Thursday, November 21, 2024
Homeनगरअवैध मद्य, पैसे, प्रलोभन निर्माण करणार्‍या भेटवस्तूंच्या वाहतुकीवर प्रतिबंध

अवैध मद्य, पैसे, प्रलोभन निर्माण करणार्‍या भेटवस्तूंच्या वाहतुकीवर प्रतिबंध

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागावर करडी नजर

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमधील पोलीस, उत्पादन शुल्क आणि परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांनी समन्वयाने आणि प्रभावीपणे वाहनांची तपासणी करून अवैध मद्य, पैसे किंवा प्रलोभनासाठी उपयोगात येणार्‍या भेटवस्तूंच्या वाहतुकीला प्रतिबंध करावा, असे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी गुरूवारी दिले.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर प्रशांत खैरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील आणि दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी अविनाश पाठक, डॉ.सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अविनाश बारगळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, देवेंद्र कटके आदी उपस्थित होते. शेजारील जिल्ह्यांतील यंत्रणांनी समन्वयाने काम केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसतील. निवडणुकीतील गैरप्रकार टाळण्यासाठी अवैध मद्य आणि पैशाच्या वाहतुकीवर कठोरपणे प्रतिबंध करणे आवश्यक असल्याने आवश्यक त्या ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करण्यात येतील, त्यासाठी शेजारील जिल्ह्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सालीमठ यांनी केले.

बीड जिल्ह्याला लागून असलेल्या भागात दोन जागी पोलीसांचे पथक तैनात असून स्थिर सर्वेक्षण पथकासोबतही पोलीस पथक राहील, असे पोलीस अधीक्षक ओला यांनी सांगितले. पोलीस विभागातर्फे आवश्यक ती दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी उपस्थित वरिष्ठ अधिकार्‍यांनी सीमावर्ती भागात कडक बंदोबस्त ठेवण्यासाठी आवश्यक सूचना केल्या. बैठकीस उत्पादन शुल्क, पोलीस आणि परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मोर्चा, निदर्शनांना बंदी
निवडणूकीच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय आणि सर्व शासकीय विश्रामगृहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मिरवणूक मोर्चा काढणे, आंदोलन, निदर्शने आणि उपोषण करण्यास बंदीचे आदेश काढण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने जिल्ह्यात निवडणुकीची प्रक्रीया शांततेत, निर्भयपणे व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून हे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारची घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे आणि निवडणुकीचा प्रचार करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. हे आदेश 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत जिल्ह्यात लागू राहणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या