Monday, September 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAsian Games २०२६: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी! टेबल टेनिसमध्ये पाकिस्तानवर...

Asian Games २०२६: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी! टेबल टेनिसमध्ये पाकिस्तानवर विजय; शूटिंगमध्ये आणखी रौप्यपदक

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या खेळाडूंनी पदकांची कमाई सुरू ठेवली आहे. सोमवारी भारतीय महिला टेबल टेनिस संघाने पाकिस्तानचा ३-० असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी नेमबाजीमध्ये भारताच्या पुरुष संघाने १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावले.

टेबल टेनिसमध्ये पाकिस्तानचा ३-० असा पराभव
भारतीय महिला टेबल टेनिस संघाने ग्रुप एफमधील सामन्यात पाकिस्तानविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला. सुतीर्था मुखर्जी, सिंड्रेला दास आणि श्रीजा अकुला यांनी आपापल्या सामन्यांमध्ये विजय मिळवत भारताला ३-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली. या विजयासह भारताने ग्रुप एफमध्ये सलग तीन सामने जिंकत अव्वल स्थान पटकावले आणि क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला.

- Advertisement -

पहिल्या सामन्यात सुतीर्था मुखर्जीने अलीना खानचा ११-३, ११-३, ११-४ असा पराभव केला. सुतीर्थाने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व राखत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या सिंड्रेला दासने कुलसूम खानचा ११-६, ११-७, ११-५ असा पराभव केला. त्यामुळे भारताची आघाडी २-० झाली.

तिसऱ्या सामन्यात श्रीजा अकुलाने फातिमा खानचा ११-४, ११-४, ११-५ असा पराभव करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

शूटिंगमध्ये भारताला आणखी एक रौप्य
टेबल टेनिसमधील विजयासोबतच नेमबाजीतही भारताने आणखी एक पदक आपल्या नावावर केले. हिमांशू धिल्लों, पार्थ माने आणि रुद्रांक्ष पाटील यांच्या भारतीय संघाने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावले. भारतीय संघाने एकूण १८९०.१ गुण मिळवले.

चीनच्या संघाने १८९९.० गुणांसह सुवर्णपदक जिंकले. चीनचा हा स्कोअर पात्रता फेरीतील विश्वविक्रम ठरला. दक्षिण कोरियाने १८८४.२ गुणांसह कांस्यपदक मिळवले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच भाजपकडून दणका, बडा नेता कमळ हाती घेणार!

वैयक्तिक फायनलमध्येही भारतीय नेमबाज
सांघिक रौप्यपदकासोबतच रुद्रांक्ष पाटील आणि हिमांशू धिल्लों यांनी पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलच्या वैयक्तिक अंतिम फेरीतही प्रवेश केला आहे. त्यामुळे या प्रकारात भारताला आणखी पदकाची संधी निर्माण झाली आहे. पार्थ माने मात्र वैयक्तिक अंतिम फेरीत स्थान मिळवू शकला नाही.

शूटिंगमध्ये भारताची पदकांची मालिका
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच भारतीय नेमबाजांनी प्रभावी कामगिरी केली आहे. यापूर्वी इलावेनिल वलारिवानने महिलांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात रौप्यपदक, तर महिला संघानेही १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. पुरुष संघाच्या रौप्यामुळे शूटिंगमध्ये भारताच्या पदकांची संख्या आणखी वाढली आहे.

भारतासाठी पदकांची आशादायी सुरुवात
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सुरुवातीच्या दिवसांतच भारताने नेमबाजीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत पदकांची संख्या वाढवली आहे. त्याचवेळी महिला टेबल टेनिस संघाने पाकिस्तानवर ३-० असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्यामुळे आगामी सामन्यांकडे भारतीय क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : पावसाने केली गटारींच्या कामाची पोलखोल; चेंबर ओव्हरफ्लो होऊन...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati पवित्र रामकुंडात (Ramkund) गटारींचे पाणी जाणार नाही, असा दावा करणाऱ्या स्मार्ट सिटी आणि महानगरपालिका प्रशासनाची पोलखोल सोमवारी दुपारी झालेल्या मुसळधार...