संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
वैद्यकीय व्यवसायाचा कोणताही परवाना अथवा शिक्षण नसताना सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याशी खेळणार्या डॉक्टरच्या नावाखाली व्यवसाय करणार्या आश्वी बुद्रुक (ता.संगमनेर) येथील ‘मुन्नाभाई’वर छापा टाकत कारवाई केली आहे. याप्रकरणी आश्वी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आश्वी बुद्रुक येथील संगमनेर शेतकी गट कार्यालयामध्ये इम्रान अब्दुल खान (रा. 82 मुसेपूर मार्ग रोसियाका, ता. कामा, भरतपूर-राजस्थान) हा आयुर्वेदिक औषधे सांगून रुग्णांना इंजेक्शन देत असल्याची माहिती निमगाव जाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तयब तांबोळी यांना समजली.
त्यांनी तत्काळ तेथे धाव घेतली असता कोणत्याही पदवी व परवान्याशिवाय वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे दिसले. त्याच्याकडे 4 नाव नसलेल्या व्हायल, 28 सिरींज, डॉ. हुसने नाव असलेेले व्हिजिटिंग कार्ड, 18 नाव नसलेल्या रिकाम्या व्हायल असा मुद्देमाल मिळून आला. तर या व्यवसायासाठी भरत मधुकर वर्पे (रा. कनोली, ता. संगमनेर) याने रुग्ण व कार्यालय उपलब्ध करून दिल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. तयब तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोगस मुन्नाभाई डॉक्टर इम्रान खान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. सोनवणे करत आहेत. दरम्यान, रुग्णांच्या जिवाशी खेळणार्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.