टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
टेलिफोनची केबल टाकण्यासाठी नामांकित कंपनीच्या ठेकेदाराने परवानगी शिवाय नव्यानेच झालेल्या डांबरी रस्त्याची तोडफोड केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने पंचनामा करुन श्रीरामपूर तालुका पोलिसात टेलिफोन कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे.
टाकळीभान ते घोगरगाव या वर्दळीच्या व गेली अनेक वर्षे दुरावस्था झालेल्या रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण झाले होते. त्यातच टेलिफोनची केबल मातीत गाडण्याचे काम करणार्या ठेकेदार कंपनीने या रस्त्याची तोडफोड केल्याने ग्रामस्थांनी ओरड करताच बाजार समितीचे संचालक मयुर पटारे यांनी हे काम बंद करुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी बापूसाहेब वराळे यांना माहीती देवून सदर नुकसानीचा पंचनामा करुन कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम उपविभाग श्रीरामपूरचे सहायक अभियंता धनंजय एकनाथ सोनवणे यांनी समक्ष पहाणी करुन नुकसानीचा पंचनामा केला. याप्रकरणी सोनवणे यांनी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, टाकळीभान-कमालपूर, नाऊर रस्त्यालगत असलेल्या महाराष्ट्र बँकेसमोर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने डांबरी रस्त्याचा पृष्ठभाग साईडपट्टी खोदल्याची माहिती टाकळीभानच्या मयुर पटारे यांनी दिली.
तेव्हा त्या ठिकाणी जाऊन असिस्टंट यांनी पाहणी करून माहिती घेतली असता सदर टाकळीभान कमालपूर नाऊर रस्त्यालगत 60 मीटर लांबीचा डांबरी रस्त्याचा काही पृष्ठभाग व साईडपट्टी खोदून नुकसान केल्याचे दिसून आले. याबाबत चौकशी केली असता भारती एअरटेल लिमिटेड, प्लॉड नं.3/1, नॉर्थ टॉवर, ई-पार्क, एमआयडीसी, खराडी, ता. हवेली, जि.पुणे यांनी ओएफसी केबल टाकण्यासाठी सदरचा रस्ता कुठलीही परवानगी न घेता खोदून रस्त्याचे अंदाजे 3 लाख 96 हजार रुपयांचे नुकसान केल्याचे आढळून आले. त्यामुळे सोनवणे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलिसात भारती एअरटेल लिमिटेड या कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एखाद्या कंपनीने केबल टाकण्यासाठी किंवा इतर कामांसाठी बेकायदेशिररित्या रस्ता खोदल्यामुळे कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल होण्याची नजीकच्या काळातील ही पहिलीच घटना असावी, असे म्हटले जात आहे.
या रस्त्याचे डांबरीकरण सुमारे पंचवीस वर्षापूर्वी झालेले होते. त्यानंतर या मुख्य वर्दळीच्या रस्त्याला निधी उपलब्ध न झाल्याने रस्त्याची आवस्था दयनिय झाली होती. नुकताच या रस्ता कामासाठी माजी आमदार लहु कानडे यांनी निधी उपलब्ध करुन देवून रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. त्यातच केबल कंपनीने रस्त्याची तोडफोड केल्याने नागरीक प्रक्षुब्ध झाले होते. बाजार समितीचे संचालक मयुर पटारे यांनी याबाबत कंपनी विरोधात आवाज उठवल्याने व सातत्याने पाठपुरावा केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदार कंपनी विरोधात नुकसानीचा गुन्हा दाखल केला आहे.