Saturday, November 16, 2024
Homeनगरविधानसभा निवडणूक मीच लढविणार - पिचड

विधानसभा निवडणूक मीच लढविणार – पिचड

आ. लहामटे आणि जालिंदर वाकचौरे यांच्यावर जोरदार टीका

अकोले |प्रतिनिधी| Akole

महाराष्ट्रात एकाही पक्षाची उमेदवारी घोषित झाली नाही, पण यांनी केली. यामुळे गटनेते नाही तर देशाचे नेते झाले आहेत अशी खरमरीत टीका जिल्हा परिषदेतील भाजपचे माजी गटनेते जालिंदर वाकचौरे यांच्यावर माजी आमदार वैभव पिचड यांनी केली. मी विधानसभेसाठी सर्वप्रकारची यावेळी तयारी केली आहे, मी उभा राहणारच असा ठाम विश्वास व्यक्त करत रावणाला देव मानणार्‍या आमदाराचा मी कधीही प्रचार करू शकत नाही, मी श्रीरामाच्या बाजूचा आहे असेही वैभव पिचड यांनी ठणकावून सांगितले.

- Advertisement -

भारतीय जनता पार्टीच्या अकोले तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मेळावा काल दुपारी येथील श्रीमंत लॉन व मंगल कार्यालय येथे पार पडला. यावेळी माजी मंत्री वैभव पिचड यांनी विद्यमान आमदार व आपल्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते यांच्यावर सडकून टीकास्त्र सोडले.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे होते. माजी आमदार पिचड म्हणाले, भगव्या कपड्याची झोळी पुढे करत मदत मागणारे आमदार गावोगावी तिरंगा रॅलीच्या निमित्ताने डी. जे. लावत मिरवणुका काढत आहेत.तर आदिवासी दिन हा सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी पारंपरिक नृत्य, कला सादर करून समाज प्रबोधन पर कार्यक्रम करून साजरा केला पाहिजे. परंतु विद्यमान आमदार यांनी डीजेच्या तालावर ठेका धरत आदिवासी समाजातील तरुण वर्गाला व्यसनाधिन बनविले असल्याचा आरोप केला.

जालिंदर वाकचौरे यांनी विधानसभेचा उमेदवार घोषित केला, राज्यात आजपर्यंत एकाही पक्षाने आपला उमेदवार घोषित केला नसताना आता ते देशाचे गटनेते झाले आहेत, अशी कोपरखळी माजी आमदार पिचड यांनी त्यांना मारली. 2019 च्या प्रवेशावेळी मी सुचवलेल्या कामांना माझ्या प्रवेशामुळे विधानसभा मतदार संघासाठी निधी मिळाला,माझा पराभव झाला अन् त्या मंजूर कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न विद्यमान आमदारांनी केला. तोलार खिंड फोडण्याचे दिलेल्या आश्वासनाचे पुढे काय झाले ? कृष्णवंती नदीचे पाणी आढळा खोर्‍यात आणण्याचा निवडणुकी नंतर आमदारांना विसर पडल्याची टीकाही माजी आमदार पिचड यांनी त्यांच्यावर केली. अध्यक्षीय भाषणात विठ्ठलराव लंघे यांनी अजून उमेदवारी बाबत कोणताही निर्णय झाला नसून त्या बैठकीला मी देखील उपस्थित होतो, लवकरच पक्ष शिस्त न पाळणार्‍या व्यक्तीचा बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे लंघे यांनी कार्यकर्त्यांना आश्वासित केले.

अकोले विधानसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपण स्वतः आग्रह धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ नेते सीताराम भांगरे यांनी जालिंदर वाकचौरे यांची भाजप पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली. जर वाकचौरे यांना पक्षाने बाहेर काढले नाहीतर मला पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल, असे भांगरे यांनी ठणकावून सांगितले. ज्येष्ठ नेते शिवाजीराव धुमाळ यांनी जालिंदर वाकचौरे यांच्या संपत्तीची एस आय टी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी माजी उपसभापती दत्ता देशमुख, सोमदास पवार, रमेश राक्षे, दिनेश शहा, सदानंद पोखरकर, संजय लोखंडे, सेवानिवृत्त प्राचार्य संतोष कचरे, महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी आदींनी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी तालुक्यात विकास कामांचा डोंगर उभा केला असून त्यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात आहे, त्यामुळे विधानसभेला भाजपने वैभव पिचड यांना उमेदवारी द्यावी, अशा आशयाची भाषणे केली.

माजी तालुकाध्यक्ष धनंजय संत यांनी अकोले विधानसभा ही भारतीय जनता पार्टीने लढवावी व ती उमेदवारी माजी आमदार वैभव पिचड यांना द्यावी, असा ठराव मांडला. त्यास अगस्तिचे माजी संचालक भाऊसाहेब वाकचौरे यांनी अनुमोदन दिले. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात एकमताने हा ठराव मंजूर केला. सूत्रसंचालन सोशल मीडियाचे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले तर आभार सरचिटणीस सचिन जोशी यांनी मानले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या