Thursday, October 24, 2024
Homeनगरश्रीगोंद्याचे कोडे सुटले, नगर शहराचा गोंधळ कायम

श्रीगोंद्याचे कोडे सुटले, नगर शहराचा गोंधळ कायम

उमेदवारीवरून ठाकरे सेनेवर गंभीर आरोप

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्याप्रमाणे नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून घमासान असल्याचे दिसून आले. विशेष करून जिल्ह्यातील श्रीगोंद्यातील जागेवर ऐनवेळी महाविकास आघाडीच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने दावा ठोकत ही जागा आपल्या पदरात पाडून घेण्यात यश मिळवले आहे. याठिकाणी ऐनवेळी मशाल हाती घेणार्‍या अनुराधा नागवडे यांना सेनेने एबी फॉर्म दिल्याने त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जात आहे. यामुळे महाविकास आघाडीतील शरद पवार गट आक्रमक झाला असून त्यांनी ठाकरे सेनेने ही जागा विकल्याचा गंभीर आरोप केल्याने महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, नगर शहरातील महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला गोंधळ बुधवारी सायंकाळपर्यंत कायम होता.

- Advertisement -

नगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांपैकी अनेक ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारीचे चित्र स्पष्ट झालेले आहे. मात्र, बुधवारी सायंकाळीपर्यंत नगर शहराच्या जागेचा तिढा कायम होता. याठिकाणी आधी केडगावच्या संदीप कोतकर यांनी दावा ठोकत पक्ष कोणताही असो निवडणूक लढवणार अशी घोषणा करत रंगत वाढवली होती. यामुळे नगर शहरातील विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार असे चित्र रंगवण्यात येत असतांना कोतकरांनी एकदम माघार घेतल्याचे वृत्त समोर आले. मात्र, त्यानंतर महाविकास आघाडीचा नगर शहरातील उमेदवार कोण हे स्पष्ट झाले नव्हते.

दरम्यान, उमेदवारी जाहीर होवून अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार आणि समर्थकांनी निवडणुकीचे काम सुरु केल्यानंतर देखील नगरमध्ये त्यांचा प्रतिस्पर्धी उमेदवार कोण हे स्पष्ट नसल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.
दरम्यान, बुधवारी नागवडे यांनी मुंबईत शिवतीर्थावर जावून उध्दव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेतले. त्यानंतर नागवडे यांना शिवसेनेची उमेदवारीची बातमी धडकली. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून उमेदवारीसाठी प्रयत्न करणार्‍या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील नेत्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. आजवर राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या जा जागेवर मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून या जागेवर पहिल्यांदाच पक्षातील दोन्ही गटांचा उमेदवार नसेल.

ठाकरे शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीची श्रीगोंद्याची जागा विकल्याचा थेट आरोप माजी राहूल जगताप यांनी केला आहे. तसेच ऐनवळी श्रीगोंद्यात महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी इच्छुक असणार्‍या घनश्याम शेलार, साजन पाचपुते यांना डावलून नागवडे यांना उमेदवारी मिळालीच कशी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दुसरीकडे काही महिन्यांपूर्वी श्रीगोंदा याठिकाणी झालेल्या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. राऊत यांनी श्रीगोंद्याची जागा शिवसेनेची असून याठिकाणी पक्षाचा उमेदवार निवडणूक रिंगणात राहणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी दिलेला शब्द राऊत यांनी यानिमित्ताने पूर्ण केला असल्याचे सांगण्यात आले. नगर जिल्ह्यात नगर शहर, श्रीगोंदा आणि पारनेरच्या जागेचा पेच होता. यातील नगर आणि पारनेरचा प्रश्न सुटला असला तरी अद्याप नगर शहर मतदारसंघाचा घोळ कायम आहे. याबाबत काय निर्णय होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

तीन मतदारसंघात महिलांना संधी
नगर जिल्ह्यात विधानसभेसाठी 12 मतदारसंघ असून आतापर्यंत अवघ्या तीन मतदारसंघात महिला उमेदवारांना संधी मिळाली असल्याचे सध्या दिसत आहे. यात पाथर्डीत विद्यमान आ. मोनिका राजळे, त्यांच्या विरोधात अपक्ष हर्षदा काकडे, श्रीगोंद्यात भाजपकडून प्रतिभा पाचपुते त्यांच्या विरोधात आता शिवसेना ठाकरे गटाच्या अनुराधा नागवडे तर पारनेरमध्ये राणी लंके यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाली आहे. या महिला नेत्यांपैकी कोण विधीमंडळात पोहचणार, या प्रश्नाच्या उत्तरासाठी 23 नाव्हेंबरच वाट पाहवी लागणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या