नाशिक | Nashik
स्वत:ला कॅप्टन म्हणवून घेणाऱ्या सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) श्री शिवानिका संस्थांचा अध्यक्ष अशोक खरात (Ashok Kharat) याला महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी नाशिक गुन्हे शाखेने (Crime Branch) बुधवारी (दि.१८) रोजी अटक केली. यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता मंगळवार (दि.२४) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाच्या तपासाकरिता राज्य सरकारकडून आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते (Tejaswi Satpute) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्या या प्रकरणाची बारकाईने लक्ष देऊन चौकशी करत आहेत.
काल (शनिवारी) खरातची तब्बल सात तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज (रविवारी) देखील त्याची सखोल चौकशी सुरू आहे. अशातच अचानक विशेष तपास पथकाने (SIT) चौकशीचे ठिकाण बदलत खरातला अज्ञातस्थळी हलविल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणी प्रचंड गोपनीयता आणि खबरदारी घेतल्याचे दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून गुन्हे शाखा कार्यालय आणि पोलीस क्लब येथे त्याची चौकशी सुरु होती. यानंतर आज खरातच्या चौकशीचे ठिकाण बदलण्यात आले असून, एसआयटी प्रमुख आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते (Tejaswini Satpute) देखील चौकशीसाठी उपस्थित आहेत.
ईशान्येश्वर मंदिरातील पुजाऱ्याला उचलले
एसआयटीच्या पथकाने अशोक खरातच्या सिन्नर येथील ‘ईशान्येश्वर’ मंदिरातील पुजारी, वॉचमन बालाजी, कर्मचारी प्रमोद यांच्यासह काही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेत चौकशीसाठी नाशिकला आणल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या चौकशीत मंदिर आणि खरातच्या फार्म हाऊसवर नेमक्या कोणत्या प्रकारच्या हालचाली सुरू होत्या? याचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खरात आणि नीरज जाधव यांच्यात खडाजंगी
दरम्यान, या प्रकरणात खरातचा निकटवर्तीय नीरज जाधव याचे नाव समोर आल्यानंतर एसआयटीने त्याला देखील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर या दोघांचीही समोरासमोर चौकशी करण्यात आली असता दोघांमध्ये पोलिसांसमोरच जोरदार शाब्दिक खडाजंगी झाल्याचे समजते. तर नीरज जाधवच्या कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासात ३० ते ४० महिलांचे फोन नंबर आढळल्याचे बोलले जात आहे. जाधव हा खरातच्या फोकस प्रॉपर्टी येथील ऑफिसबॉय असताना तो सल्ला घेण्यासाठी येणाऱ्या महिलांच्या संपर्कात आला होता.




