Friday, November 22, 2024
Homeनगरआचारसंहितेचे सीमोल्लंघन दसर्‍यापूर्वी की नंतर?

आचारसंहितेचे सीमोल्लंघन दसर्‍यापूर्वी की नंतर?

राजकीय पक्षांसह प्रशासनाच्या नजरा || तयारी टप्प्यात

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू आहे. काही दिवसांत निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. 8 ऑक्टोबरला हरियाणा, जम्मू काश्मीर निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. 10 ऑक्टोबरला या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम संपेल. सर्वसाधारणपणे एका निवडणुकीचा कार्यक्रम संपेपर्यंत दुसरी निवडणूक घोषित होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात 13 ऑक्टोबरनंतर विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होईल, अशी चर्चा आहे. सध्या नवरात्रोत्सव सुरू असून 12 तारखेला दसरा आहे. यामुळे दसर्‍यापूर्वी की त्यानंतर निवडणूक आचारसंहितेचे सीमोल्लंघन होणार याकडे सर्वाच्या नजरा आहेत.

- Advertisement -

दरम्यान, नगरसह राज्यातील निवडणुकीची धास्ती सर्वांनीच घेतली आहे. यामुळे प्रशासन पातळीवर कामे मंजूर करून त्यांच्या उद्घाटनचा धडाका सुरू आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग, कृषी विभाग यांच्या विविध योजना, शासकीय मदतीची घोषणा करण्यात येऊन संबंधित पात्र लाभार्थ्यांच्या खात्यापर्यंत पैसे वर्ग करण्याचे काम सुरू आहे. यामुळे विविध योजनांचे पैसे मिळत असल्याने लाभार्थी देखील सध्या खुश असल्याचे चित्र आहे. याच सोबत राजकीय पक्षाकडून देखील निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली असून मेळावे, सभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती यासह विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. तर दुसरीकडे जिल्हा निवडणूक विभाग निवडणूक पूर्व तयारीच्या विविध कामांत व्यस्त दिसत आहे.

महाराष्ट्रात नवी विधानसभा 26 नोव्हेंबर 2024 रोजी अस्तित्वात यायला हवी. तत्पूर्वी निवडणुकीसाठी मतदान होऊन निकाल लागणे गरजेचे आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर 45 दिवसांनी नवीन विधानसभा गठीत करावी लागते. नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात मतदान घ्यायचे ठरवले तर त्यासाठी ऑक्टोबरला 13 ते 16 या तारखांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करावी लागेल. त्यामुळे 45 दिवसांनी राज्यात नवं सरकार येऊ शकते. राज्यामध्ये सर्वच पक्ष विधानसभा निवडणूकीसाठी उत्सुक आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून प्रचाराचा धुराळा देखील उडाला आहे. दसर्‍याच्या आताबाहेर आचारसंहितेची घोषणा झाल्यानंतर दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत.

यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. यासाठी नेत्यांचे सभा, बैठका आणि चर्चा यांचे सत्र वाढले आहे. महाविकास आघाडीची जागावाटपांची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. काही जागांवर महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच आहे. मात्र, त्यावर चर्चा सुरु असून महायुती देखील राज्यामध्ये पहिल्यांदाच एकत्रित विधानसभा निवडणूका लढत आहे. महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन वेळा महाराष्ट्र दौर्‍यावर आले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी हे देखील राज्यात दौरे करत आहेत. नगर जिल्ह्यात विधानसभेच्या 12 जागा असून याठिकाणी विद्यामान स्थिती राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार होते.

मात्र, राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीतील आमदारांची वाटणी झाली असून काही आमदार शरद पवार तर काही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत आहेत. नगर जिल्ह्यावर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसह, काँग्रेस, भाजपचे विशेष लक्ष आहे. जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडी आणि घटनांवर राज्यातील नेते लक्ष ठेवून आहेत. जिल्ह्यात भाजपच्यावतीने काही मतदारसंघात पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून इच्छुक उमेदवारांची नावे घेतलेली असली तरी विद्यमान आमदारांना सोडून अन्य उमेदवारांना भाजपकडून संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पवार गटाकडील इच्छुकांच्या आज मुलाखती असून सर्वाधिक हे शरद पवार गटाकडून असल्याचे दिसत आहे. त्याखालोखाल काँग्रेसला पसंती असून भाजपचे चित्र फारसे स्पष्ट झालेले नसले तरी भाजप श्रेष्ठी नगर जिल्ह्यावर लक्ष ठेवून आहेत. उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून काही मतदारसंघाची मागणी लावून धरण्यात आलेली आहे. यात विशेष करून नगर शहर आणि दक्षिणेतील मतदारसंघाचा समावेश आहे. सध्याच्या गणितावरून नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला सात ते आठ, काँग्रेसला दोन ते तीन, उध्दव ठाकरे गटाला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. यासह भाजपच्या वाट्याला विद्यमान लोकप्रतिनिधी सोडून किती जागा जाणार, अजित पवार गटा ठरावीक जागा सोडून उर्वरित ठिकाणी मागणी करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

12 मतदारसंघात 37 लाख मतदार
जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघात 37 लाख 27 हजार 799 मतदार आहे. 30 ऑगस्ट रोजी जिल्ह्याची अंतिम मतदार यादी प्रसिध्द झालेली आहे. या सर्व मतदारांना विधानसभा निवडणुकीची प्रतिक्षा असून जिल्हा निवडणूक आयोगाने मतदानासाठी आवश्यक असणारी तयारी पूर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढवलेला आहे. मागील आठवड्यात मुंबईत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रमुखांसमोर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे सादरीकरण करण्यात आलेले आहे. यासह प्रशासकीय पातळीवरील तयारी पूर्ण करण्यात येत आहे.

18 हजार 465 यंत्र सज्ज !
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी 12 मतदारसंघात बीयू 8 हजार 550, सीयू 4 हजार 782 आणि 5 हजार 163 व्हीव्हीपॅट मशीनची आवश्यकता आहे. नगर लोकसभा मतदारसंघातील मशीन सील असल्याने बीडमधून 2 हजार 10 व्हीव्हीपॅट, जालना 570 बीयू, 720 सीयू, 500 व्हीव्हीपॅट आणि नाशिक 2 हजार 793 बीयू, 1 हजार 284 सीयू, 1 हजार 358 व्हीव्हीपॅट मशीन मागवण्यात आले. उपलब्ध झालेल्या यंत्रापैकी 18 हजार 465 मतदान यंत्रांची प्रथम तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या