अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन दिवसात गृह मतदान (होम वोटिंग) प्रक्रिया राबवण्यात आली. यात 85 वर्षांवरील 2 हजार 106 ज्येष्ठ नागरिक आणि 332 दिव्यांग मतदार अशा 2 हजार 494 ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा निवडणूक विभाग आणि त्या-त्या विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियंत्रणात ही प्रक्रिया राबवण्यात आली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांत 14 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत गृह मतदान करून घेण्यात आले. जिल्ह्यात गृहमतदानासाठी 2 हजार 692 ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग पात्र होते. या मतदारांसाठी तीन दिवस प्रत्येकाच्या घरी जावून मतदान करून घेण्यात आले.
यात अकोले विधानसभा मतदारसंघात 255 पैकी 226 ज्येष्ठ नागरिक, 26 दिव्यांग असे एकूण 252 मतदारांनी गृहमतदान केले. नगर शहर 143 एकूण 122 ज्येष्ठ नागरिक आणि 12 दिव्यांग एकूण 134. शिर्डी मतदारसंघात 198 पैकी 175 ज्येष्ठ नागरिक, 17 दिव्यांग असे एकूण 192, संगमनेर मतदारसंघात 252 पैकी 199 ज्येष्ठ नागरिक, 34 दिव्यांग असे एकूण 233, कोपरगाव मतदारसंघात 218 पैकी 169 ज्येष्ठ नागरिक, 33 दिव्यांग असे एकूण 202, श्रीरामपूर मतदारसंघात 111 पैकी 106 ज्येष्ठ नागरिक, 20 दिव्यांग असे एकूण 126, नेवासा मतदारसंघात 194 पैकी 158 ज्येष्ठ नागरिक, 22 दिव्यांग असे एकूण 180, राहूरी मतदारसंघात 144 पैकी 117 ज्येष्ठ नागरिक, 22 दिव्यांग असे एकूण 139, पारनेर मतदारसंघात 238 पैकी 145 ज्येष्ठ नागरिक, 20 दिव्यांग असे एकूण 165.
श्रीगोंदा 307 पैकी 240 ज्येष्ठ नागरिक, 45 दिव्यांग एकूण 293. कर्जत- जामखेड मतदारसंघात 310 पैकी 264 ज्येष्ठ नागरिक, 30 दिव्यांग आणि 56 आवश्यक सेवा असे एकूण 350 मतदारांनी गृह मतदान केले. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश असलेल्या पथकांच्या माध्यमातून गृह मतदान मोहीम राबविण्यात आली. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, बाळासाहेब कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी गृह मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवत प्रक्रिया पूर्ण केली.