मुंबई | Mumbai
अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोक खरातला (Ashok Kharat) नाशिक पोलिसांनी (Nashik Police) अटक केली असून, या प्रकरणाचा तपास सध्या एसआयटीकडून (SIT) सुरु आहे. त्यानंतर आता या प्रकरणात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित तब्बल ७४ टेलिग्राम गट (Groups) आणि सोशल मीडिया खाती शोधून काढली आहेत. आतापर्यंत या कारवाईत ४०६ आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावरून हटविण्यात (Remove) आले आहेत.
अवघ्या २० रुपयांना व्हिडिओची विक्री
पोलीस तपासातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक खरातच्या केबिनमधील कथित अश्लील व्हिडीओ काही समाजकंटकांकडून टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया ग्रुप्सवर अवघ्या २० रुपयांना विकले जात होते. या व्यावसायिक गैरवापराची दखल घेत सायबर पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत.
आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्यीय पातळीवर प्रसार
सायबर पोलिसांच्या तांत्रिक तपासात या प्रकरणाची व्याप्ती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याचे उघड झाले आहे. या आक्षेपार्ह व्हिडीओचा प्रसार संयुक्त अरब अमिराती (UAE), श्रीलंका, फिलिपाईन्स आणि नायजेरिया या देशांमध्ये, तसेच भारतातील २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
मध्यस्थांना नोटीसा, एका संशयिताची ओळख पटली
या प्रकरणाची गंभीर दखल घेत सायबर पोलिसांनी ११ सोशल मीडिया मध्यस्थांना (Intermediaries) कायदेशीर नोटिसा बजावल्या आहेत. त्यापैकी २५ खात्यांकडून पोलिसांना प्रतिसाद प्राप्त झाला आहे. याशिवाय, या गैरप्रकारात सामील असलेल्या एका मुख्य संशयित आरोपीची ओळख पटली असून, सध्या पोलिसांकडून त्याची सखोल पडताळणी सुरू आहे.
सायबर पोलीसांचे नागरिकांना आवाहन
नागरिकांनी अशा प्रकारचे कोणतेही आक्षेपार्ह किंवा अश्लील व्हिडीओ डाउनलोड, खरेदी अथवा फॉरवर्ड करू नये. असे कृत्य करणे कायद्याने गुन्हा आहे. जर कोणाला अशा प्रकारची लिंक किंवा सोशल मीडिया ग्रुप आढळल्यास, त्यांनी तात्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




