांमध्ये सर्व परिस्थिती सुरळीत होईल. तोपर्यंत सर्व सभासद ठेवीदार कर्जदार यांनी सहकार्य करावे असे आवाहन ही त्यांनी केले. यावेळी अशोक बँकेचे संचालक मंडळ उपस्थित होते.
सीए असलो तरी बँकेच्या कारभारात मी नापास झालो- माजी आ. मुरकुटे
मी सीए असलो. तरी अशोक बँकेच्या कारभारात मात्र, नापास झालो,अशी कबुली माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी देतानाच मागील काही काळामध्ये वाढत्या जबाबदार्यांमुळे माझे बँकेकडे दुर्लक्ष झाल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीला व्यक्तीशः मी स्वतः आणि बँकेचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहोत. यात संचालक मंडळाचा कोणताही दोष नाही, असेही ते म्हणाले.




