मुंबई । Mumbai
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. यादरम्यान नेत्यांची भाषण, मुलाखतीमध्ये त्यांनी केलेली विधान चर्चेत येत आहेत. असंच एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठं विधान केलं आहे.
मुलाखतीत मुख्यामंत्री पदाबाबत विचारलं असता शिंदे म्हणाले, आमच्यात कोणतीच स्पर्धा नाही. मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही. राज्याला पुढं नेण्याची आमची स्पर्धा आहे. राज्याला पुढं नेणं, कल्याणकारी योजना राबवणं. आता राज्याला नंबर एकवर आम्ही आणलं आहे. राज्यात विकासाचं विकेंद्रीकरण करणं, विभागनिहाय राज्याचा विकास करणं यासाठी आमची स्पर्धा सुरू आहे. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर निवडणुकीनंतर एकत्रित बसून काय तो निर्णय घेऊ, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
तसेच यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना देखील टोला लगावला आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी माझा चेहरा करा, माझा चेहरा करा, मला मुख्यमंत्री करा, असे ते दिल्ली ते गल्लीपर्यंत फिरले, मात्र महाविकास आघाडीमध्ये काही एकमत झाले नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या मुद्द्यावर निवडणुकीनंतर तिन्ही पक्ष एकत्रित निर्णय घेऊ असं सांगितलं होतं. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं सांगितलं होतं. पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा अशी भावना असणे सहाजिक आहे. मात्र वस्तुस्थिती देखील पाहणे गरजेचे असते. महायुतीचं राजकारण वास्तविकतेवर आधारीत आहे. तेव्हा मुख्यमंत्रिपदाची कोणतीही शर्यत आमच्यात नाही आणि अशा शर्यतीत मी सहभागी नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.