Wednesday, October 23, 2024
Homeनगरनगर दक्षिणेत नाट्यपूर्ण राजकीय घडामोडींना वेग

नगर दक्षिणेत नाट्यपूर्ण राजकीय घडामोडींना वेग

राजकीय उलथापालथीच्या शक्यता || उमेदवारीसाठी काहीपण करण्याची भूमिका

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

संवेदनशील जिल्हा म्हणून ओळख असणार्‍या अहिल्यानगरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभेसाठी तयारी करणार्‍यांना ऐनवेळी महायुती-महाविकास आघाडीच्या तडजोडीच्या राजकारणात तिकीट हुकलेल्या इच्छुकांनी उमेदवारीसाठी काहीपण करण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे नगर जिल्ह्यात विशेष करून दक्षिण भागात मंगळवारी दिवसभर राजकीय घडमोडींना वेग आल्याचे दिसून आले.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी इच्छुकांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उड्या पडल्याचे दिसून आले. नगर दक्षिणेत नगर शहर, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत- जामखेड, शेवगाव-पाथर्डी आणि पारनेर हे विधानसभेचे मतदारसंघ येत असून यातील महायुतीमधील भाजपच्यावतीने त्यांचे उमेदवार जाहीर करण्यात आले. यामुळे महायुतीमध्ये असणारे अथवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निवडणूक लढवणार्‍यांची अडचण झाली असून उमेदवारी न मिळाल्याने यातील अनेकांनी ऐनवेळी धाडसी राजकीय निर्णय घेत उमेदवारीसाठी वेगवेगळे पर्याय अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नगर दक्षिणेत राजकीय घडमोडी वाढताना दिसत आहेत.

दरम्यान, आज अथवा उद्या महायुतीसह महाविकास आघाडीचे जवळपास सर्वच उमेदवार जाहीर होणार आहेत. यात दोनही ठिकाणी उमेदवारीसाठी प्रयत्न करणारे आणि त्यात यश न आलेले उमेदवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. विशेष यात नगर शहर, श्रीगोंदा, पारनेर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही, यामुळे अनेकांची अडचण झालेली आहे. दरम्यान, यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारीसाठी काहीपण करण्याची तयारी असल्याचे दिसत असून यामुळे जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत उमेदवारांची गर्दी होणार असून त्याचा फायदा कोणाला होणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

बंडखोरी ठरणार सर्वांची डोकेदुखी
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होणार असल्याचे चित्र आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षासह उमेदवारांची अडचण होणार असून यात कोण कोणाच्या विजय आणि पराभवास कारणीभूत ठरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या