नाशिक | Nashik
गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून चालू असलेल्या नेत्यांच्या प्रचारतोफा सोमवारी (१८ नोव्हेंबर) थंडावल्या. त्यानंतर आज बुधवार (दि. २० नोव्हेंबर) महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे.मतदानासाठी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत आहे. तसेच मतदार केंद्रांवर सकाळच्या सुमारास मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे जिल्ह्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी देखील विविध ठिकाणी जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. यात निफाड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल साहेबराव कदम यांनी ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात केंद्र १२२ मध्ये मतदानाचा हक्क बजावला. तर मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आसिफ शेख यांनी पत्नीसह मतदान केले.तसेच मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.
तसेच मालेगाव बाह्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व पालकमंत्री दादा भुसे यांनी सोयगाव येथील मतदान केंद्रावर मतदान केले. तर महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल कदम आणि महायुतीचे उमेदवार दिलीप बनकर यांनी देखील निफाड येथे मतदान केले. तर कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितीन पवार यांनी दळवट येथे सहकुटुंब मतदान केले.याशिवाय नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांनी येवला येथील जनता विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी डॉ.शेफाली भुजबळ यांनी देखील त्यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला.
तर येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत येवला शहरातील जनता विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्नी मीनाताई भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, विशाखा भुजबळ यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. माणिकराव शिंदे यांनी आपल्या कुटुंबांसोबत मतदानाचा हक्क बजावला. तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनिता रामदास चारोस्कर यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा