Tuesday, November 19, 2024
Homeनगरजाहीर प्रचार थंडावला, आता मतदानाकडे लक्ष

जाहीर प्रचार थंडावला, आता मतदानाकडे लक्ष

निवडणूक यंत्रणा प्रशासकीय कामात दंग || किरकोळ प्रकार वगळता प्रचार शांततेत

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

विधानसभेच्या पारनेर मतदारसंघात उद्या होत असलेल्या मतदानासाठी सोमवारी सांयकाळी जाहीर प्रचाराच्या तोफा शांत झाल्या. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी आणि यंत्रणेच्यावतीने निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली असून मतदान शांततेत पार पडावे, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. राज्याचे लक्ष लागून असलेल्या पारनेर मतदारसंघात काल सायंकाळी जाहीर प्रचार थांबला. मतदारसंघात किरकोळ घटना वगळता जाहीर प्रचार शांततेत झाला असला तरी आरोप-प्रत्यारोपामुळे यंदाची निवडणूक चांगलीच गाजली. तालुक्यात यंदा तिरंगी लढत होत असून यात मतदार कोणाला कौल देणार हे शनिवारी निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

- Advertisement -

पारनेर विधानसभेसाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात असून निवडणूक प्रचार काळात एकमेकांवर चांगलीच चिखलफेक झाली. प्रचारात महायुतीकडून लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकार राबवत असलेल्या योजनांवर मते मागितली तर महाविकास आघाडीने त्याच्या कार्यकाळात केलेल्या कामाची माहिती देत मतदारांना साद घातली. मतदारसंघातील पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, रस्ते, वीज या प्रश्नांसह सुपा औद्योगिक वसाहतीतील रोजगार व ठेकेदारीवर प्रश्न उपस्थित करण्यात आला. तसेच मराठा आरक्षण व तालुक्यात पतसंस्थांनी बुडवलेल्या पैशावरही चर्चा झाली. मतदारसंघात राजकीय पक्षांचे फलक फाडण्याचे प्रकार वगळता प्रचार शांततेत झाला. पारनेर मतदारसंघात नगर तालुक्यातील गावांचा समावेश असून नगर एमआयडीसीमधील काही भागाचा समावेश आहे.

याठिकाणी देखील उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहचावे लागले. दरम्यान, मतदान प्रक्रिया व प्रशासनाची तयारी, तसेच 23 तारखेला होणार्‍या मतमोजणीची माहिती निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी दिली. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात 366 मतदान केंद्रे असून त्यापैकी 183 मतदान केंद्रावर वेब कास्टिंग होणार आहे. मतदानासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान अधिकार्‍यांसह कर्मचारी, पोलीस कर्मचारी असे सहाजणांचे पथक असणार आहे. यासाठी 2 हजार 200 कर्मचार्‍यांचा ताफा नियुक्त करण्यात आला असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी सांगितले. मतदारसंघात पारनेर तालुक्यातील 262 तर नगर तालुक्यातील 104 मतदान केंद्रासह 366 मतदान केंद्राचा समावेश आहे. तर 3 लाख 50 हजार 350 मतदार असून यात 1 लाख 80 हजार 523 पुरुष, तर 1 लाख 69 हजार 824 महिला आणि इतर 3 मतदार आहेत.

लोकसभेला 71 टक्के मतदान
ज्या मतदान केंद्रावर मताची कमी टक्केवारी झाली तेथे मतदारांची जागृती करण्यासाठी पथनाट्य व इतर माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. या वेळेला 75 टक्के मतदान घडवून आणण्याचे उद्दिष्ट पारनेर निवडणूक शाखेचे आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदान क्रमांक चिठ्ठ्या घर पोहोच करण्यात आल्या आहेत. साहित्य वाटपासाठीची तयारी झाली असून गावोगावी मतदान अधिकारी, कर्मचारी यांना पोहोचण्यासाठी 44 एसटी बसेस, काही स्कुल बसेस व जीप यांच्यामार्फत आज रवाना करण्यात येणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या