Friday, November 22, 2024
Homeनगरवाढलेला ‘मत’ टक्का कोणाच्या पथ्यावर ?

वाढलेला ‘मत’ टक्का कोणाच्या पथ्यावर ?

तीन पंचवार्षिकच्या तुलनेत वाढ || घासून की निर्णायक, अंदाज लागेना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राजकीयदृष्ट्या अग्रेसर आणि राज्याच्या राजकारणात प्रभाव असणार्‍या अहमदनगर जिल्ह्यातील 2009 पासून विधानसभेसाठी झालेले मतदान आणि वाढलेल्या मतांची टक्केवारी पाहता, यंदा वाढलेला ‘मत’ टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार याचा अंदाज बांधण्यात जिल्हा गुंग झालेला दिसत आहे. यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात घासून की निर्णायक लढत होणार याचा अंदाज भल्याभल्या येत नसल्याने मतमोजणीबाबत उत्सूकता वाढली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होवून झालेल्या मतदानाची अंतिम टक्केवारी गुरूवारी हाती आली. यात जिल्ह्यात यंदा 12 विधानसभा मतदारसंघात 72.47 टक्के मतदान झाले असून गत तीन पंचवार्षिकच्या तुलनेत ते वाढले आहे. जिल्ह्यातील काही मतदारसंघात 2009 पासून सातत्याने मतदानाचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्हाभर मतदानाच्या वाढलेल्या टक्क्यांवर चर्चा होत असून वाढलेले मतदान कोणाच्या पारड्यात पडणार हे उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात 2009 च्या विधासभा निवडणुकीत 67.95 टक्के मतदान झाले होते. त्यावेळी सर्वाधिक मतदान नेवासा तालुक्यात 76.81 टक्के झाले होते. त्यावेळी 91 हजारांहून अधिक मते घेवून शंकरराव गडाख विजयी झाले होते. तर सर्वात कमी मतदान हे 49.50 टक्के मतदान हे नगर शहरात झाले होते. त्यावेळी 65 हजार 271 मते घेवून शिवसेनेचे दिवंगत अनिल राठोड विजयी झाले होते. 2014 च्या निवडणुकीत सर्वाधिक मतदान हे कोपरगाव मतदारसंघात 79.95 टक्के झाले होते. त्याठिकाणी राष्ट्रवादीचे आशुतोष काळे हे 87 हजार 744 मते घेवून विजयी झाले होते. तर सर्वात कमी मतदान हे पुन्हा नगर शहरात 60.5 टक्के झाले होते. त्यावेळी संग्राम जगताप हे 49 हजार 378 मते घेवून विजयी झाले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पुन्हा 80.40 टक्के मतदान हे नेवासा तालुक्यात झाले होते. त्यावेळी शंकराव गडाख हे 1 लाख 16 हजार मते घेवून विजयी झाले होते. तर या पंचवार्षिकला सर्वात कमी मतदान हे नगर शहरात 58.75 टक्के झाले होते. त्यावेळी याठिकाणी संग्राम जगताप 81 हजार 217 मते घेवून विजयी झाले होते.

मतदारसंघनिहाय मतदानात संगमनेर तालुक्यात 2009 पासून आतापर्यंत सातत्याने वाढ झालेली दिसत आहे. तसेच याठिकाणी दरवार्षिकला बाळासाहेब थोरात यांच्या विजयाचा आकडा वाढलेला आहे. अकाले तालुकयात देखील अशी परिस्थिती असून याठिकाणी 65.42 टक्के ते 71.98 टक्क्यांपर्यत मतदानात वाढ झालेली असली तरी याठिकाणी 2019 ला परिवर्तन झालेले आहे. विजय आणि पराजयातील मतांची टक्केवारी हे दुप्पट होती. शिर्डी मतदारसंघातील मतदानाची आकडेवारी वाढत असून याठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विजयाची घौडदौड कायम ठवलेली आहे. कोपरगाव तालुक्यात 2009 पासून मतदानाची टक्केवारी ही 70 टक्क्यांहून अधिक राहिलेली आहे. यात सर्वाधिक मतदान हे 2014 झाले होते. यावेळी स्नेहलता कोल्हे मोठ्या फरकाने विजयी झाल्या होत्या. मात्र, 2019 ला आशुतोष काळे यांनी याठिकाणी विजय खेचून आणला. श्रीरामपूर मतदारसंघात 2009 पासून आतापर्यंत 63.69 टक्के ते 7024 टक्क्यांपर्यंत मतदान झालेले आहे. मात्र, याठिकाणी एकदा परिवर्तन झाले असून यंदा काय होणार हे शनिवारी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.

शेवगाव मतदारसंघात 2009 आणि 2014 नंतर आतापर्यंत झालेल्या दोन निवडणूकांमध्ये मतदानाची टक्केवारी घटली आहे. यात ठिकाणी एकदा सत्तांतर झालेले असून यंदा चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राहुरी मतदारसंघात 2019 वगळता उर्वरित तीन वेळा 70 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालेले असून याठिकाणी देखील मतदारांनी परिवर्तन केलेले आहे. यंदा हा मतदारसंघ कोण ताब्यात ठेवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नगर शहरात 2009 पासून आतापर्यंत कधीच 65 टक्क्यांच्या पुढे मतदान झालेले नाही. मात्र, याठिकाणी दोनदा विजय मिळवण्यात संग्राम जगताप यशस्वी ठरलेले आहेत. श्रीगोंद्यात 2019 वगळता उर्वरित वेळा 70 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालेले असून याठिकाणी मतदारांनी आलटून पालटून बबनराव पाचपुते यांना संधी दिलेली आहे. यंदा चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे स्पष्ट झाल्यावर श्रीगोंदाकरांचा कल स्पष्ट होणार आहे. तर कर्जत-जामखेड मतदारसंघात 2009 पासून आतापर्यंत एकदा परिवर्तन झालेले आहे. यंदा काय होणार हे शनिवारी स्पष्ट होणार आहे.

वाढलेल्या मतांचा ट्रेंड बदलला
पूर्वी कोणत्याही निवडणुकीत वाढलेले मतदान हे सत्तेतील सरकार विरोधात असल्याचे मानले जात होते. मात्र, जिल्ह्यात 2009 पासून 2019 पर्यंत झालेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीत वाढलेल्या मतांचा ट्रेंड बदलला असल्याचे दिसून येते. अनेक मतदारसंघात वाढलेले मतदान ते त्या-त्या ठिकाणी असणार्‍या विद्यमान नेत्यांच्या पथ्यावर पडलेले दिसत आहे. यामुळे यंदा जिल्ह्यात 70 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालेले असले तरी त्याचा फायदा त्या-त्या भागातील नेत्यांना होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या