Friday, November 15, 2024
Homeनगरविधानसभेत जरांगे फॅक्टरचा परिणाम काय?

विधानसभेत जरांगे फॅक्टरचा परिणाम काय?

सर्वच मतदारसंघात नेते सावध || मतदार सांभाळण्याची कसरत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्याने सर्वच पक्षांमध्ये मोठी धावपळ सुरू झाली आहे. त्यात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आरक्षणाला विरोध करणार्‍यांना मतदान करू नका, असे जाहीर आवाहन करत सुपडा साफ करण्याचीही भाषा वापरली आहे. त्यामुळे मनोज जरांगे फॅक्टर जिल्ह्यात काय परिणाम घडवणार याची चिंता मातब्बर नेते आणि त्यांच्या समर्थकांमध्ये दिसून येत आहे. विशेषत: महायुतीकडे असलेल्या मतदारसंघात याचा परिणाम किती तीव्र असणार, यावर चर्चा झडत आहेत.

- Advertisement -

राज्यामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात असून सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. राजकीय क्षेत्रातही मराठा समाज पावरफुल्ल समजला जातो. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यात आंदोलन उभारले. या चळवळीला समाजातून मोठा पाठिंबा मिळाला. त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला. आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला मोठे महत्त्व निर्माण झाले असून सर्वच राजकीय पक्षांमध्ये त्यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.

मनोज जंरागे पाटील यांनी मराठा समाजाला थेट आवाहन करत आरक्षण न देणार्‍या पक्षाला मतदान करू नका, असे म्हटले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना विधानसभेत काय होईल याची चिंता आहे. जिल्ह्यात 12 मतदारसंघ आहेत. यापैकी श्रीरामपूर, संगमनेर, कर्जत-जामखेड, नेवासा, राहुरी या मतदारसंघात महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार आहेत. तर शिर्डी, पाथर्डी-शेवगाव, श्रीगोंदा, कोपरगाव, अकोले, नगर या मतदारसंघात महायुतीचे विद्यमान आमदार आहेत. पारनेर मतदारसंघ निलेश लंके लोकसभेत गेल्याने रिक्त आहे. खा.लंके महाविकास आघाडीत आहेत.

मराठा समाजाचा मतटक्का पाहता सर्वच उमेदवारांना या मतदारांची काळजी घ्यावी लागत आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी नुकतीच जरांगे पाटील यांनी भेट घेतली होती. अन्य उमेदवारही अशा भेटीगाठी करतील, असा अंदाज आहे. बहुतांश मतदारसंघात मराठा नेत्यांमध्येच सामना रंगतो. त्यामुळे मराठा कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. नेत्याला साथ द्यायची की सामाजिक चळवळीला बळ द्यायचे, असा पेच त्यांच्यासमोर आहे. यातून नेते आणि मतदार कसा मार्ग काढतात? जरांगे यांच्या आवाहनानुसार कोणाला दणका देतात? जरांगे फॅक्टर आपल्याकडे वळविण्यात कोण यशस्वी ठरणार? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तराकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या