अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विधानसभा निवडणुकीची वाटचाल आता ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे होताना दिसत आहे. सोमवारी उमेदवारी दाखल करण्यासाठी अनेक मतदारसंघात गर्दी झाली होती. काल आणखी 80 उमेदवारांचे 105 अर्ज दाखल झाले असून यामुळे आतापर्यंत 130 उमेदवारांचे 174 अर्ज दाखल झालेले आहेत. उमेदवारी दाखल करण्यासाठी आज (मंगळवार) शेवटचा दिवस असून धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर उमेदवारी दाखल करण्यासाठी जिल्ह्यात सर्वच मतदारसंघांत गर्दी होणार आहे.
जिल्ह्यात विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी दाखल करण्यास मागील आठवड्यात 22 ऑक्टोबरपासून सुरूवात झाली. सुरूवातीचे चार दिवस संपल्यावर शनिवार आणि रविवारी सुट्टी होती. त्यानंतर सोमवारी जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातून आणखी 80 उमेदवारांचे 105 अर्ज दाखल झालेले आहेत. यामुळे दाखल अर्जाची संख्या आता 174 पर्यंत गेलेली असून उमेदवारांची संख्या 130 झालेली आहे. आज उमेदवारी दाखल करण्यासाठी शेवटची मुदत आहे. आज दिवाळीतील धनत्रयोदशीचा मुहूर्त असून या मुहुर्तावर अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे.
जिल्ह्यात सोमवारी दाखल अर्जात आ. आशुतोष काळे, आ. शंकरराव गडाख, प्रभावती घोगरे, आ. प्राजक्त तनपुरे, आ. रोहित पवार, अनुराधा नागवडे, प्रतिभा पाचपुते, विक्रम पाचपुते, बाळासाहेब मुरकुटे श्रीरामपुरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले (काँग्रेस), तसेच आप्पासाहेब मोहन यांनी (वंचित), राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक अध्यक्ष सागर बेग, माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव प्रशांत लोखंडे (शिवसेना आणि अपक्ष) या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.
जिल्ह्यात अनेक मतदारसंघांत महायुती, महाविकास आघाडीसह अन्य स्थानिक नेत्यांचे अपक्ष अर्ज दाखल झालेले असून उद्या छाननीनंतर 4 तारखेला माघारीसाठी अंतिम मुदत राहणार आहे. जिल्ह्यात यंदा ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे विधानसभेसाठी अर्ज दाखल होत असून वाढलेल्या इच्छुकांसह अपक्षामुळे सर्व मतदारसंघांत बहुरंगी लढती होण्याची शक्यता आहे.
तालुकानिहाय उमेदवार आणि कंसात अर्ज
अकोले 7 उमेदवार आणि 8 अर्ज, संगमनेर 2 उमेदवार 3 अर्ज, शिर्डी 10 उमेदवार आणि 13 अर्ज, कोपरगाव 7 उमेदवार आणि 11 अर्ज, श्रीरामपूर 14 उमेदवार आणि 20 अर्ज, नेवासा 7 उमेदवार आणि 13 अर्ज, शेवगाव 20 उमेदवार आणि 25 अर्ज, राहुरी 17 उमेदवार आणि 19 अर्ज, पारनेर 8 उमेदवार आणि 8 अर्ज, नगर शहर 8 उमेदवार 8 अर्ज, श्रीगोंदा 17 उमेदवार आणि 24 अर्ज, कर्जत-जामखेड 13 उमेदवार आणि 22 अर्ज असे आहेत.