आश्वी |वार्ताहर| Ashwi
शिर्डी मतदारसंघातील व संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांचे गट आमने-सामने उभे ठाकले आहेत. अटीतटीच्या दुरंगी लढतीबरोबरच अपक्ष उमेदवार दाखल झाल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे.
याठिकाणी लोकनियुक्त सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्यामुळे विखे पाटील गटाकडून अलका बापूसाहेब गायकवाड तर थोरात गटाकडून शालिनी दत्तात्रय सोनवणे या रिंगणात उतरल्या आहेत. सोनाली मोहित गायकवाड या अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतल्यामुळे सरपंचपदाची निवडणूक रंगतदार व अटीतटीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दोन्ही गटाकडून सरपंच पदासाठी 10 उमेदवारी अर्ज तर सदस्य पदाच्या 11 जागांसाठी 47 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. असे असले तरी बुधवारी अर्ज माघारीच्या दिवशी अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाल्यामुळे अपक्ष उमेदवारांकडून प्रचाराला सुरुवात झाल्याची माहिती मिळाली आहे.
आश्वी खुर्द ग्रामपंचायतीवर महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील गटाची सत्ता ग्रामपंचायत स्थापनेपासून आजतागायत असल्याने थोरात गटानेही सत्ता आपल्याकडे खेचण्यासाठी एकास एक उमेदवार मैदानात उतरवले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदासाठी प्रभागनिहाय अंतिम उमेदवार पुढीलप्रमाणे प्रभाग 1 सुवर्णा राजेंद्र सातपुते (विखे गट), कल्पना सचिन क्षीरसागर (विखे गट), तसेच रुपाली सुनील क्षीरसागर (थोरात गट), प्रतिक्षा मिलिंद जाधव (थोरात गट), प्रभाग 2 – सागर दिनकर भडकवाड (विखे गट), विठ्ठल बजाबा गायकवाड (विखे गट), गुलनाज कमाल सय्यद (विखे गट) तसेच भारत छब्बु भडकवाड (थोरात गट), इन्नुस छन्नुमियॉ सय्यद (थोरात गट), नानुबाई तात्या माळी (थोरात गट). याव्यतिरिक्त मोहित गंगाधर गायकवाड (अपक्ष), संतोष भास्कर भडकवाड (अपक्ष) उमेदवारी करणार आहेत.
प्रभाग 3- जनाबाई देवराव शिंदे (विखे गट), आशा बंडु मुन्तोडे (विखे गट), दत्तात्रय सोन्याबापू मांढरे (विखे गट) तसेच संजय गबाजी भोसले (थोरात गट), पुनम राजेंद्र गायकवाड (थोरात गट), योगिता संजय शिरतार (थोरात गट), याव्यतिरिक्त लक्ष्मण सदाशिव वाल्हेकर (अपक्ष) हे निवडणूक लढवणार आहेत. प्रभाग 4 – बाबासाहेब प्रताप भवर (विखे गट), सोपान मधुकर सोनवणे, (विखे गट), संगिता दत्तात्रय बर्डे (विखे गट), तसेच देवराम पांडुरंग गायकवाड (थोरात गट), संकेत गोकुळ गपले (थोरात गट), प्रमिला संतोष बर्डे (थोरात गट) याव्यतिरिक्त लक्ष्मण सदाशिव वाल्हेकर (अपक्ष) व सतीश निवृत्ती गायकवाड (अपक्ष) हे निवडणूक लढवणार आहेत.
दरम्यान, होऊ घातलेल्या निवडणुकीत आश्वी खुर्द ग्रामपंचायतीचे 3 हजार 311 इतके मतदान आहे. या निवडणुकीत सदस्य पदासाठी 27 तर सरपंच पदासाठी 3 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याचे बुधवारी माघारीच्या दिवशी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता दि. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून दि. 6 नोव्हेंबर रोजी सकाळी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे पुढील 10 दिवस कार्यकर्ते व उमेदवार पायाला भिंगरी लावून प्रचार करण्याबरोबरच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत.