Friday, May 3, 2024
Homeनगरअशोक कारखान्याची निवडणूकपूर्व तयारी सुरु

अशोक कारखान्याची निवडणूकपूर्व तयारी सुरु

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील 43 गावांची कामधेनू असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठीची सभासदांची प्राथमिक मतदार यादी काल टाकळीभान येथील गट ऑफिसमध्ये सभासद शेतकर्‍यांच्या उपस्थितीत प्रसिध्द करण्यात आली. त्यामुळे अशोकच्या निवडणुकपूर्व तयारीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

- Advertisement -

करोना महामारीमुळे सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका सुमारे वर्षभर पुढे ढकलण्यात आल्या होत्या. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सहकार प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021 ते 2026 या पंचवार्षिक कालावधीची सदस्य मंडळाची निवडणूक घेण्यासाठी प्राथमिक मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. कारखाना कार्यक्षेञातील 43 गावातील 11 हजार 736 सभासद संख्या असलेले व 31 आक्टोबर 2018 पर्यंत सभासद असलेले सभासद या प्राथमिक यादित सामाविष्ट करण्यात आले आहेत.

पढेगाव, टाकळीभान, कारेगाव, वडाळा महादेव व उंदिरगाव या पाच गटातून संचालक मंडळ निवडले जाणार आहे. 2 हजार 221 मतदार संख्या असलेल्या पढेगाव गटात पढेगाव, मालुंजा बुद्रूक, लाडगाव, कान्हेगाव, उंबरगाव, वळदगाव, बेलापूर बुद्रूक, ऐनतपूर, उक्कलगाव, एकलहरे व रांजणखोल ही 11 गावे सामाविष्ट आहेत. 2 हजार 597 सभासद असलेल्या टाकळीभान गटात टाकळीभान, भोकर, कमालपूर, घुमनदेव, घोगरगाव, बेलपिंपळगाव ही 6 गावे सामाविष्ट आहेत.

2 हजार 181 सभासद संख्येच्या वडाळा महादेव गटात वडाळा, निपाणी वडगाव, मातापूर, खोकर आणि शिरसगाव ही 5 गावे आहेत. 2 हजार 666 मतदार असलेल्या कारेगाव गटात कारेगाव, वांगी बुद्रूक, वांगी खुर्द, खिर्डी, गुजरवाडी, भेर्डापूर, पाचेगाव व पुनतगाव ही 8 गावे आहेत तर 2 हजार 71 सभासद संख्या दर्शवलेल्या उंदिरगाव गटात उंदिरगाव, ब्राम्हणगाव, निमगाव खैरी, भैरवनाथनगर, माळवाडगाव, माळेवाडी, खानापूर, सराला, गोवर्धन, भामाठाण, महांकाळ वाडगाव, मुठेवाडगाव व दत्तनगर ही 13 गावे सामाविष्ट करण्यात आलेली आहेत.

अशोक कारखान्यात गेली 35 वर्षे माजी आ. भानुदास मुरकुटे यांचा एकहाती अंमल आहे. आतापर्यंतच्या सर्वच निवडणुकांमध्ये त्यांनी टाकळीभान गटातून प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे दोन नंबरची मते असलेला टाकळीभान गट हा त्यांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आगामी निवडणुकीतही मुरकुटे टाकळीभान गटातूनच प्रतिनिधीत्व करणार की दुसर्‍या गटात जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टाकळीभान गटात प्राथमिक यादी प्रसिध्दीसाठी ज्येष्ठ नेते ज्ञानदेव साळुंके, माजी सरपंच मंजाबापू थोरात, संचालक दत्तात्रय नाईक, बापुसाहेब त्रिभुवन, शिवाजी शिंदे, उपसरपंच कान्हा खंडागळे, रावसाहेब मगर, ग्रा. प. सदस्य मयुर पटारे, सुनिल बोडखे, प्राचार्य जयकर मगर, शिवाजी पटारे, पांडु मगर, प्रशांत नागले, शिवाजी पवार, बाबासाहेब बनकर, विलास दाभाडे, बाळासाहेब शेळके, भाऊसाहेब कोकणे आदींसह सभासद उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या