अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी दाखल करण्यासाठी आता दोनच दिवस शिल्लक आहेत. यात पहिला दिवस आजचा (सोमवारी) असून उद्या मंगळवार (दि.29) शेवटचा दिवस राहणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात मागील आठवड्यात चार दिवसात 12 मतदारसंघांतून 1 हजार 13 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज विकत नेले आहेत. यातील 53 जणांचे 69 अर्ज दाखल झाले आहेत. आता उमेदवारी दाखल करण्याचा कालावधी संपत आल्याने आज आणि उद्या मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
विधानसभा 2024 निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत मागील आठवड्यात 22 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. यात पहिल्या चार दिवसात जिल्ह्यातील 12 मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात अर्जाची विक्री झालेली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात जवळपास सर्वच मतदारसंघातील महाविकास आघाडी विरोधातील महायुतीचे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले आहे. आतापर्यंत दाखल अर्जात सर्वच मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले असून शिल्लक राहिलेले आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार (दि.29) शेवटची मुदत असून दाखल अर्जाची छानणी होवून 4 नाव्हेंबरला माघारीची मुदत आहे. या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात जवळपास सर्वच मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील प्रमुख लढतीचे चित्र स्पष्ट झालेले आहे. यासह अनेक मतदारसंघात अपक्षांची संख्या मोठी राहणार असून हे अपक्ष शेवटपर्यंत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवणार की माघार हे 4 तारखेला स्पष्ट होणार आहे.
माघारीसाठी होणार तारांबळ
यंदा विधानसभा निवडणुकीची तयारी आणि दिवाळी सणाचा कालावधी जवळपास एकच वेळी येत आहे. 29 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची मुदत असून त्यानंतर बुधवार (दि.30) रोजी दाखल अर्जाची छानणी होवून वैध अर्जाची घोषणा त्याच दिवशी होणार आहे. त्यानंतर 31 तारखेला नरक चतुर्दशीपासून शासकीय सुट्ट्या असून शुक्रवार 1 नाव्हेंबरला लक्ष्मी पुजन, 2 नाव्हेंबरला पाडवा आणि शनिवार, 3 तारखेला रविवार आणि भाऊबीजची सुट्टी असून माघारीसाठी अवघा एकच दिवस म्हणजे 4 नाव्हेंबर राहणार आहे. यामुळे दाखल अर्जातून माघारीसाठी राजकीय पक्षांसह प्रमुख उमेदवार आणि नेत्यांची मोठी तारांबळ होणार आहे.