नाशिक | प्रतिनिधी
महाराष्ट्रासह नाशिकला हादरवून सोडणाऱ्या ‘खरात एपस्टाईन फाईल्स’ प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले असून, या संपूर्ण दुष्कृत्याचा खरा मास्टरमाईंड कॅप्टन खरातचा ‘खास’ व ऑफिसबॉय संशयित नीरज जाधव असल्याचे समोर आले आहे. खरातने महिलांचे लैंगिक शोषण केले, मात्र त्या शोषणाचे भांडवल करून ५८ महिलांची लाज विकण्याचा डाव नीरजने रचल्याचे उघड होत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती पाहता राज्य शासनाने तपासासाठी ‘एसआयटी’ स्थापन केली असून, गुरुवारी (दि.१९) सकाळी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी नाशिकमध्ये दाखल होत खरातची दोन तास कसून चौकशी केली.
नीरजनेच नकळत ५८ व्हिडीओ चोरले
कॅनडा कॉर्नर येथील ‘ओजस प्रॉपर्टीज’ या कार्यालयात स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातने अनेक महिलांवर केलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ, मॉर्फ व्हिडिओ, फोटो व पुरावे सीसीटीव्हीच्या रूपाने जतन केले होते. खरातचा विश्वासू असलेला नीरज जाधव याने डिसेंबर २०२५ मध्ये खरातच्या नकळत कार्यालयातून या ५८ महिलांवरील अत्याचाराचे फुटेज चोरले. खरात एकटाच या कृत्यातून मजा मारत असून स्वतःला समाजात साफ म्हणून मिरवत असल्याचे पाहून नीरजच्या मनात पैशांची हाव निर्माण झाली. त्याने या व्हिडीओंच्या जोरावर खरातलाच ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. नीरज आणि त्याच्या साथीदारांनी या क्लिप्सच्या बदल्यात खरातकडे ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. मात्र, खरातने या मागणीला दाद न देता पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करीत थेट वावी पोलिसांत फिर्याद नोंदविली होती. त्यामुळे नीरजने आपला मोर्चा थेट पीडित महिलांकडे वळवून त्यांच्या अब्रूचा बाजार मांडला.
नीरजचा मास्टरस्ट्रोक त्याच्यासह खरातवरच उलटला
यानंतर, नीरज व इतरांनी शिर्डीतील एका २४ वर्षीय विवाहितेचे मॉर्फ फोटो आणि काही व्हिडीओ थेट तिलाच व्हॉट्सअॅपवर पाठवून धमकावले. ही पीडिता मंदिरात दर्शन घेत असताना नीरजसह संशयिताने तिला गाठून व्हिडीओ दाखविले. ती घाबरली व तिने ही बाब खरातला कळविली, पण खरातने स्वतःला वाचवण्यासाठी तिलाच पोलिसात जाण्यास सांगितले. शेवटी, जेव्हा खरातकडून पैसे मिळण्याची आशा मावळली, तेव्हा नीरजने सिडकोतील २८ वर्षीय विवाहितेचा व्हिडीओ तिच्या मेहुण्याला पाठविला. नीरजचा हाच मास्टरस्ट्रोक त्याच्यावर आणि खरातवर उलटला. मेहुण्याने धीर दिल्याने या पीडितेने सरकारवाडा पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद देत या वासनांधाचा खरा चेहरा जगासमोर आणला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
मोठ्या व्यक्तींच्या ओळखींचा वापर करुन रचला कट
खरातने माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकरसह तटकरे, राधाकृष्ण विखे-पाटील, दीपक केसरकर आदींसह दिल्ली, हरियाणा, राजस्थानातील भाजप व काही इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून वलय निर्माण केले होते. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्र्यांसोबतचे त्याचे फोटो आता तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. या मोठ्या ओळखींचा वापर करून नीरजने हा कट रचला होता का, याचा तपास आता एसआयटी करत आहे. दरम्यान, नीरजला एसआयटीसह शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे सखोल तपास सुरू आहे.
सहा लाख रुपये, पिस्तूल जप्त
एसआयटीने गुरुवारी खरातच्या कर्मयोगीनगरातील घरातून सहा लाख रुपये आणि सिन्नरच्या फार्महाऊसवरून एक पिस्तूल जप्त केले आहे. वावी, शिर्डी आणि सरकारवाडा येथील तिन्ही गुन्ह्यांची कागदपत्रे एसआयटीने ताब्यात घेतली असून, आता नीरज जाधवच्या टोळीचा आणि खरातच्या राजकीय संबंधांचा शोध घेतला जात आहे. तर खरातकडे पिस्तूलचा परवाना आहे का? याचाही तपास सुरू आहे.
एसआयटीकडून तपास
या प्रकरणाचे धागेदोरे राज्यातील बडे राजकीय नेते, मंत्र्यांशी आणि सेलिब्रिटींशी जोडले गेल्याचे पाहून राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी तातडीने एसआयटी स्थापन केली आहे. पुणे येथील एसआरपीएफच्या बल गट क्र. एकच्या समादेशक तेजस्वी सातपुते या पथकाचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी गुरुवारी सकाळी नाशिक शहर गाठून सर्व कागदपत्रे हाती घेतली आहेत.





