Sunday, September 29, 2024
Homeनगरनगर शहरात आज राजकीय शक्तीप्रदर्शन

नगर शहरात आज राजकीय शक्तीप्रदर्शन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात आज (मंगळवार) गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान जोरदार राजकीय शक्तीप्रदर्शन होणार आहे. यंदा मानाच्या 12 गणेश मंडळांसह 17 मंडळे मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. या मंडळांच्या मिरवणुकीत विविध राजकीय पक्षांचे समर्थक कार्यकर्ते सहभागी होतील. त्यामुळे त्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन अपेक्षित आहे.

- Advertisement -

7 सप्टेंबर रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात ‘श्री’ ची स्थापना झाली. गेल्या 10 दिवस मंडळांकडून विविध धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंडळांना राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांकडून मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या गेल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. नगर शहरातील मंडळांकडून विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. माळीवाडा येथील श्री विशाल गणपतीनंतर 11 मानाची गणेश मंडळे, शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटाची दोन व इतर अशी एकूण 17 गणेश मंडळे मुख्य मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मुख्य मिरवणुकीस श्री. विशाल गणेश मंदिर येथून प्रारंभ होईल.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहराचे आमदार संग्राम जगताप व नगरचे माजी महापौर संदीप कोतकर यांच्या समर्थकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन गणेश विसर्जन मिरवणुकीत होणार आहे. आ. जगतापांच्या प्रेरणा प्रतिष्ठान मंडळाचा सहभाग गणपती मिरवणुकीत नसला तरी मानाच्या 11 गणपतींपैकी तब्बल 6 ते 7 गणपती मंडळे आ. जगताप समर्थक आहेत. त्यामुळे या मंडळांच्या मिरवणुकीत त्यांचे समर्थक सहभागी होतील. तर माजी महापौर कोतकर यांचे स्पंदन प्रतिष्ठानचे मंडळ तब्बल 8 वर्षांनी यंदाच्या मिरवणुकीत सहभागी होणार आहे. त्यामुळे त्यांचेही जोरदार शक्तीप्रदर्शन अपेक्षित आहे. दरम्यान, मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांच्या मंडळाला मिरवणुकीत सहभागी होण्याची परवानगी मिळाली होती. मात्र, शहरात वाद वाढू नयेत म्हणून जरांगे कृती समितीने सहभागी होण्याचा निर्णय रद्द केला आहे.

विसर्जन मिरवणुकीत मानाच्या पहिल्या विशाल गणेशानंतर माळीवाड्यातील संगम तरूण मंडळ, माळीवाडा तरूण मंडळ, आदिनाथ तरूण मंडळ, दोस्ती मित्रमंडळ, नवजवान तरूण मंडळ, महालक्ष्मी तरूण मंडळ, कपिलेश्वर मित्र मंडळ, नवरत्न मित्र मंडळ, नीलकमल मित्र मंडळ व शिवशंकर तरुण मंडळ असे अन्य 11 मंडळांचे गणपती मानाचे म्हणून मिरवणुकीत सहभागी होतात. या गणपतीनंतर शहर शिवसेना (उबाठा) व शहर शिवसेना (शिंदे) व आनंद या तीन मंडळांसह माजी महापौर संदीप कोतकर यांच्या मार्गदर्शनाखालील स्पंदन प्रतिष्ठान आठ वर्षांनंतर मिरवणुकीत सहभागी होणार आहे. यंदाच्या मिरवणुकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची चिन्हे आहेत.

मिरवणुकीत शिवकालीन खेळांचे प्रात्यक्षिक
शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली असून आज सकाळी 8.30 वाजता जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याहस्ते उत्थापन पुजेस प्रारंभ होईल. त्यानंतर मुख्य मिरवणुकीस श्री विशाल गणेश मंदिर येथून प्रारंभ होईल. फुलांनी सजविलेल्या रथामध्ये श्रीगणेश मूर्ती असेल. तसेच सनई चौघडा, रूद्रनाद, युगंधर ढोल पथकाचे वादन तसेच ब्रम्हाश्त्र संस्थेच्यावतीने पारंपरीक खेळ सादर करण्यात येणार आहे. यामध्ये शिवकालीन खेळांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे.

विसर्जनासाठी 17 ठिकाणी व्यवस्था
नगर महापालिकेने गणपती विसर्जनासाठी सावेडी, कल्याण रस्ता, केडगावसह 17 ठिकाणी व्यवस्था केली आहे. बाळाजीबुआ विहीर (कल्याण रस्ता), यशोदानगर विहीर (पाईपलाईन रस्ता), साईनगर (भोसले आखाडा), गांधीनगर रस्ता (भारत बेकरी चौक, बोल्हेगाव), साईबाबा मंदिर खुली जागा (निर्मलनगर), गंगा उद्यान (मिस्कीन मळा, सावेडी), कल्याण रस्ता व सीना नदी येथील आयुर्वेद उद्यानातील मोकळी जागा, देवी मंदिरा समोरील जागा (केडगाव), भूषणनगर (पाण्याच्या टाकीजवळ, केडगाव), सारसनगर (भिंगार नाला पुलाशेजारी), शिवनेरी चौक (स्टेशन रस्ता), गोविंदपुरा, फकीरवाडा (मारूती मंदिर जवळ), भिस्तबाग महालाजवळ (दोन ठिकाणी), गांधी मैदान पटांगण, पांजरपोळ पटांगण (मार्केट यार्ड), दाणेडबरा, मोतीनगर खुली जागा (केडगाव), यशोदानगर विहिरी शेजारी, नालेगाव बाळाजीबुआ विहिरीशेजारी, आंबेडकर सांस्कृतिक भवन (केडगाव देवी रस्ता).

- Advertisment -

ताज्या बातम्या