नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आशिया चषक स्पर्धेच्या रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. या मालिकेत भारतीय संघाने तिसऱ्यांदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. तिलक वर्माच्या नाबाद 69 धावांच्या जोरावर टीम इंडियाने एकावेळी अशक्यप्राय वाटत असलेला विजय प्राप्त केला. संपूर्ण स्पर्धेत भारताने पाकिस्तानला ३ वेळा पराभवाची धूळ चारली. इतकेच नाही तर भारतीय खेळाडूंनी त्यांच्यासोबत हँडशेक करणे आणि फोटो काढणेही टाळले. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंनी संयम गमावल्याचे दिसून आले. अंतिम सामन्यावेळी त्यांची चिडचिड स्पष्ट दिसत होती. कालच्या सामन्यानंतर पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा याचा मुजोरडेपणा सर्वांच्या लक्षात राहिला. भारताने आशिया कप स्पर्धेत तिसऱ्यांदा हरवूनही पाकिस्तानचा ताठा जरादेखील कमी झाला नसल्याचे दिसून आले.
भारताने हा सामना जिंकल्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा सुरु झाला. पाकिस्तानी संघ तासभर उशीरा मैदानात आल्याने या सोहळ्याला उशीर झाला. त्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याला व्यासपीठावर बोलवण्यात आले. आशिया कप स्पर्धेतील उपविजेता संघ म्हणून पाकिस्तानी कर्णधाराकडे ७५ हजार डॉलर्सचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. हा धनादेश स्वीकारताना सलमान आगा याने हसत फोटो काढून घेतले. मात्र, त्यानंतर मागे वळून काही अंतर चालत जात सलमान आगा याने हा धनादेश थेट व्यासपीठाच्या फेकून दिला.
पुरस्कार वितरण सोहळ्यात सलमान आगाने एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) चे प्रतिनिधी अमीनुल इस्लाम यांच्याकडून रनर-अप चेक स्वीकारला आणि मागे वळून तो जमिनीवर फेकला. त्यानंतर प्रेक्षकांनी त्याची जोरदार हूटिंग केली. दरम्यान, पराभवानंतर सलमान आगा संतप्त झाला होता. तो म्हणाला, “हे सहन करणे आता खूप कठीण आहे. पण मला वाटते की, गोलंदाजीत उत्कृष्ट आम्ही उत्कृष्ट होतो. पण फलंदाजीत चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळेच फलकावर हव्या त्या धावा करू शकलो नाही.” सलमान आगा याचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असून भारतीय क्रिकेटरसिक यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




