Tuesday, September 29, 2026
Homeक्राईमSangamner : उंबरी बाळापूर-आश्वी येथे सशस्त्र दरोडा

Sangamner : उंबरी बाळापूर-आश्वी येथे सशस्त्र दरोडा

सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर आणि आश्वी बुद्रुक परिसरात शनिवारी (दि.18) पहाटे सशस्त्र चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी अंदाजे 10 ते 15 तोळे सोने आणि सव्वा दोन लाखांची रोख रक्कम लंपास केली आहे. विशेष म्हणजे दरोडेखोरांनी एका वृध्द महिलेच्या कानातील दागिने बळजबरीने ओरबाडल्यामुळे कानाला गंभीर जखम झाली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे 12.30 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी शेडगाव – उंबरी बाळापूर नवीन पुलालगत असलेल्या किसन खेमनर यांच्या हॉटेल बानाईला लक्ष्य केले. मात्र, तेथे काही मौल्यवान वस्तू न सापडल्याने चोरट्यांनी चक्क तेथील खाद्यपदार्थावर ताव मारला.त्यानंतर चोरट्यांनी जवळच असलेल्या भाऊसाहेब खेमनर यांच्या वस्तीवर मोर्चा वळवला. घरात शिरून उचकापाचक केली. खेमनर कुटुंबांच्या माहितीनुसार अंदाजे 2 तोळे सोने, 25 ते 30 हजारांची रोख रक्कम आणि एक मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. आवाज ऐकून बाहेर आलेल्या हौशीराम (पप्पू) खेमनर यांच्यावर चोरट्यांनी दगडफेक करत तेथून पळ काढला.

रात्री दीड वाजेच्या सुमारास ही टोळी प्रवरा कालव्यालगत असलेल्या चांगदेव उंबरकर यांच्या घरी पोहोचली. घराचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केलेल्या 3 ते 4 दरोडेखोरांनी तब्बल उंबरकर कुटुंबांच्या म्हणण्यानुसार 10 ते 12 तोळे सोने आणि 28 ते 30 हजारांची रोकड चोरट्यांनी पळवली. यावेळी घरातील तरुण जागे झाले असता चोरट्यांनी त्यांच्या गळ्याला कुर्‍हाड आणि कती लावली. यावेळी घरातील वृध्द महिलेच्या कानातील दागिने ओरबाडल्याने त्यांचे कान फाटले आहेत. तर प्रतीक उंबरकर या तरुणाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर दगडफेक करून चोरटे सामान घेऊन पसार झाले. यावेळी 7 ते 8 चोरटे असल्याचा अंदाज नागरीकांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर आश्वी बुद्रुक शिवारातील मच्छिंद्र होडगर यांच्या घरीही चोरट्यांनी डल्ला मारत 4 ते 5 तोळे सोने आणि 1 लाख 73 हजारांची रोख रक्कम चोरुन नेल्याचे होडगर यांनी सांगितले. तर घरात चोरी झाल्याचे सकाळी झोपेतून उठल्यानंतर होडगर कुटुंबियांच्या लक्षात आल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच आश्वीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे देखील घटनास्थळी आले होते. याप्रसंगी पोलीस पाटील वैशाली भगवान मैड उपस्थित होत्या. तसेच सकाळी पोलीस उपनिरीक्षक दीपक बर्डे, पोलीस हवालदार महेश आहेर यांच्यानंतर श्वानपथकासह मोठा पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. दरम्यान, बातमी लिहेपर्यंत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. रात्री उशिरा गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून त्यानंतरच अधिकृत आकडेवारी आणि मुद्देमालाची सविस्तर माहिती समोर येईल.

ताज्या बातम्या

NDCC Bank News : ‘व्याजात सवलत नको, संपूर्ण व्याजमाफी करा’; जिल्हा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashikनैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अतिवृष्टी आणि कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांच्या (Farmer Loan) कर्जावरील संपूर्ण व्याज...