Thursday, October 31, 2024
Homeनगरतनपुरे घराण्याने आपलीच घरे भरण्यासाठी संस्थांचा वापर केला

तनपुरे घराण्याने आपलीच घरे भरण्यासाठी संस्थांचा वापर केला

माजी आ. कर्डिले यांचा हल्लाबोल || गेल्या 5 वर्षांत षडयंत्रे करून विकास कामे बंद पाडली

उंबरे |वार्ताहर| Umbare

चाळीस वर्ष तनपुरे घराण्याने राहुरी तालुक्यातील सर्व सत्ता स्वत:च्या घरात उपभोगल्या. त्या सत्तेचा वापर आपले घर भरण्यासाठी उपभोगल्या. असा आरोप राहुरी, नगर, पाथर्डी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी केला आहे. काल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वायएमसी ग्राउंडपासून भव्य रॅली काढून मोठे शक्तिप्रदर्शन करत पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत कर्डिले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अ‍ॅड. सुभाषराव पाटील होते.

- Advertisement -

कर्डिले म्हणाले, राहुरी तालुक्यातील लोकप्रतिनिधी म्हणून राहुरी नगर पालिका, राहुरी बाजार समिती, डॉ. तनपुरे कारखाना या सर्व संस्थांवर राज्य करणारे तनपुरे यांनी राहुरी मतदार संघाचा किती विकास केला? तालुक्यातील जनतेसाठी किती सुखसोयी उपलब्ध करून दिल्या यावर त्यांनी भाष्य करावे. राहुरी तालुक्यातील सर्व संस्थांचा धन कमविण्यासाठी वापर केला असून राहुरी शहरासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कायमस्वरूपी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाणी योजना मंजूर करण्यात आली होती. परंतु, सत्ता बदल होताच तनपुरे यांनी या योजनेचे मॉडीफिकेशन करण्याच्या नावाखाली ही योजना बंद पाडून या योजनेचे श्रेय कर्डिले यांना जाऊ नये, म्हणून षडयंत्र रचले गेले.

राहुरी नगरपालिकेच्या माध्यमातून चालू असलेले ग्रामिण रुग्णालय यांच्या वडिलांपासून या रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावता आला नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून राहुरी ग्रामिण रुग्णालय, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन व सर्व शासकिय कार्यालयासाठी कोट्यवधी रुपये मंजूर करून कामाला प्रत्यक्षात सुरूवात केली. परंतु, तनपुरे यांनी काही लोकांना हाताशी धरून ग्रामिण रुग्णालय शहरा बाहेर हलवू द्यायचे नाही. असा गैरसमज निर्माण करून काम बंद पाडण्याचे काम तनपुरेंनी केले. स्वत:ला चांगली कामे करायची नाही. दुसरे चांगले काम करीत आहेत तर ती कामे हाणून पाडण्याचे काम करतात. राहुरी नगरपालिकेची सत्ता यांच्याकडे असूनही त्यांनी ग्रामिण रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून देता आली नाही. चाळीस वर्षात एकही उद्योग व्यवसाय उभारून तरुणांना रोजगार देण्यास अपयशी ठरले. मागील निवडणुकीत जनतेची सहानभुती निर्माण करून निवडणूक जिंकली. मात्र, 5 वर्षांत जनतेने यांना चांगलेच ओळखले आहे. या निवडणुकीत त्यांना कोणत्याही सहानभुतीचा फायदा होणार नाही, असे कर्डिले यांनी सांगितले.

अ‍ॅड. पाटील म्हणाले, शिवाजी कर्डिले मागील निवडणुकीत गाफिल राहिले, त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु ही निवडणूक तरुणांनी हातात घेतली आहे. 5 वर्ष सत्ता नसतानाही सर्वसामान्यांची कामे मार्गी लावण्यासाठी रात्रीचा दिवस त्यांनी केला. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत कर्डिलेंचा विजय 25 ते 30 हजार मतांनी होईल. असा विश्वास अ‍ॅड. पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, शिवसेनेचे राजू शेटे, धनराज गाडे, अक्षय कर्डिले, तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, अ‍ॅड. भाऊसाहेब पवार, शिवाजी सागर, आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी व्यासपिठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, आसाराम ढूस, डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, उद्यसिंह पाटील, शिवाजी सोनवणे, विनायकराव देशमुख, दादाभाऊ चितळकर, अ‍ॅड. तान्हाजी धसाळ, सुरसिंग पवार, धनराज गाढे, बाळकृष्ण बानकर, प्रफुल्ल शेळके, आर.आर. तनपुरे, सुनील भट्टड, किशोर वने, विजय बानकर, दत्तात्रय खुळे, अमोल भनगडे, सुभाष गायकवाड, रवींद्र म्हसे, हरिभाऊ कर्डिले, बाजीराव गवारे, मिराताई घाडगे, आप्पासाहेब विखे, शिलाताई खराडे, महेश पाटील, विलास साळवे, विक्रम तांबे, सुनील चांदणे, दीपक लांडगे, भाऊसाहेब बोठे, पुरूषोत्तम आठरे, सिमाताई बोरूडे, साईनाथ कोळसे, संतोष म्हस्के, प्रभाकर सुळ, शिवाजी डौले, उत्तमराव म्हसे, राजेंद्र उंडे, दिलीप जठार, अनिल आढाव, संतोष ढोकणे, शरद पेरणे, अक्षय तनपुरे, उत्तमराव आढाव उपस्थित होते.

तनपुरे कोण होते ?
आ. तनपुरे हे कोण आहेत, हे मागील निवडणुकीत आम्हाला जनतेसमोर सांगावे लागले. त्यांची ओळख करून देताना आमचीही दमछाक होत होती. ते निवडणुकीसाठी उभे राहत नव्हते. परंतु आम्ही त्यांना निवडणुकीत उभे केले आणि निवडून आणले. मात्र, 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी सगळे चमत्कार आम्हाला दाखवले. कर्डिले साहेब तुम्ही काळजी करू नका. पाथर्डी तालुक्यातून सर्वाधिक मते तुम्हाला मिळवून देऊन विजयी करू, असे आश्वासन पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पालवे यांनी दिले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या