अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विधानसभा निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या तिसर्या दिवशी (गुरूवार) गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी गुरूवारी जिल्ह्यात 12 मतदारसंघांत 31 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात प्रामुख्याने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीतून भाजपाकडून, डॉ. राजेंद्र पिपाडा, ममता पिपाडा अपक्ष, अकोलेतून अजित पवार गटाकडून आ. किरण लहामटे, कोपरगावातून अपक्ष संजय काळे, नगर शहरमधून आ. संग्राम जगताप, पाथर्डी-शेवगामधून आ. मोनिका राजळे, चंद्रशेखर घुले, प्रताप ढाकणे, हर्षदा काकडे, राहुरीतून शिवाजीराव कर्डिले, पारनेरातून राणी लंके आदींचा समावेश आहे.
दरम्यान, बुधवारी 140 जणांनी 236 उमेदवारी अर्ज नेले आहेत. पहिल्या दिवशी 196 व्यक्तींनी 376 अर्ज नेले होते. आता तीन दिवसांत 800 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 29 ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. त्यात शनिवार व रविवार सुट्टी आहे. उमेदवारी अर्ज घेण्यासाठी जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघातील तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात उमेदवारांसह समर्थकांची मोठी गर्दी होत आहे. दोन दिवसांपासून अर्ज घेण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र, अर्ज दाखल करणार्यांची संख्या कमी आहे. गुरूवारी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी मोठी गर्दी होण्याची शक्यता होती. तरी देखील 31 इच्छुकांनीच मुहूर्तावर अर्ज भरले आहेत.
गुरूवारी अकोले मतदारसंघात 7 व्यक्तींनी 13 अर्ज नेले 2 दाखल. कर्जत-जामखेडमध्ये 12 व्यक्तींनी 19 अर्ज आणि शून्य दाखल, श्रीगोंद्यात 15 व्यक्तींनी 24 अर्ज आणि दाखल 4 अर्ज, कोपरगावमध्ये 11 व्यक्तींनी 13 अर्ज आणि 1 दाखल, पारनेरमध्ये 9 व्यक्तींनी 17 अर्ज आणि 3 दाखल, श्रीरामपुरात 10 व्यक्तींनी 19 अर्ज आणि 4 दाखल, संगमनेरमध्ये 6 व्यक्तींनी 12 अर्ज आणि 1 दाखल, शिर्डीत 7 व्यक्तींनी 14 अर्ज 4 अर्ज, नेवासा 15 व्यक्तींनी 26 अर्ज, शेवगाव-पाथर्डीत 5 व्यक्तींनी 6 अर्ज आणि 7 अर्ज दाखल, राहुरीत 8 व्यक्तींनी 15 अर्ज 4 अर्ज दाखल आणि नगर शहरात 9 व्यक्तींनी 14 उमेदवारी अर्ज नेले तर 1 अर्ज दाखल तर शिर्डीत 7 व्यक्ती, 14 अर्ज तर चार अर्ज दाखल झाले आहेत.