Thursday, July 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAshok Kharat Case : सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे चेअरमन नामकर्ण आवारे...

Ashok Kharat Case : सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे चेअरमन नामकर्ण आवारे यांना अटक

सिन्नर | प्रतिनिधी Sinnar

- Advertisement -

सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे चेअरमन नामकर्ण आवारे यांना सिन्नर पोलिसांनी आज (दि. १३) सायंकाळी सहाच्या दरम्यान अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी दिली.

भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातला सिन्नर पोलिसांनी मंगळवारी (दि.१२)रात्री ताब्यात घेतल्यानंतर आज न्यायालयाने खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जगदंबा पतसंस्थेतील बनावट खात्यातील व्यवहारांसंदर्भात चौकशी करण्यासाठी आवारे यांना दुपारी चारच्या दरम्यान वसाहतीच्या कार्यालयातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यातून बनावट खात्यांसंदर्भातील माहिती काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र, आवारे यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने सायंकाळी पोलिसांनी त्यांना अटक केली असल्याचे भामरे यांनी दै. ‘देशदूत’ शी बोलताना सांगितले.

आवारे हे खरातच्या शिवनीका संस्थांनचे खजिनदार होते. तालुक्यातील मिरगाव येथे उभारण्यात आलेल्या ईशान्येश्वर मंदिराच्या पायाभरणीपासून मंदिराचे काम पूर्ण होईपर्यंत व त्यानंतरची अनेक वर्ष आवारे हे खरातच्या सोबत होते. मंदिर परिसरात होणार्‍या अनेक धार्मिक सोहळ्यांच्या आयोजनामध्ये आवारे यांचा पुढाकार असायचा. मंदिरात येणार्‍या व्हीआयपींच्या स्वागतासाठी आवारे अनेकदा हजर असायचे. मंदिरात येणार्‍या अनेक मंत्र्यांना वसाहतीच्या कार्यालयात आणून त्यांचा सत्कारही केला जायचा. मंदिरात येणार्‍या व्हीआयपींच्या भेटीच्या वेळी आवारे अग्रभागी असायचे. तर आवारे संस्थापक असलेल्या कुंदेवाडी येथील जगदंबा ग्रामीण पतसंस्थेवर आवारे यांनी कॅप्टन खरातला संचालक म्हणून घेतले होते.

पुढे खरातला पतसंस्थेचे चेअरमनही केले होते. त्याच काळात अथवा आवारे चेअरमन असल्याच्या काळात खरात याने पतसंस्थेत बत्तीस बेनामी खाती उघडून त्यावर दोन ते अडीच कोटींची उलाढाल केल्याची चर्चा होती. या सर्व खात्यांना खरात स्वतःच नॉमिनी होता. आवारे यांच्या जावयाच्या नावाने देखील पतसंस्थेत एक बेनामी खाते उघडलेले होते. मात्र, त्याबाबत आवारे यांना माहिती होते किंवा नाही याबाबत कधी चर्चा झाली नाही. मात्र, ३२ खातेदारांपैकी एकाने सिन्नर पोलीस ठाण्यात खरात याच्यासह व्यवस्थापक व संचालक मंडळाच्या विरोधात बनावट खाते उघडून फसवणूक केल्याबद्दल फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर पोलिसांनी मध्यंतरी पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांना अटकही केली होती. न्यायालयाने त्यावेळी त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्यांच्या चौकशीतून पोलिसांना काय माहिती मिळाली हे बाहेर येऊ शकले नाही. मात्र, त्याच वेळी आवारे यांनाही अटक होऊ शकते अशी चर्चा सुरू झाली होती. ती चर्चा आज खरी ठरली.

काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे , सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आवारे व खरात यांचे सोबतचे फोटो दाखवून खरात सोबत आवारे यांच्यावरही आरोप केले होते. त्यांना अटक करून चौकशी करण्याचे आवाहनही त्यांनी वृत्तवाहिन्यांवर दिलेल्या मुलाखतींमध्ये केले होते. नाशिकच्या विशेष तपास पथकातील अधिकार्‍यांची भेट घेऊन अंधारे यांनी या फोटोंसह काही पुरावे देखील समितीच्या स्वाधीन केले होते.

सन २०२४ मध्येच खरात व आवारे यांच्यात वाद झाल्याची चर्चा होती. त्यामुळे आवारे यांनी मंदिराकडे जाणे बंद केले होते. त्याचप्रमाणे शिवनीका संस्थांनवरील आपल्या पदाचा राजीनामाही दिला होता. आवारे यांच्यासह संस्थानमधील काही पदाधिकार्‍यांनी आपले राजीनामे धर्मदाय आयुक्तांकडेही पाठवले होते. ते मंजूर झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागांवर खरात यांनी नवीन पदाधिकारी नेमले होते. मात्र, तेव्हापासून आवारे व खरात यांचे संबंध तानले गेले होते. त्याचवेळी खरात याने देखील जगदंबा पतसंस्थेतील संचालक पदाबरोबरच चेअरमन पदाचाही राजीनामा दिल्याची चर्चा होती.

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik Rain News : नाशिकमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस; गोदावरीला पूर, रामकुंडावरील...

0
नाशिक | Nashik नाशिक शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाच्या सततच्या सरींमुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड...