Saturday, July 27, 2024
Homeनगरआशियाई कबड्डीत टाकळीभानच्या अस्लमची सुवर्ण कामगिरी

आशियाई कबड्डीत टाकळीभानच्या अस्लमची सुवर्ण कामगिरी

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानचा भुमिपुत्र अस्लम इनामदार याने आशियाई कबड्डी स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करीत सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे. त्याच्या रुपाने भारतीय कबड्डी संघासह अहमदनगर जिल्ह्याला सुवर्ण पदकाचा मान मिळाला आहे. अस्लम याने गेल्या दोन सिझन मध्ये प्रो- कबड्डी स्पर्धेत पुणेरी पलटन संघाकडून खेळताना टाकळीभानच्या मातीचा जल्वा दाखवत आपले नाव उंचावर नेवून ठेवले होते. आणि त्याच खेळाच्या व कामगिरीवर गेल्या वर्षापासून तो भारतीय कबड्डी संघात पहिल्या सात खेळाडूत चमकत असल्याने त्याच्या सोबतच गावाचीही उंची वाढत आहे.

- Advertisement -

टाकळीभान ही तशी कबड्डीची पंढरी आहे. या मातीत अनेक कबड्डीचे खेळाडू घडले. त्यातलाच अस्लम इनामदार हा या मातीला वेगळ्याच उंचीवर घेऊन गेला आहे. भारतीय कबड्डी संघात त्याने थेट सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे. जिल्ह्याला बहुमान अस्लमच्या अप्रतिम खेळीने प्रथमच मिळाला आहे. आशियाई कबड्डी क्रिडा स्पर्धेत त्याने तब्बल 40 गुणांची कमाई केली.

उत्कृष्ठ चढाई पटू म्हणून त्याने संघात नावलौकिक मिळवला आहे. भारतीय संघात खेळणारा जिल्ह्यातील तो दुसरा खेळाडू ठरला आहे. सध्या तो ठाणे जिल्ह्याकडून तर प्रो- कबड्डीत पुणेरी पलटण या संघाकडून खेळत आहे. त्यातच भारतीय संघात खेळण्याचा मान मिळवून दुसर्‍याच वर्षी सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलेला आहे.

यापूर्वी अहमदनगर जिल्ह्याचा खेळाडू व सध्या पालघर येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले अहमदनगर येथील पंकज शिरसाठ यांची आशियाई स्पर्धा खेळून खेळाडू कोट्यातून थेट उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून निवड झाली होती. भारतीय संघाकडून खेळणारे अहमदनगर जिल्ह्याचे ते प्रथम खेळाडू होते. त्यानंतर टाकळीभानचा भुमिपुत्र अस्लम इनामदार याने थेट सुवर्ण पदकासह मुसंडी मारून जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

आशियाई क्रीडा कबड्डी स्पर्धेत पुरुष संघाच्या अंतिम सामन्यात इराणचा पराभव करत भारतीय संघाने सुवर्ण पदक जिंकले. सामन्याच्या शेवटच्या दोन मिनिटांचा खेळ बाकी असतानाच अस्लमच्या दिमाखदार कामगिरीमुळे सुवर्ण पदकाला गवसनी घालता आली. टाकळीभान गावचा झेंडा सुवर्ण पदकाच्या रुपाने अस्लमने फडकवताच अस्लमच्या येथील चाहत्यांनी दिवाळीपूर्वीच फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

अस्लम इनामदारची कामगिरी भारतीय संघासाठी, अस्लम इनामदारसाठी व गावासाठी अभिमानाची बाब असल्याने गुरुवार दि. 12 ऑक्टोबर रोजी मायभूमीत त्यांचे आगमन होत असल्याने भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते तर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्ह्यातील इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी 6 वाजता ग्रामसचिवालयाच्या प्रांगणात भव्य सत्कार समारंभाचा कार्यक्रम ग्रामस्थ व चाहत्यांनी आयोजित केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या