मुंबई । Mumbai
बहुचर्चित अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात अखेर न्यायालयाने आपला निर्णय दिला असून, मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचसोबत त्याच्यावर २० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. इतर दोन आरोपी कुंदन भंडारी आणि महेश पार्डीकर यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
कुंदन भंडारी आणि महेश पार्डीकर हे दोघेही अटक झाल्यापासून सात वर्षांपासून तुरुंगात असल्याने, त्यांची शिक्षा पूर्ण झाल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. त्यामुळे या दोघांची तत्काळ सुटका करण्याचे आदेश कोर्टाने तुरुंग प्रशासनाला दिले आहेत. त्यांची अधिकृत रिलीज ऑर्डर लवकरच जारी होणार आहे. अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी आरोपींकडून कोणतीही भरपाई नको असल्याचे न्यायालयात स्पष्ट केले होते. त्यामुळे न्यायालयाने भरपाईबाबत कोणताही आदेश दिलेला नाही.
या प्रकरणात केवळ आरोपींच्यावर नव्हे, तर सरकारी यंत्रणांवरही न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. न्यायालयाने सरकारला निर्देश दिले आहेत की, अश्विनी बिद्रे यांना मिळणाऱ्या पगाराची भरपाई द्यावी. तसेच या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी. विशेष म्हणजे, कोर्टाने नवी मुंबई पोलीस आयुक्तांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, ज्या अधिकाऱ्यांनी अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला आहे, त्यांच्याविरोधात विभागीय शिस्तभंगाची प्रक्रिया सुरू करावी. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकरणाची नीट चौकशी न करता, आरोपींसाठी राष्ट्रपती पदकाची शिफारस केली होती. अशा अधिकाऱ्यांविरोधात कारवाई अनिवार्य असल्याचे कोर्टाने नमूद केले.
तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणात दुर्लक्ष केल्याचे मतही न्यायालयाने व्यक्त केले आहे. आरोपींवर कारवाई न करता, त्यांना पाठिशी घालणारी भूमिका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतल्याने न्यायप्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले. न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात आरोपींना उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत आरोपी अपील दाखल करू शकतात.
अश्विनी बिद्रे या नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक होत्या. २०१५ मध्ये त्या बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा खून झाल्याचा आरोप अभय कुरुंदकरवर ठेवण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपींनी तिचा खून करून मृतदेह लपविल्याचे समोर आले होते. या प्रकरणाने महाराष्ट्रात मोठा खळबळ उडवून दिली होती.