छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar
पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणातून पोटच्या मुलावर वस्तऱ्याने प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्या नराधम बापाला आजन्म कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम. कोचे यांनी ठोठावली. योगेश हरी गोपाळ (३५, रा. हेंद्रन, ता. जि. धुळे) असे आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणात सविता योगेश गोपाळ (२८, रा. ह.मु सायगव्हाण ता. कन्नड) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, घटना घडण्याच्या आठ वर्षांपूर्वी फिर्यादी व आरोपी यांचे लग्न झाले होते. मात्र दोघांचे पटत नसल्याने फिर्यादी कोर्टामार्फत नांदायला गेली होती. त्यानंतर त्यांना जीवन (वय पाच वर्ष) आणि कार्तिक (वय अडीच वर्ष) अशी दोन मुले आहेत. आरोपी हा म्हशी खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता. आरोपी फिर्यादीला नेहमी मारहाण करून माहेरी आणून सोडत होता. घटनेच्या दहा दिवसांपूर्वी देखील त्यांच्यात भांडण झाली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला माहेरी सोडले व मुलांना स्वतःकडे ठेवून घेतले.
३१ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आरोपी हा मुलगा जीवन याला घेऊन आला. वस्तरा दाखवत माझी बायको नांदायला येत नाही, असे म्हणत जीवनसह तिला मारून टाकतो आणि मी पण मरून जातो, असे म्हणाला. त्यामुळे उपस्थित लोक आरोपीला वस्तरा खाली फेकण्याची विनवणी करत होते. मात्र, आरोपीने जीवनला जमिनीवर आडवे करून त्याच्या पोटावर आणि गळ्यावर वस्तऱ्याने वार केला. त्यामुळे जीवनच्या पोटातून आतडी बाहेर येऊन तो गंभीर जखमी झाला होता. यानंतर आरोपीने स्वतःच्या गळ्यावर देखील वार केला होता. प्रकरणात कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरणात तपास अधिकारी तथा तत्कालीन उपनिरीक्षक एस. एस. राजपूत यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता उल्हास पवार यांनी १९ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी योगेश गोपाळ याला दोषी ठरवून भादंवि कलम ३०७ अन्वये आजन्म कारावास, कलम ३०९ अन्वये एक वर्षांचा कारावस आणि भादंवि कलम ५०६ अन्वये दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार समद पठाण यांनी काम पाहिले.